Tirumala Tirupati Devasthan : तिरूमला तिरूपती देवस्थान हे दिवसेंदिवस श्रीमंत मंदिर होत चालले आहे. भाविकांद्वारे अर्पण केले जाणारे रोख पैसे आणि सोन्याच्या दागिन्यांमुळे तिरूपती देवस्थानाच्या संपत्ती वाढत आहेत. मंदिर संस्थानाने बॅंकेत जमा केलेल्या बचतीवरही संस्थानाला भरपूर व्याज मिळत आहे. या उत्पन्नामुळे तिरूमला तिरूपती देवस्थानाची एकूण संपत्ती अडीच लाख कोटी (2.5 Cr) रुपये इतकी झाली.
तिरूपती येथील जगप्रसिद्ध असलेल्या वेंकटेश्वरा मंदिराची एकूण संपत्ती 2.5 लाख कोटी इतकी गणली गेली आहे. ही रक्कम शेअर मार्केटमधील आयटी कंपनी विप्रो (Wipro), फूड आणि ब्रेव्हरेज कंपनी नेस्टले (Nestle) आणि सरकारी कंपन्या ओएनजीसी आणि इंडियन ऑईल कंपनी (ONGC & Indian Oil) या कंपन्यांच्या एकूण भांडवलापेक्षा जास्त असल्याचे दिसून आले.
Table of contents [Show]
10 टन सोनं, 16 हजार कोटी बॅंकेत जमा!
तिरूमला तिरूपती देवस्थानाची स्थापना 1933 मध्ये झाली होती. देवस्थानाच्या या एकूण संपत्तीत बॅंकेत ठेवण्यात आलेले 10.25 टन सोनं, 2.5 टन सोन्याचे दागिने, सुमारे 16 हजार कोटी कोटी रुपये बॅंकेत जमा आणि देशभरात 960 ठिकाणी मंदिर संस्थानाची मालमत्ता आहे. या सर्व संपत्तीची एकूण किंमत 2.5 लाख कोटी इतकी आहे.
शेअर मार्केटमधील नामांकित कंपन्यांपेक्षा जास्त मूल्य!
शेअर मार्केटमधून मिळालेल्या माहितीनुसार, मंदिराच्या सध्याच्या संपत्तीचे मूल्य हे भारतातील अनेक ब्ल्यू चीप कंपन्यांपेक्षा जास्त असल्याचे दिसून येते. बंगळुरूस्थित मेन ऑफिस असलेल्या विप्रो कंपनीचे मार्केटमधील भांडवल 2.14 लाख कोटी आहे. शुक्रवारी (दि.4 नोव्हेंबर) मार्केट बंद झाल्यानंतरची ही आकडेवारी आहे. तर अल्ट्राटेक सिमेंट कंपनीचे भांडवल मूल्य 1.99 लाख कोटी आहे. स्वित्झर्लंडमधील नेस्टले कंपनीच्या भारतीय युनीटचे मूल्य 1.96 लाख कोटी आहे. तसेच केंद्र सरकारच्या मालकीच्या असलेल्या ओएनजीसी (ONGC) आणि इंडियन ऑईल कॉर्पोरेशन (Indian Oil Corporation – IOC) या कंपन्यांसोबतच एनटीपीसी लिमिटेड, महिंद्रा आणि महिंद्रा, टाटा मोटर्स, कोल इंडिया लिमिटेड, वेदांता आणि यासारख्या अनेक कंपन्या आहेत. ज्यांचे मार्केटमधील भांडवल तिरूपती देवस्थानाच्या संपत्तीपेक्षा कमी आहे.
फक्त 12 कंपन्यांची मार्केट व्हॅल्यू मंदिरापेक्षा अधिक!
सध्या मार्केटमधील अंदाजित फक्त 12 कंपन्यांचे मार्केट व्हॅल्युएशन तिरूपती देवस्थानाच्या संपत्तीपेक्षा जास्त आहे. यामध्ये भारतीय अब्जाधीश मुकेश अंबानी यांची रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (कंपनी मूल्य 17.53 लाख कोटी), टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेस (कंपनी मूल्य 11.76 लाख कोटी), एचडीएफसी बॅंक (8.34 लाख कोटी), इन्फोसिस (कंपनी मूल्य 6.37 लाख कोटी), आयसीआयसीआय बॅंक (कंपनी मूल्य 6.31 लाख कोटी), हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड (कंपनी मूल्य 5.92 लाख कोटी), स्टेट बॅंक ऑफ इंडिया (कंपनी मूल्य 5.29 लाख कोटी), भारती एअरटेल (कंपनी मूल्य 4.54 लाख कोटी) आणि आयटीसी (कंपनी मूल्य 4.38 लाख कोटी) कंपनीचा समावेश होतो.
2021 पासून मंदिराची मालमत्ता जाहीर करण्यास सुरूवात!
1974 ते 2014 या कालावधीत मंदिर समितीने वेगवेगळ्या ठिकाणच्या 113 मालमत्ता निकाली काढल्या. पण 2014 नंतर एकाही मालमत्तेची विक्री मंदिर समितीने केलेली नाही. राज्य सरकारने मंदिर समितीला दिलेल्या निर्देशानुसार मंदिराच्या विश्वस्त मंडळाने मागील वर्षीही मंदिराचे उत्पन्न जाहीर केले होते. त्यानुसार यावर्षीही मंदिराने 2022मधील उत्पन्न जाहीर केले. ही माहिती तिरुपती देवस्थान मंदिराच्या वेबसाईटवर टाकण्यात आलेली आहे.
तिरूपती देवस्थानाचे 2022-23चे बजेट 3,100 कोटी!
भाविकांकडून केल्या जाणाऱ्या दानधर्मामुळे तिरूमला तिरूपती देवस्थान दिवसेंदिवस श्रीमंत होऊ लागले आहे. भाविकांकडून मोठ्या संख्येने मंदिर देवस्थानाकडे सोन्याची नाणी, दागिने, रूपये, परकीय चलने दान केली जात आहेत. तसेच मंदिर संस्थानाच्या नावाने बॅंकेत जमा असलेल्या ठेवींवरही मंदिर संस्थानाला कोट्यवधी रूपयांचे व्याज मिळत आहे. मंदिर समितीने 2022-23 वर्षाचे वार्षिक बजेट फेब्रुवारीमध्ये सादर केले होते. त्यात मंदिराने 3,100 कोटी रुपयांचे बजेट मांडले होते.
मंदिराच्या बजेटमधून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, बॅंकेत ठेवलेल्या ठेवींवर मंदिराला 668 कोटी रुपयांचे फक्त व्याज मिळते. त्याचबरोबर भाविकांकडून दान केल्या जाणाऱ्या रोख रकमेचे मूल्य 1 हजार कोटी रुपये इतके आहे. याशिवाय मंदिरात लावलेल्या हंडीतूनही मंदिराला मोठ्या प्रमाणात सोनं-चांदी, डॉलर, रुपये या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचे दान मिळते.