मंगळवारी मध्य-आशियातल्या टर्की (Turkey) देशाला भल्या पहाटे 7.8 रिश्टर तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसला. त्याची तीव्रता इतकी मोठी होती की, एका क्षणात इमारतीच्या इमारती खाली आल्या. आणि तब्बल दहा गावांना याचा फटका बसला. टर्कीच्या पाठोपाठ जवळच्या सीरिया (Syria) देशालाही असाच धक्का बसला.
1970 पासून रिश्टर स्केलवर 6.0 पेक्षा जास्त तीव्रता असलेले फक्त तीन मोठे भूकंप झाले आहेत. तर 7.0 पेक्षा जास्त तीव्रतेचा भूकंप यापूर्वी 1822 मध्ये याच भागात झाला होता. आणि त्या भूकंपात 20,000 लोकांचा बळी गेला होता. या माहितीतून आताच्या भूकंपाचं विदारक चित्र स्पष्ट होईल.
एवढ्या तीव्र धक्क्यामुळे टर्की देशात काय परिस्थिती उद्भवलीय बघूया…
- 7 फेब्रुवारी सकाळ (भारतीय वेळ) पर्यंत मृतांचा आकडा 3,700 वर पोहोचला होता
- टर्की देशात 10 प्रांतांमध्ये, सीरियात 3 प्रांतांमध्ये जनजीवन विस्कळित
- ग्रीस, सायप्रस, जॉर्डन, लेबेनॉन, इराक, जॉर्जिया आणि अर्मेनिया या देशांमध्येही जाणवले धक्के
- टर्कीतली रेल्वे सेवा पूर्णपणे ठप्प
- एक रुग्णालय कोसळल्यामुळे तिथल्या रुग्णांना सीरियामध्ये हलवण्यात आलं
- एवढ्या मोठ्या धक्क्यानंतर देशाची अर्थव्यवस्थाही कोलमडली
- टर्किश लिरा या चलनात काल प्रचंड मोठी घसरण पाहायला मिळाली
- देशातलं अंकारामधल्या विमानतळाची धावपट्टीही उखडली
टर्की लष्कराने आता परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. जागतिक मदतही मिळत आहे. मोठ्या भूकंपानंतर जाणवणाऱ्या धक्क्यांची तयारी आता प्रशासनाने सुरू केली आहे. पण, पहिलाच धक्का इतका मोठा होता की, देशात नेमकं किती नुकसान झालंय आणि भूकंप नेमका किती विनाश घडवून आणणार याची फक्त कल्पनाच आता केली जाऊ शकते.
या पार्श्वभूमीवर मागच्या दहा वर्षांतले जगात आलेले काही विनाशकारी भूकंप पाहूया. त्यातून नुकसानाचा थोडाफार अंदाज आपल्याला येऊ शकेल.
26 डिसेंबर 2004 (आशिया) - इंडोनेशिया जवळ सुमात्रा बेटांवर झालेला हा भूकंप रिश्टर स्केलवर 9.15 तीव्रतेचा होता. हा भूकंप समुद्रात आलेला होता. त्यानंतर जवळच्या इंडोनेशिया, थायलंड, भारत, श्रीलंका आणि इतरही काही देशांमध्ये जोरदार त्सुनामी आली. हा भूकंप आणि त्यानंतर आलेल्या त्सुनामीमुळे बेटच्या बेटं उध्वस्त झाली. आणि या धक्क्यामुळे अब्जावधीच्या मालमत्तेचं नुकसान झालं. तर अडीच लाख लोकांचा जीव गेला. या भूकंपातून झालेल्या धक्क्यातून पुढची काही वर्षं हे देश सावरले नाहीत.
25 एप्रिल 2015 (नेपाळ) - 7.8 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा केंद्रबिंदू जवळ हिमालयात होता. आणि छोट्या नेपाळ देशाचं या भूकंपामुळे जवळ जवळ 8 कोटी अमेरिकन डॉलर इतकं नुकसान झालं. या दशकातला हा सर्वाधिक नुकसानकारक भूकंप मानला जातो. जवळ जवळ 9,000 लोकांचा यात मृत्यू झाला होता. आणि एकट्या काठमांडूमध्ये 6,00,000 लाखांच्या वर इमारती यात धक्कादायक झाल्या.
14 ऑगस्ट 2021 (हैती) - दोन वर्षांपूर्वी कॅरेबियन बेटांजवळ हैतीमध्ये आलेला भूकंपही तीव्रतेनं मोठा आणि विनाशकारी होता. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 7.2 इतकी होती. पण, या धक्क्याने या छोट्या देशातली दीड लाखांहून जास्त घरं पडली. दोन हजारच्या वर लोक मृत्युमुखी पडले. तर 28,000 लोक जखमी झाले.
11 मार्च 2011 (जपान) - इंडोनेशिया प्रमाणेच हा भूकंपही समुद्रात आलेला होता. त्याची तीव्रता 9.0 इतकी होती. त्यानंतर आलेल्या जबरदस्त त्सुनामीमुळे जपानच्या ईशान्य किनाऱ्याचं नुकसान झालं. 15,690 लोकांचा यात मृत्यू झाला, 5,700 लोक जखमी झाले. आणि सगळ्यात मोठं नुकसान फुकुशिमा इथल्या अणुऊर्जा प्रकल्पाचं झालं. या प्रकल्पात पाणी गेल्यामुळे प्रकल्प बंद पडला. इतकंच नाही तर अणूऊर्जा बाहेर पसरण्याचा धोकाही निर्माण झाला होता.
26 ऑक्टोबर 2015 (अफगाणिस्तान) - अफगाणिस्तानच्या ईशान्येला आलेला हा भूकंप रिश्टर स्केलवर 7.8 तीव्रतेचा होता. या भागात वस्ती फारशी नसल्याने झालेली जीवितहानी कमी होती. आणि अफगाणिस्तान तसंच पाकिस्तानच्या अफगाणिस्तान सीमेवर मिळून 400 च्यावर लोकांचा मृत्यू झाला. पण, आधीच तालिबानबरोबर सुरु असलेल्या युद्धामुळे खिळखिळ्या झालेल्या अफगाण अर्थव्यवस्थेवर आणखी ताण पडला.