भारत सरकारकडून पारंपरिक इंधनाचा वापर कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक आणि फ्लेक्स इंधनावर चालणाऱ्या वाहनांच्या वापरास प्रोत्साहन दिले जात आहे. यासाठी सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. सरकारच्या योजनेनुसार देशात सध्या इथेनॉल मिश्रीत इंधनाचा(EBP) देखील वापर वाढत आहे. दरम्यान,आता देशातील पहिली 100% इथेनॉलवर चालणारी कार लॉन्च होणार आहे.
भारतातील पहिली फ्लेक्स इंधन कार-
भारतात फ्लेक्स इंधनाचा वापर करण्यास यापूर्वीच सुरुवात झाली आहे. मात्र, याचा वापर केवळ लिटरमध्ये 20 % इतका केला जात आहे. मात्र, आता केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नातून देशातील पहिली 100% इथेनॉलवर चालणारी कार 29 ऑगस्ट रोजी लॉन्च केली जाणार आहे. ही कार टोयोटा कंपनीकडून सादर केली जाणार आहे. या कारचे वैशिष्ट्ये म्हणजे या कारचे इंजिन हे इथेनॉल आणि पेट्रोलसह इतर इंधनांवरही चालू शकते. विशेष म्हणजे ही कार 40 टक्के वीज निर्माण करू शकणार आहे. फ्लेक्स इंजिनाची ही कार जगातील पहिली BS6 फेज-2 इलेक्ट्रिफाइड कार असेल.
इथेनॉलच्या वापराने होणार फायदा-
देशात सध्य स्थितीत इथेनॉल 60 ते 65 रुपये दराने उपलब्ध होत आहे. त्यातच केंद्र सरकार इंधनाच्या आयातीवर होणार खर्च कमी करण्याच्या तयारीत आहे. दरम्यान, भारताने यापूर्वीच वाहन निर्मात्या कंपन्यांना भविष्यात फ्लेक्स इंजिन बनवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात इथेनॉलच्या वापरामुळे इंधनाच्या खर्चात बचत होणार आहे. तसेच इथेनॉल निर्मितीसाठी शेतकऱ्यांच्या उस मका या सारख्या मालाला देखील चांगला दर मिळणार आहे.
देशभरात 1350 पेट्रोल पंपावर उपलब्ध-
भारताने पेट्रोलचा वापर कमी करण्यासाठी जैवइंधनाचा वापर म्हणजेच इथेनॉल मिश्रित पेट्रोल (EBP) वापर करण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. भारताने आपले E10 लक्ष्य आधीच पूर्ण केले आहे. त्यामुळे आता भारतात E20 इंधन वापरावर भर दिला जात आहे. भारतात सध्या 1,350 पेट्रोल पंपावर इथेनॉल मिश्रित पेट्रोल उपलब्ध करून देण्यात आले आहे. यापुढे 100 % इथेनॉलवर चालणाऱ्या वाहनांचा वापर वाढल्यास इथेनॉलचा देखील वापर वाढणार आहे.