सध्याचा काळ हा तंत्रज्ञानाचा (Technology) आहे. या तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं आपण आपलं आयुष्य सुखकर केलंय. मात्र तंत्रज्ञानाची ही उपकरणं (Devices) महाग आहेत. सर्वसामान्यांना इच्छा असतानाही तो ती खरेदी करू शकत नाही. लॅपटॉपसारखं (Laptop) डिव्हाइस हे रोजच्या कामासाठी अत्यंत महत्त्वाचं बनलंय. अनेक मोठमोठ्या कंपन्यांचे लॅपटॉप उपलब्ध आहेत. त्याचं उत्पादन बाहेरच्या देशांत होतं. भारतातलं प्रमाण कमी आहे. सहाजिकच त्यामुळे त्याची किंमतही अधिकची मोजावी लागते. त्यामुळे देशांतर्गत उत्पादन करण्यास प्रोत्साहन दिलं जाणार आहे.
Table of contents [Show]
देशांतर्गत उत्पादनास प्रोत्साहन
भारतात अॅपलच्या उत्पादनांची निर्मिती आता सुरू झाली आहे. आता सरकार देशात स्वस्त लॅपटॉप, टॅब्लेट आणि संगणकासारखे इतर आयटी हार्डवेअर बनवण्यासाठीही प्रोत्साहन देत असल्याचं पाहायला मिळतंय. यामुळे देशातल्या 2 लाख लोकांना रोजगार मिळण्याची अपेक्षा आहे. नुकत्यात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबतची माहिती दिलीय. सरकारने आयटी हार्डवेअरसाठी 17,000 कोटी रुपयांच्या पीएलआय (PLI) योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला मंजुरी दिल्याचं त्यांनी सांगितलंय. दरम्यान, अशाप्रकारे स्वस्तात लॅपटॉप मिळाल्यास त्याचा सर्वात जास्त फायदा विद्यार्थ्यांना त्याचप्रमाणे तरुणांना होणार आहे.
The Cabinet decision on Production Linked Incentive Scheme – 2.0 for IT Hardware will transform the sector. This scheme will boost employment, strengthen our eco-system for innovation and lead to greater investments. https://t.co/VgbrviH2Bj
— Narendra Modi (@narendramodi) May 17, 2023
पीएलआय योजना सुरू
देशातल्या विविध क्षेत्रांसाठी सरकारनं प्रॉडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह (PLI) ही योजना सुरू केलीय. विविध प्रॉडक्ट्स तयार करणाऱ्या भारतातल्या कंपन्यांना त्यांच्या उत्पादनांच्या आधारावर सरकारकडून लाभ मिळतात, असं या योजनेचं स्वरूप आहे. आयटी हार्डवेअरसाठी याच पीएलआय योजनेनुसार सरकार 17,000 कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद करणार आहे. ही रक्कम पुढच्या 6 वर्षांत खर्च केली जाणार आहे. यामुळे देशातल्या सुमारे 75,000 लोकांना प्रत्यक्ष रोजगार आणि सुमारे 2 लाख लोकांना अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होणार असल्याचं मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलंय.
उत्पादन वाढवणार
पीएलआय या योजनेचा फायदा लॅपटॉप, टॅब्लेट, सर्व पर्सनल कॉम्प्युटर, सर्व्हर आणि इतर लहान आयटी हार्डवेअर उपकरणं बनवणाऱ्या कंपन्यांना मिळणार आहे. देशात दरवर्षी लॅपटॉप, टॅबलेट आणि पर्सनल कॉम्प्युटरचं उत्पादन वाढणार आहे. अशा प्रकारे 3.35 लाख कोटी रुपयांची उत्पादनं तयार केली जातील. या सर्व बाबींसाठी एकूण 2,430 कोटी रुपयांची गुंतवणूकही येणार असल्याचं मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं.
पीएलआय योजनेविषयी...
एप्रिल 2020मध्ये सरकारनं पीएलआय योजना सुरू केली होती. राष्ट्रीय उत्पादन चॅम्पियन तयार करणं आणि 60 लाख नवे रोजगार निर्माण करणं हा उद्देश ठेवण्यात आला. यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 14 प्रमुख क्षेत्रांमधल्या प्रॉडक्शन लिंक्ड प्रोत्साहन (PLI) योजनांसाठी 1.97 लाख कोटी रुपयांच्या खर्चाची घोषणा केली. तर पुढच्या 5 वर्षांसाठी 30 लाख कोटींचं उद्दिष्ट ठेवलं. मार्च 2020मध्ये यापूर्वी घोषित केलेल्या तीन योजनांव्यतिरिक्त सरकारनं नोव्हेंबर 2020मध्ये विविध 10 नव्या पीएलआय योजना सादर केल्या.
आयटी हार्डवेअरसाठी सरकारकडून निधीची तरतूद
आयटी हार्डवेअरसाठीची पीएलआय योजना फेब्रुवारी 2021मध्ये सरकारकडून सुरू करण्यात आली होती. यासाठी सरकारनं 7,350 कोटी रुपयांची तरतूद केली होती. यानंतर हार्डवेअर उत्पादक कंपन्यांनी सरकारला अधिक निधीची विनंती केली होती.