टर्कीमध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपाने (Devastating Earthquake in Turkey) संपूर्ण जग घाबरले आहे. 1939 नंतरच्या सर्वात मोठ्या भूकंपात 4000 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. 2800 हून अधिक घरे जमीनदोस्त झाली आहेत. टर्कीमधील या आपत्तीमुळे तेथील लोकांचे जगणे कठीण झाले आहे. आधीच तेथील जनता महागाईने हैराण झाली असून (Inflation in Turkey) महागाई 600 टक्क्यांपर्यंत वाढली आहे. बीबीसीच्या रिपोर्टनुसार, टर्कीची अर्थव्यवस्था डळमळीत होत आहे. रस्त्यांवरील महागाई शिगेला पोहोचल्याची परिस्थिती आहे. मात्र लोकांच्या पेन्शनमध्ये आतापर्यंत केवळ 30 टक्के वाढ झाली आहे.
घर भाड्यात कमालीची वाढ
टर्कीमधील सर्वसामान्यांचे जीवन किती कठीण आहे याचा अंदाज तिथल्या घराच्या भाड्यावरून येऊ शकतो. भाडेवाढीबद्दल बोलायचे झाल्यास येथे जे घर 19,700 रुपयांना भाड्याने मिळायचे ते आता 1,31,000 रुपयांच्या जवळ पोहोचले आहे. बीबीसीच्या वृत्तानुसार, टर्कीचे चलन लिरा सातत्याने कमजोर होत आहे. राहणीमानाचा खर्च इतका वाढला आहे की आता फक्त गरीब किंवा खूप श्रीमंत लोकच जगू शकतात. मध्यमवर्ग जवळपास संपला आहे.
अर्थव्यवस्थाही खचली
आता या वेगाने महागाई वाढत आहे, त्यामुळे त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होणे साहजिक आहे. जागतिक बँकेच्या अहवालानुसार, 2013 मध्ये टर्कीचा जीडीपी 957 अब्ज डॉलर होता, जो 2021 मध्ये 819 अब्ज डॉलरवर आला आहे. विशेष बाब म्हणजे टर्कीच्या जीडीपीमध्ये 2013 पासून सातत्याने घसरण सुरू आहे. 2018 ते 2020 दरम्यान हा आकडा 778 वरून 720 वर गेला होता.
अमेरिकेने लादलेल्या निर्बंधांमुळे टर्कीची ही अवस्था
वास्तविक, 2018 सालापासून टर्कीमधील आर्थिक संकट अधिकच गडद होत आहे. अमेरिकेने टर्कीवर लादलेले निर्बंध हे त्याचे प्रमुख कारण होते. त्यानंतर महागाई नियंत्रणात आणण्यासाठी मध्यवर्ती बँक व्याजदरात सातत्याने वाढ करत असली तरी त्याचा फायदा होताना दिसत नाही. आगामी काळात टर्कीची आर्थिक स्थिती आणखी बिघडू शकते, असे मानले जात आहे. आता आधीच ग्रासलेल्या अर्थव्यवस्थेवर एवढी मोठी भूकंपासारखी आपत्ती येणं ही खरोखरच चिंतेची बाब आहे. आणि हे तिथल्या सरकारपुढे नक्कीच सर्वात मोठं आव्हान म्हणून समोर आलं आहे.