निसर्गाच्या सान्निध्यात राहून तेथील वेगवेगळ्या पक्ष्यांचा-प्राण्यांचा आवाज, वनस्पतींचा रंग आणि गंध, खळखळ वाजणारे पाणी यांसारख्या विविध गोष्टींचे कुतुहूल प्रत्येकाला वाटत असते. अशातच, ती निसर्गप्रेमी व्यक्ती कोकणकडच्या भागातील असेल तर निसर्गाच्या एक ना अनेक गोष्टी त्या व्यक्तीला सतत खुणावत राहतात.
दापोली तालुक्यातल्या आंजर्ले गावाजवळच असलेले मुर्डी हे एक गाव.. तेथील विनय जोशी यांनी दापोली कृषी विद्यापीठातून वनस्पती, झुडुपे, माती यांच्याही संबंधित असणारे बीएससी हॉर्टिकल्चर पूर्ण केले. त्यानंतर 2000 ते 2010 अशी तब्बल दहा वर्षं मेघालयासारख्या भूमीवर काम केले. काही वर्षांच्या मेहनतीनंतर सुगंधाच्या मोहातून त्यांनी कोस्टल व्हाईब्स (Coastal Vibes) हा अत्तर उद्योग सुरु केला. विनय जोशी यांच्याकडून जाणून घेऊया त्यांच्या या सुगंधी यशस्वी उद्योगाची कथा...
Table of contents [Show]
रंग आणि सुगंध साठवून ठेवण्याच्या विचाराने सुचली व्यवसायाची कल्पना
पूर्वोत्तर भारतात काम सुरू असतानाच मुर्डी परिसर साद घालत होताच. हॉर्टिकल्चर करत असल्यापासून कोकणातील सुपीक जमीन आणि मुबलक पाण्याचा उपयोग करून सुगंधी वनस्पतींची लागवड झाली पाहिजे, असा विचार त्यांच्या मनात होता. सर्वच फुले परिसरात निर्माण व्हावीत जेणेकरून, बाराही महिने चालणारा उद्योग मुर्डी परिसरात सुरु व्हावा, हा विचार विनय यांना अस्वस्थ करत होता. आकर्षक रंगाची निरनिराळ्या गंधांची फुले उमलून कोमेजतात, त्यांचा रंग आणि सुगंध साठवून ठेवता यावा, फुलांवर प्रक्रिया करणारी लहान-लहान युनिट्स निर्माण व्हावीत असे त्यांना वाटायचे. सुगंधी वनस्पतींची किंवा सुगंधी फुले देणाऱ्या फुलझाडांची लागवड करावी आणि त्या फुलांच्या प्रक्रियेतून सोप्या तंत्रज्ञानावर आधारित असा किंवा स्थानीय परिस्थितीला अनुसरून त्या प्रक्रियेत हवे ते बदल करून सर्वांना बाराही महिने चालवता येईल असा उद्योग सुरु करावा, या निर्णयावर विनय ठाम होते.
निसर्ग वैभवाचा वापर करून वेगळं करून दाखवण्याची जिद्द
सुरुवातीच्या काळात विनय यांनी पहिल्या पावसानंतरची माती, त्यात उगवणारे गवत आणि फुले गोळा करायला सुरूवात केली. सध्या त्यांना व्यवसायासाठी लागणाऱ्या एकूण सुगंधी फुलांपैकी निम्मी फुलं त्यांच्या बागेतील असतात तर काही, खात्रीशीर लोकांकडून विकत घ्यावी लागतात. फुलांपासून गंध बनवताना त्यांची आई आणि त्यांनी प्राजक्ताची फुलं गोळा करायला सुरुवात केली. विनय यांनी या फुलांचा द्रवगंध गोळा केला, त्यावर प्रक्रिया करून त्यातून बॉडी स्प्रेची निर्मिती केली.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्थान
स्टार्टअप इंडिया योजनेखाली त्यांनी कोस्टल व्हाईब्स ही कंपनी सुरु केली. गंध आणि अर्कांच्या बाजारपेठेत विनय यांची कोस्टल व्हाईब्स उतरली असून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तिला स्थान मिळाले आहे. इस्लामिक देशांचा दबदबा असणाऱ्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विनय यांनी आव्हान देणारा अस्सल भारतीय गंध बाजारात आणला आहे.
इसेन्स ऑफ कोंकण
फुलांच्या गंधाने मोहित होऊन लोकल पासून ग्लोबल पर्यंत प्रवास करणाऱ्या विनय जोशी यांच्या ‘कोस्टल व्हाईब्स’ इसेन्स ऑफ कोंकण.. या वेबसाईट वर बकुळ, प्राजक्त, मोगरा, निशिगंध, सुरंगी, मृदगंध, केसर यांसारखे विविध परफ्युम, विविध तेल, सुगंधी साबण तसेच कस्टमाइज गिफ्ट बॉक्स सुद्धा उपलब्ध आहेत. कोस्टल व्हाईब्सबाबत अधिक माहितीसाठी तुम्ही 9260241469 या क्रमांकावर संपर्क साधून त्यांच्या विविध प्रोडक्टची माहिती घेऊ शकता.