मुंबई सारख्या शहरात रेल्वेचा प्रवास हा नित्याचाच आहे. तसेच बाहेर गावी जाताना देखील स्वस्तातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था म्हणून रेल्वेच्या प्रवासाल प्राधान्य दिले जाते. तुम्ही देखील रेल्वेने प्रवास करत असाल तर ज्या प्रमाणे तुम्हाला रेल्वे तिकिटाचे दर माहित असतात. त्याप्रमाणेच तुम्हाला रेल्वेचे नियम मोडल्यावर लावण्यात येणाऱ्या दंडाची रक्कमही किती आहे, हे माहिती असायला हवे. आज आपण प्रवाशांनी रेल्वेचे नियम मोडल्यानंतर किती कोणत्या प्रकारची दंडात्मक कारवाई केली जाते हे जाणून घेऊ...
रेल्वेने प्रवास करत असताना विविध निमयांचे पालन करणे तुमचे कर्तव्य आहे. तसेच रेल्वेकडून निश्चित करण्यात आलेल्या सशुल्क सुविधांचा वापर देखील तुम्ही नियमांप्रमाणे पैसे भरून करणे आवश्यक आहे. मात्र, काही प्रवाशांकडून विना तिकीट प्रवास करणे, प्लॅटफॉर्म तिकीट न काढणे, कचरा टाकणे आणि रेल्वे ट्रॅक ओलांडणे अशा गोष्टी सर्रासपणे केल्या जातात. अशा प्रकारे रेल्वेच्या नियमांचे उल्लंघन केल्यास रेल्वेकडून दंडात्मक कारवाई केली जाते. तसेच काही प्रकरणात तुरुंगवासाचीही शिक्षा होऊ शकते.
रेल्वेचे दंडनीय अपराध कोणते? किती होतो दंड
विना तिकीट किंवा पास प्रवास
रेल्वे प्रवाशांकडून करण्यात येणारा सर्वात सामान्य गुन्हा म्हणजे विना तिकीट प्रवास करणे हा होय. कित्येक प्रवासी रेल्वेचे तिकीट न काढताच प्रवास करतात. मात्र, तिकीट चेकर (TC) कडून तपासणी झाल्यास तुम्हाला दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागते. यामध्ये तुमच्या प्रवास खर्चासह 250 रुपये दंड आकारला जातो. तसेच रेल्वे कायद्याच्या कलम 138 अंतर्गत गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. तसेच टीसीची फसवणूक करून प्रवास केल्यास कलम 137 अंतर्गत 1000 रुपये दंड किंवा 6 महिने कारावास होऊ शकतो.
अलार्म चेन खेचल्यास
एखाद्या प्रवाशाने विनाकारण रेल्वेतील आपत्कालीन अलार्मची चैन ओढल्यास रेल्वे कायदा 141 नुसार 1000 रुपये दंड किंवा एक वर्षाचा तुरुंगवास अथवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात
अपंगासाठी राखीव जागेचा वापर करून प्रवास
जर एखाद्या प्रवाशाने अपंगासाठी राखीव डब्यातून प्रवास केल्यास त्यास रेल्वे कायदा कलम 155A नुसार 500 रुपये दंड किंवा 3 महिने तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.
रेल्वेच्या छतावरून प्रवास केल्यास
काही प्रवासी विनाकारण रेल्वेच्या छतावर बसून प्रवास करतात. अशा प्रकारे प्रवास करणे धोकादायक ठरते त्यामुळे अशा प्रकारचा गुन्हा केल्यास 500 रुपये दंड किंवा 3 महिने तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.
इतर गुन्हे आणि दंड
तसेच इतर अनेक गुन्हे आहेत ज्यांमुळे तुमच्यावर दंडात्मक कारवाई होऊ शकते.यामध्ये अर्ध्या तिकिटावर प्रवास करणे, उच्च श्रेणीच्या डब्यात प्रवास करणे, लहान मुलांचे तिकीट न काढणे या सारख्या गुन्ह्यासाठी देखील रेल्वेकडून 250 रुपयांपर्यंतचा दंड आकारला जातो. तसेच रेल्वेत कचरा करणे- 100 रुपये दंड, पुन्हा दुसऱ्यांदा तोच गुन्हा केल्यास 250 रुपये दंड आणि एक महिना कारावासाची शिक्षा होऊ शकते.