घराचे नुतनीकरण हा वाटतो तितका साधा-सोपा विषय नाही. नवीन घर घेताना जेवढी तयारी करतो, तेवढीच तयारी घराचे रिनोव्हेशन करताना करावी लागते. एकतर हे रिनोव्हेशन कित्येक वर्ष टिकणारे असते आणि मुळात म्हणजे आपली आवड-पसंती ही या रिनोव्हेशनमधून डोकावत असते. त्यात यासाठी काही कमी खर्च येत नाही. त्यामुळे घर रिनोव्हेट करायचे असेल तर त्याचे सर्वप्रथम आर्थिक नियोजन केले पाहिजे. नाही तर घर रिनोव्हेट होताहोता किती पैसे खर्च होतात. याचा अंदाजच लागत नाही. तर आज आपण घर रिनोव्हेट करताना काय काळजी घ्यायला पाहिजे. त्याचे आर्थिक नियोजन कसे करायचे. घराचे नुतनीकरण करण्याचा योग्य वेळ कोणती? यासाठी कर्ज मिळते का? ते घ्यावे की नाही? याबाबतची माहिती आपण घेणार आहोत.
'घर पहावे बांधून,' अशी आपल्या मराठीत म्हण आहे. ही म्हण खूप काही सांगणारे आहे. कारण घर बांधणे हे वाटते तितके सोपे नाही. त्याची प्रचिती या म्हणीतून दिसून येते. घर बांधण्याबरोबरच, घराचे नुतनीकरण हा सुद्धा एक मोठा टास्क मानला जातो. यात प्रामुख्याने कामे रखडणे. दोन महिन्यात काम पूर्ण होईल, असे आश्वासन देऊनही कामासाठी 4-5 महिने लागणे. ठरवलेल्या किंवा नियोजन केलेल्या पैशांपेक्षा अधिक पैसे खर्च होतात. मग शेवटी मनस्ताप करावा लागतो. तो लागू नये, यासाठी त्याचे नियोजन करणे गरजेचे आहे. नियोजन करताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजेत. याची माहिती आपण घेणार आहोत.
Table of contents [Show]
नूतनीकरण म्हणजे नेमके काय करायचे?
घराचे नुतनीकरण करायचे म्हणजे नेमके काय करायचे? याची स्पष्टता असणे खूप गरजेचे आहे. कारण घराचे नुतनीकरण करत असताना किती खर्च होत आहे? यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. कारण बऱ्याचवेळा घराच्या किमतीपेक्षा घराच्या नुतनीकरणावर पैसे जास्त खर्च होण्याचा संभव असतो आणि तो ऐनवेळी नाकारता आला नाही तर नाकापेक्षा मोती जड होण्याची शक्यता अधिक असते. हे होऊ नये असे वाटत असेल तर जी कामे करायची आहेत. त्याची यादी करूनच ती मार्गी लावावी.
नुतनीकरणाचा खर्च किती असावा
घराचे नुतनीकरण किती रुपयांपर्यंत करायचे? यावर ठाम असणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ, घराच्या नुतनीकरणासाठी तुम्ही जर 5 लाखांचा खर्च निश्चित करत आहात. पण घराचे काम झाल्यावर तो खर्च जर 6 किंवा 7 लाखावर जात असेल तर तुमचे नियोजन फसले असे समजावे. घराच्या नुतनीकरणाचे काम करताना फायनल बजेट ठरवून त्यानुसार, कोणत्या गोष्टीवर किती खर्च करावा. याची याद करावी. कारण मार्केटमध्ये अनेक प्रकारच्या, क्वॉलिटीच्या वस्तू उपलब्ध असतात. त्यानुसार सतत बजेट बदलू शकते. ते होऊ नये यासाठी नुतनीकरणासाठी लागणाऱ्या वस्तुंच्या किमतीवर ठाम राहा. तसेच अंदाजित खर्चापेक्षा 20 ते 25 टक्के रक्कम हाताशी जास्त ठेवा.
नुतनीकरणासाठी पैसे कसे उभारणार
घराच्या नुतनीकरणाचा खर्च हा जमा केलेल्या निधीतून करणार की, त्यासाठी मार्केटमध्ये उपलब्ध असलेल्या योजनांतून कर्ज घेणार? किंवा कोणाकडून उसने पैसे घेऊन करणार? याची स्पष्टता असणेही खूप गरजेचे आहे. थोड्या पैशांसाठी कर्ज घेणे संयुक्तिक नाही आणि जरी कर्ज घेतले तरी ते किती दिवसांत फेडणार याचीसुद्धा स्पष्टता किंवा नियोजन असणे गरजेचे आहे. अन्यथा घराच्या नुतनीकरणासाठी केलेला खर्च डोईजड होऊ शकतो.
बॅंका नुतनीकरणासाठी कर्ज कसे देतात?
बहुतेक बॅंका या घराचे रिपेअरिंग, सुधारणा यासाठी वेगवेगळ्या व्याजदराने कर्ज देतात. पण या कामांमध्ये बॅंकेचे काही ठोकताळे असतात. जसे की, टेरेसच्या वॉटर प्रूफिंगसोबत बाहेरील बाजुची दुरूस्ती, किचन व इतर ठिकाणच्या टाईल्स, फ्लोरिंग बदलणे, प्लंबिंग आणि इलेक्ट्रिकलची कामे, घराच्या खिडक्या, दारे, ग्रील आदी कामांचा समावेश असतो. याचा प्रामुख्याने विचार करणे गरजेचे आहे.
नुतनीकरणादरम्यान राहण्यासाठी पर्यायी जागा आहे का?
नुतनीकरणाचे काम किती दिवस चालते. याचा पूर्वअंदाज असला तरी ते तेवढ्याच वेळेत पूर्ण होईल याची शाश्वती नसते. त्यामुळे नुतनीकरण सुरू असताना इतर ठिकाणी राहण्याची जागा शोधताना त्याचे रितसर अॅग्रीमेंट करावे आणि पर्यायी जागा शोधताना ती जवळचीच शोधावी. त्यामुळे घरात सुरू असलेल्या कामावर लक्ष ठेवण्यास मदत होईल. यासाठी लागणारा ट्रान्सपोर्टचा खर्च, सामानाची ने-आण करणाऱ्यांचा खर्च असे सर्व प्रकारचे खर्च लक्षात घेऊन जवळच पर्यायी जागा निवडावी.