आर्थिक अडचणीच्या काळात अनेकजण वैयक्तिक कर्ज (Personal Loan)काढण्याचा विचार करतात. तसेच या कर्जाची रक्कम कोणत्या कारणासाठी वापरावी याचे कोणते निर्बंध नाहीत. याशिवाय अर्जदाराला हे कर्ज विनातारण देखील उपलब्ध होऊ शकते. मात्र, अशा प्रकारच्या वैयक्तिक कर्जासाठी आकारले जाणारे व्याजदर आणि कर्ज प्रक्रियेसाठी आकारले शुल्कही काहीवेळा जास्त असू शकते. आज आपण वैयक्तिक कर्ज घेताना कोणकोणत्या प्रकारचे शुल्क आकारले जाते याची माहिती घेऊयात..
वैयक्तिक कर्ज-
तुम्ही वैयक्तिक कर्ज काढणार असाल तर तुम्हाला तुमचा क्रेडिट स्कोअर आणि मागील कर्जाची परतफेड करण्याचे रेकॉर्ड चांगले असणे गरजेचे आहे. या आधारेच तुम्हाला बँकेकडून कर्ज उपलब्ध होते. अशा प्रकारची कर्जे असुरक्षित कर्जे म्हणजे विनातारण कर्जे म्हणून गणली जातात. मात्र, वैयक्तिक कर्ज काढत असताना बँक अथवा कोणतीही वित्तीय संस्था पुढील काही गोष्टींसाठी अन्य काही चार्जेस तुमच्याकडून आकारते.
कर्जाचे प्रक्रिया शुल्क Processing charges
अनेक वित्तीय संस्थांकडून पर्सनल लोन काढत असताना कर्ज मंजुरीचे प्रक्रिया शुल्क आकरणी करतात. हे शुल्क प्रत्येक वित्तीय संस्थेनुसार बदलत्या कमी अधिक असू शकते. मुख्यत्वे बँकांकडून 0.5% ते 2.50% पर्यंत प्रक्रिया शुल्क आकारले जाते. ही रक्कम तुमच्या मंजूर झालेल्या कर्जाच्या रकमेतून कपात केली जाते.
पडताळणी शुल्क Verification charge
वैयक्तिक कर्ज हे असुरक्षित कर्ज प्रकारामध्ये गणले जाते. त्यामुळे अशा प्रकारची कर्जे मंजुर करण्यापूर्वी अर्जदार कर्ज परतफेडीस पात्र आहे किंवा नाही, याची पडताळणी केली जाते. त्यामध्ये तुमचा क्रेडिट स्कोअर चेक करणे. तुमचे मागील व्यवहाराचे रेकॉर्ड तपासणे याचा समावेश होतो. यासाठी बँकांकडून अनेकदा त्रयस्त संस्थेकडून हे काम केले जाते. त्यासाठी कर्जासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीस या प्रकारचे पडताळणीचे शुल्क द्यावे लागू शकते. हा एक प्रकारचा अतिरिक्त खर्च आहे.
हप्ता चुकल्यास दंड late payment
वैयक्तिक कर्ज घेतल्यानंतर तुम्ही तुमच्या सोयीनुसार महिन्याला परतफेडीचे हप्ते निवडलेले असतात. मात्र, EMI भरणा करण्याच्या मुदतीमध्ये तुम्ही पैसे जमा करणे गरजेचे आहे. जर तुमचा परतफेडीचा हप्ता चुकला तर बँकेकडून तुम्हाला दंड आकारला जातो. दंडाची ही रक्कम 2% इतकी असू शकते.
मुदतीपूर्वी कर्जाची परत फेड - foreclosure of loan
तुम्ही एखाद्या तात्पुरत्या अडचणीच्या कालावधीसाठी वैयक्तिक कर्ज घेतले असेल. त्यानतंर तुमची गरज पूर्ण होऊन काही वेळेस तुमच्याकडे आवश्यक भांडवल उपलब्ध होते. त्यामुळे तुम्ही घेतलेले वैयक्तिक कर्ज पू्र्णपणे भरण्याचा विचार करता. मात्र, अशा वेळी तुम्हाला कर्ज घेताना निवडलेल्या मुदतीपूर्वी कर्जाजी परतफेड करण्यासाठी बँकेकडून अतिरिक्त शुल्क आकारले जाते. बँककडून प्रीपेमेंट दंड म्हणून सुमारे 2-4% अतिरक्त शुल्क आकारले जाते.
कर्ज खात्याची प्रत- Duplicate statement charges
वैयक्तिक कर्ज घेतल्यानंतर जर तुम्हाला तुमच्या कर्ज खात्याचे स्टेटमेंट पाहिजे असेल तर बँकेकडून त्यासाठी देखील अतिरिक्त शुल्काची आकारणी केली जाते. अशा प्रकारचे शुल्क हे संबंधित बँकेच्या नियमांनुसार ठरलेले असते. ते किमान 200 रुपये ते 500 रुपयांपर्यंत असू शकते. याशिवाय बँकेकडून काही वेळा जीएसटी चार्जेसची आकारणी केली जाते.