जमैकाचा ऑलंपिक सुवर्ण पदक विजेता धावपटू आणि वेगाचा बादशाह अशी जगभर ओळख असलेल्या उसेन बोल्ट याला हॅकर्सनी चांगलाच झटका दिला आहे. उसेन बोल्ट याची पेन्शन खात्यातील तब्बल 12 मिलियन डॉलर्स इतकी रक्कम अकाउंट हॅक करुन लूटण्यात आली आहे. या घटनेने क्रीडा विश्वात एकच खळबळ उडाली आहे.
उसेन बोल्ट याचे किंग्जस्टनमधील स्टॉक्स अॅंड सिक्युरिटीज या ब्रोकिंग कंपनीमध्ये इव्हेस्टमेंट आहे. या खात्यावरच हॅकर्सनी डल्ला मारला आहे. बोल्ट याच्या खात्यातून 12 मिलियन डॉलर्स (भारतीय चलनात 98 कोटी रुपये) हॅकर्सने लांबवले आहेत. या खात्यात आता केवळ 12000 डॉलर्स शिल्लक राहिल्याचे बोल्ट याच्या निदर्शनात आले आणि त्याला धक्काच बसला. या खात्यातील रक्कम ही बोल्ट याची आयुष्याची जमापुंजी होती आणि ती त्याने निवृत्तीसाठी जपून ठेवली होती. मात्र ही रक्कम खात्यातून अचानक गायब झाल्याने बोल्ट आर्थिक संकटात सापडला आहे. ब्रोकर कंपनीने हे पैसे परत केले नाही तर कोर्टात धाव घेण्याची तयारी केल्याचे बोल्ट याच्या वकिलाने म्हटले आहे.
ही बातमी सगळ्यांनाचा धक्का देणारी आहे. विशेष म्हणजे बोल्ट याच्यासाठी खूपच वेदनादायी बातमी आहे. बोल्ट याने निवृत्तीनंतरचे आयुष्य सुखात जगता यावे त्यासाठी केलेली ही बचत होती. त्यामुळे कंपनीने बोल्टच्या खात्यातून गायब झालेले पैसे परत करावे, अशी मागणी बोल्ट याचे वकिल लिंटन पी. गॉर्डन यांनी केली आहे. पैसे परत न केल्यास कोर्टात जाण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. या घटनेबाबत लिंटन पी. गॉर्डन यांनी फॉर्च्युन मॅगझीनशी बोलताना ही माहिती दिली.
जमैकामध्ये सरकारी आणि पोलीस यंत्रणांची झोप उडाली
उसेन बोल्टची आर्थिक फसवणूक झाल्यानंतर जमैकामध्ये सरकारी आणि पोलीस यंत्रणांची झोप उडाली आहे. जमैकन पोलीसांनी यात लक्ष घातले असून स्टॉक्स अॅंड सिक्युरिटीज या ब्रोकिंग कंपनीची चौकशी सुरु आहे. जमैकाचे फायनान्स मिनिस्टर नायगेल क्लार्क यांनी स्टॉक्स अॅंड सिक्युरिटीज कंपनीला जबाबदार धरले आहे. दरम्यान, स्टॉक्स अॅंड सिक्युरिटीज या ब्रोकिंग कंपनीने या आर्थिक फसवणुकीमध्ये माजी कर्मचाऱ्याचा हात असण्याची शक्यता व्यक्त केली आहे. कंपनी यापुढे गुंतवणूकदारांच्या खात्यांच्या सुरक्षेबाबत अधिक सतर्क राहण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.