दारिद्र्यरेषेखाली असलेल्या गरिबांना भारत सरकारकडून मोफत अन्नधान्य म्हणजेच रेशन पुरविले जाते. अनेकदा ही सुविधा गरीबांपर्यंत पोहोचत नाही. गरिबांना हक्काचे रेशन मिळवण्यासाठी वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो. रेशन वाटपात कुठल्याही प्रकारचा भ्रष्ट्राचार होऊ नये यासाठी केंद्र सरकारने खबरदारी घ्यायला सुरुवात केली आहे. याच खबरदारीचा आणि मोफत रेशन योजनेचा भाग म्हणून केंद्र सरकारने एक अॅप लाँच केले आहे. या अॅपच्या माध्यमातून आता रेशनकार्ड धारकांना त्यांच्या रेशनची माहिती मिळणार आहे.
काय आहे Mera Ration App?
‘मेरा राशन’ हे एक मोबाईल अॅप असून त्याद्वारे रेशनकार्ड धारक नागरिकांना त्यांना महिन्याला किती आणि कोणते धान्य मिळणार आहे याची माहिती दिली जाणार आहे. कोणत्या दिवशी रेशन दुकानात धान्य पोहोचेल याची देखील माहिती या अॅपवर नागरिकांना दिली जाणार आहे. त्यामुळे वारंवार रेशन दुकानात जाऊन रेशनबद्दलची चौकशी करण्याचा वेळ वाचणार आहे. तसेच नागरिकांना त्यांच्या हक्काचे रेशन देखील विना अडथळा मिळणार आहे.
रेशन दुकानदार परस्पर रेशन धान्य खुल्या बाजारात विकत असल्याच्या तक्रारी सरकारकडे येत होत्या. रेशन धान्याबद्दल पारदर्शकता आणण्यासाठी या अॅपची मदत आता घेतली जाणार आहे. हे अॅप डाउनलोड केल्यानंतर नागरिकांना अनेक प्रकारच्या समस्यांपासून मुक्ती मिळणार आहे. शिधापत्रिकेत कुणाचे नाव टाकायचे असल्यास किंवा काढायचे असल्यास या अॅपचा वापर करता येणार आहे. तसेच पत्ता बदलल्यास नागरिकांना जवळचे रेशन दुकान कुठे आहे हे देखील या अॅपच्या मदतीने कळू शकेल.
अॅप कसे वापराल?
- Google Play Store वरून मेरा राशन (Mera Ration App) मोबाईल अॅप डाउनलोड करा. सेंट्रल एईपीडीएस टीमने तयार केलेले अॅपच अधिकृत असून इतर कुठलेही अॅप डाउनलोड करू नका.
- अॅप डाऊनलोड केल्यानंतर मोबाईल नंबरसह व्हेरिफिकेशन पूर्ण करा.
- मोबाईल नंबरची नोंदणी केल्यानंतर, तुम्हाला तुमचा रेशनकार्ड क्रमांक विचारला जाईल.शिधापत्रिका नंबर टाकून सबमिट करा.त्यानंतर तुम्हाला रेशन कार्डशी संबंधित सर्व माहिती उपलब्ध होईल.
- मेरा राशन अॅप (Mera Ration App) वर गेल्या 6 महिन्यांतील रेशन वितरणाची माहिती तुम्हांला बघता येईल.
शिधापत्रिका धारकांना हवे असल्यास ते देशातील कोणत्याही सरकारमान्य रेशन दुकानातून रेशन खरेदी करू शकतात. तसेच सदर दुकानात कोणकोणत्या वस्तू उपलब्ध आहेत हे देखील या अॅपवर कळू शकेल. मेरा राशन (Mera Ration) अॅप सध्या हिंदी आणि इंग्रजी या दोन प्रमुख भाषांमध्ये उपलब्ध आहे. लवकरच हे अॅप इतर भारतीय प्रादेशिक भाषांमध्येही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.