कोरोना काळात आणि त्यानंतर भारतात खऱ्या अर्थाने डिजिटल पेमेंट्सना (Digital Payment) भारतात चालना मिळाली. आणि युपीआय पेमेंट्सचं (UPI Payments) प्रमाण वाढलं. आता एका खाजगी संस्थेनं केलेल्या सर्वेक्षात युपीआय पेमेंट्स प्रणाली निम शहरी आणि ग्रामीण भागातही वाढलेली दिसून येतेय.
खासकरून किराणा मालाच्या दुकानांमध्ये झालेल्या युपीआय पेमेंट्सची संख्या गेल्यावर्षीच्या तुलनेत तब्बल 650% नी वाढली आहे. पे निअरबाय या डिजिटल नेटवर्क कंपनीने हे सर्वेक्षण केलं आहे. आणि जानेवारी ते ऑक्टोबर पर्यंत निम शहरी आणि ग्रामीण भागातील बँकांमध्ये जमा झालेल्या डेटाच्या आधारे आपले निष्कर्ष नोंदवले आहेत. ग्रामीण भागातही मध्यमवर्गात कॅशलेस व्यवहार (Cashless Transactions) सुरू झाल्याचं हे द्योतक आहे.
विविध दुकानांमध्ये क्रेडिट, डेबिट कार्डासाठी वापरल्या जाणाऱ्या स्कॅनरला मायक्रो एटीएम (Micro ATM Machine) असं म्हणतात. या यंत्राची मागणी ग्रामीण भागात तब्बल 8%नी वाढली. आणि त्या मार्फत होणारे व्यवहार 27%नी वाढले आहेत.
या अहवालातले काही ठोस निष्कर्ष बघूया,
- रिटेल काउंटर्सवर होणाऱ्या ऑनलाईन पेमेंट्समध्ये 25% मूल्यवाढ आणि 14%ची आकार वाढ
- त्यामुळे मायक्रो एटीएम आणि MPoS उपकरणांच्या मागणीत 25% वाढ
- NBFC तसंच इतर वित्तीय संस्थांनी केलेल्या ईएमआय (EMI) वसुलीत 200% हून जास्त वाढ (ग्रामीण अर्थव्यवस्था हळू हळू रुळावर येत असल्याचं द्योतक)
- वेगवेगळी बिलं भरण्यासाठी ऑनलाईन पेमेंटच्या प्रमाणात 12%ची मूल्य वाढ आणि 10%ची आकार वाढ ·
याव्यतिरिक्त काही मजेशीर निष्कर्षही अहवालात नोंदवण्यात आले आहेत. ग्रामीण आणि निम शहरी भागात मोबाईल रिचार्ज करण्याचं प्रमाण गेल्यावर्षीच्या तुलनेत 18%ची वाढ झालीय. सणासुदीच्या हंगामात फ्लाईट बुकिंगमध्ये 8% तर रेल्वे बुकिंगमध्ये 6% वाढ नोंदवली गेली आहे. आणखी एक विशेष महत्त्वाची गोष्ट म्हणजे संध्याकाळी सहा ते रात्री बारा वाजता झालेले बँकिंग व्यवहार हे एकूण व्यवहारांच्या 32% होते. बँकेचे कामाचे तास संपल्यानंतर झालेले व्यवहार हे निम शहरी आणि ग्रामीण भागापर्यंत ऑनलाईन बँकिंग आणि आर्थिक व्यवहार पोहोचल्याचं चिन्हच म्हणावं लागेल.
OTT सेवांची वर्गणी, ऑनलाईन गेमिंग तसंच ऑनलाईन शिक्षणासालाही लोकांनी पसंती दिली आहे. अशा व्यवहारांमध्ये वाढच झाली आहे.