Vodafone Idea Crisis: टेलिकॉम जायंट जिओ आणि एअरटेलच्या स्पर्धेपुढे व्होडाफोन आणि आयडिया (वी - Vi) कंपनी सपशेल आडवी झाली आहे. दिवसेंदिवस Vi चे ग्राहक कमी होत आहेत. कंपनीवर कर्जाचा डोंगर उभा राहिला असून नव्याने कर्ज देण्यास बँका आणि गुंतवणूकदार तयार नाही. आता छोट्या मोठ्या कर्जासाठीही बँका हमी देण्यास तयार नाहीत. त्यामुळे कंपनीचे व्यवहार अडकून पडले आहेत.
जिओ आणि एअरटेल या दोनच टेलिकॉम कंपन्यांमध्ये आता स्पर्धा सुरू असून व्होडाफोन आयडियाचे ग्राहक कमी होत आहेत. नेटवर्क सक्षम करण्यास कंपनीकडे पुरेसा पैसा नाही. तसेच गुंतवणूकदारही पैसे लावण्यास तयार नाही. त्यामुळे वी कंपनीची आर्थिक स्थिती खालावली आहे.
बँक हमी देण्यास वित्तसंस्थांचा नकार
कोटक महिंद्रा बँकेने वी कंपनीला बँक हमी देण्यास नकार दिला आहे. कर्जदारांना अशी बँक हमी आवश्यक असते. (Vodafone Idea Crisis) तसेच दूरसंचार मंत्रालयालाही हमी आवश्यक असते. कोटक महिंद्रा बँकेने 99 लाख आणि 32.49 कोटी रुपयांसाठी बँक गॅरंटी देण्यास नकार दिला आहे. कंपनीकडे खेळते भांडवल नसल्यामुळे बँकेने ही हमी देण्यास नकार दिला.
बँक गॅरंटी कशी काम करते?
स्पेक्ट्रम परवाना आणि इतर सुविधांसाठी टेलिकॉम कंपन्या सरकारला शुल्क देतात. मात्र, हे शुल्क देण्यास विलंब झाल्यास बँक गॅरंटी दिली जाते. टेलिकॉम कंपनीने पैसे देण्यास उशीर केल्यास बँक हमीद्वारे सरकार पैसे वळते करून घेऊ शकते. वी कंपनीला अशी बँक गॅरंटी देण्यास आता वित्तसंस्था तयार नाहीत.
सरकारी परवान्याचे पैसे भरण्यासही दिरंगाई
दूरसंचार विभागाकडून टेलिकॉम कंपन्यांना स्पेक्ट्रम आणि इतर सहकार्य पुरवले जाते. यासाठी टेलिकॉम कंपन्यांना सरकारला शुल्क अदा करावे लागते. मात्र, वी कंपनीला ही शुल्काची रक्कम देण्यासाठी पैसे नाही. एकूण शुल्काच्या फक्त 10% रक्कम मागील दोन तिमाहीपासून जमा करण्यात आली आहे. 90% शुल्क अद्यापही प्रलंबित आहे.
2015 साली व्होडाफोन आयडियाचा शेअर 120 रुपयांच्या आसपास होता. मात्र, आता वी चा शेअर्स 8 रुपयांवर ट्रेड करत आहे. जिओ, एअरटेलने 5G सेवा देशात सुरू केली असून वी ने अद्याप 5G सेवा सुरू केली नाही.
व्होडाफोन आयडियावरील कर्जाचा डोंगर किती?
वी कंपनीवर 2023 आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत 2.09 लाख कोटी कर्जाचा डोंगर आहे. यापैकी बँका आणि वित्तसंस्थांकडील कर्जाची रक्कम 11,390 कोटी रुपये आहे. यापैकी 31 मार्च 2024 पर्यंत 8,380 कोटी रुपये कर्ज फेडायचे आहे. मात्र, हे कर्ज फेडण्यास कंपनीकडे पैसे नाहीत.
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            