पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झालेले अनेक तरुण तरुणी नोकरीच्या शोधात आहेत. व्यावसायिक शिक्षण किंवा फक्त डिग्री घेऊन नोकरी मिळत नाही. कंपन्यांकडून सध्याच्या स्पर्धात्मक वातावरणात एकापेक्षा जास्त कौशल्ये असणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्राधान्य देण्यात येत आहे. त्यामुळे फ्रेशर्सकडे जर सॉफ्ट स्किल्स असतील तर त्याचा चांगला पगार मिळण्याची शक्यता असते. या लेखात पाहूया कोणती सॉफ्ट स्किल्स फ्रेशर्सकडे हवीत.
पुस्तकी ज्ञान आणि टेक्निकल नॉलेज जॉब मिळवण्यासाठी पुरेसे नाही. कंपन्या कर्मचाऱ्यांमध्ये सॉफ्ट स्किल देखील पाहतात. सध्या तंत्रज्ञानात वेगाने बदल होत आहेत. सॉफ्ट स्किल्स शिकण्याचे फ्रेशर्सपुढे आव्हान आहे. कारण, अनुभवी कर्मचाऱ्यापेक्षा फ्रेशर्सला जास्त अडचणींचा सामना करावा लागतो. 2030 पर्यंत एकूण उपलब्ध नोकऱ्यांपैकी दोन तृतीयांश नोकऱ्या या सॉफ्ट स्किलसंबंधीत असतील, असे डेलॉइट या आघाडीच्या कर्मचारी सेवा पुरवणाऱ्या कंपनीने म्हटले आहे. त्यामुळे तरुणांनी ही कौशल्य आत्मसात करणं अत्यंत गरजेचं आहे.
मिळून काम करण्याचे कौशल्य (Collaboration)
कॉर्पोरेटमध्ये कोणत्याही टास्क किंवा प्रकल्पावर काम करताना मिळून काम करावे लागते. त्यामुळे सहकार्याची भावना असावी लागते. फक्त तुम्ही कार्यक्षम असून चालत नाही तर टीमला बरोबर घेऊन पुढे जावे लागते. सर्वजण योगदान देतात तेव्हाच काम यशस्वी होते. वेगवेगळी कौशल्ये, शिक्षण, नॉलेज असणारे व्यक्ती एकत्र येतात तेव्हा काम आणखी नीट होते. मुलाखत घेताना तुम्ही इतरांसोबत कशा प्रकारे जुळवून घेता किंवा याआधी टीमवर्कमध्ये केलेली मोठी कामगिरी नक्की नमूद करा.
निर्णायकता (Decisiveness)
कठीण परिस्थितीत ठामपणे निर्णय घेणारे कर्मचारी कंपन्यांना हवे असतात. झटपट निर्णय घेणारे कर्मचारी हवे असतात. त्यामुळे परिस्थिती समजून घेऊन तत्काळ निर्णय घेता यायला हवा. हे एका दिवसात जमणार नाही. मात्र, सरावाने, अनुभवाने निर्णायकता नक्की येईल. एखाद्या प्रश्नाच्या मुळाशी जाणे आणि तार्किक विश्लेषणात्मक विचार करण्याच्या क्षमता यासाठी गरजेची आहे. माहितीच्या आधारे (डेटा) निर्णय घेण्याची क्षमताही कर्मचाऱ्यांमध्ये हवी. मुलाखतीवेळी तुम्ही जे काही बोलाल ते माहितीच्या आधारावर बोला.
सर्जनशीलता
सर्जनशीलता ही फक्त कला आणि चित्रपट क्षेत्रापुरतीच मर्यादीत नाही. कॉर्पोरेट कंपन्या प्रत्येक अडचणीवर सर्जनशील उत्तर शोधत असतात. प्रश्नाकडे पाहण्याचे अनेक दृष्टीकोन तुमच्याकडे हवेत. क्रिएटिव्हीटी एका दिवसात शिकता येत नाही. मात्र, अनुभव, निरिक्षण, विविध पैलूंचा बारकाईने अभ्यास करुन तुम्ही क्रिएटिव्ह बनू शकता.
संभाषण कौशल्य (Strong communication)
काम करत असताना कर्मचाऱ्यांना त्यांच्या टीममेट सोबतच तसेच इतर अनेक विभागांशी संपर्क साधावा लागतो. ग्राहक, कंपनीचे कंत्राटदार, वरिष्ठ अधिकारी सर्वांशी बोलावे लागते. सर्वांसमोर प्रेझेंटेशन द्यावे लागते. तेव्हा संभाषण कौशल्य अत्यंत कामाला येते. मोजक्या शब्दात मात्र स्पष्ट, अचूक बोलता येणे हे कौशल्य आहे. अन्यथा समोरच्या व्यक्तीचा गैरसमज, मुद्दा न समजणे, माहितीचा विपर्यास होण्याची शक्यता असते. संभाषण कौशल्य तुम्ही अनुभवाने शिकू शकता. त्यासाठी आतापासूनच कामाला लागा.
समायोजन
मागील पाच किंवा दहा वर्षात तुमच्या आजूबाजूला किती बदल झाले आहेत याचा विचार करुन पाहा. मग तुम्हाला लक्षात येईल की हा वेग दिवसेंदिवस वाढत जात आहे. तंत्रज्ञान, कंपन्यांची काम करण्याची पद्धत, कौशल्ये, गरजा बदलत आहेत. त्यानुसार तुम्हाला स्वत:मध्ये बदल करून घ्यावे लागतील. त्यामुळे लवचिक विचारसरणी गरजेची आहे. कोणत्याही परिस्थितीत स्वत:ला जुळवून घेण्याचे कौशल्य तुमच्यात हवे. मुलाखत देताना तुम्ही कशा पद्धतीने समायोजन करू शकता, यावर भर द्या.
भावनिक बुद्धिमत्ता (Emotional intelligence)
फक्त हातात दिलेले काम करता येणे कंपन्यांना अपेक्षित नाही. तुमच्याकडे भावनिक बुद्धिमत्ताही हवी. दुसऱ्यांना समजून घेणे, भावनांना आवर घालणे, रागावर नियंत्रण, इतरांप्रती सहानुभूती सुद्धा गरजेची आहे. काम करताना सहकाऱ्यांसोबत चांगले संबंध निर्माण व्हावेत यासाठी भावनिक बुद्धिमत्ता मदतीला येते. कठीण परिस्थिती हाताळताना फक्त बुद्धिमत्ता कामी येत नाही. त्यासाठी सर्वांना सोबत घेऊन पुढे जाण्याची तयारी असावी. अनुभवाने हे कौशल्य तुमच्यात येऊ शकते.
जर तुमच्यात वरील सॉफ्ट स्किल्स असतील तर तुम्हाला नोकरीमध्ये चांगला पगार मिळण्याची शक्यताही जास्त असते. समोरच्या व्यक्तीला पटवून देण्यासाठी संभाषण कौशल्य आधीपासून तुमच्यात असेल तर मनासारखा पगार मिळण्यात अडचण येत नाही. तसेच कंपनी अशा व्यक्तींना हायर करण्यासाठी उत्सुक असते. त्यामुळे फ्रेशर्सनी या मुद्द्यांकडे विशेष ध्यान द्यायला हवे.