Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

ऑनलाईन शॉपिंग वर घाला आळा

ऑनलाईन शॉपिंग वर घाला आळा

तुम्ही ऑनलाईन शॉपिंगवर खूप सारा पैसा खर्च करता का? तर जरूर वाचा हा लेख…

आजकाल तुम्हाला शॉपिंग करण्याचा मुड आला असेल तर उठून दुकानात अथवा मॉलमध्ये जाण्याची गरज नसते. कारण ऑनलाईन शॉपिंग हा सध्या खूपच चांगला पर्याय असून अनेकजण या पर्यायाची निवड करतात. पण अनेकजण ऑनलाईन शॉपिंगच्या इतके आहारी गेले आहेत की दिवसाला ते हजारोपेक्षा अधिक रक्कम खर्च करतात हे त्यांच्या लक्षात देखील येत नाही.             

गेल्या दोन वर्षांत कोरोनाने जगभरात थैमान घातले आहे. भारतात देखील कोरोनाचा प्रचंड फटका बसला आहे. या काळात अनेक महिने दुकानं, शॉपिंग मॉल्स बंद होते. त्यामुळे अनेकजण ऑनलाईन शॉपिंगकडे वळले. ऑनलाईन शॉपिंगमुळे खरा तर तुमचा वेळ वाचतो, तसेच तुमचा प्रवासात खर्च होणारा पैसा देखील वाचतो. त्यामुळे अनेकजण ऑनलाईन शॉपिंग करणे पसंत करतात. पण ऑनलाईन शॉपिंग करताना आपले महिन्याचे बजेट किती आहे, आपल्याला महिन्याभरात कोणकोणता खर्च करायचा आहे, आपण किती रुपयांचे शॉपिंग दर महिन्याला करू शकतो याचा विचार करणे गरजेचे आहे.              

ऑनलाईन शॉपिंग करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.             

ताण दूर करण्यासाठी      

काही लोकांना शॉपिंग करताना प्रचंड आनंद मिळतो. ते ताण दूर करण्यासाठी शॉपिंग करतात. पण या नादात तुम्ही प्रमाणाच्या बाहेर शॉपिंग करत आहात, हेच काहींच्या लक्षात येत नाही. त्यापेक्षा ताण दूर करण्यासाठी घरातल्या घरात चाला, योगासने करा.             

स्वतःला बजेट ठरवून द्या           

शॉपिंग करणं ही वाईट गोष्ट आहे असे म्हणणे चुकीचे आहे. पण शॉपिंग करताना तुम्ही प्रमाणाच्या बाहेर पैसे खर्च करत नाही आहात का... हा प्रश्न स्वतःला विचारणे गरजेचे आहे. महिन्याभरात ठरावीक रक्कमेचेच शॉपिंग करायचे असे ठरवले की कोणतेही टेन्शन येणार नाही.             

शॉपिंग कधी करायचे ते ठरवा            

 काहीजण दिवसभर लॅपटॉप अथवा मोबाईलवर कोणकोणत्या गोष्टींचे शॉपिंग करायचे हेच पाहात असतात. दिवसाच्या सातही दिवस ते केवळ शॉपिंग करतात असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. त्यामुळे आठवडाभर शॉपिंग करणे टाळा. केवळ आठवड्यातील एखाद्याच दिवशी मी शॉपिंग करणार असे ठरवणे गरजेचे आहे.             

सेलच्या काळात खरेदी करा         

सणाच्या दिवशी अनेक शॉपिंग वेबसाईटवर आपल्याला सेल पाहायला मिळतो. त्यामुळे आपल्याला ज्या महागड्या वस्तू खरेदी करायच्या आहेत. त्या वस्तू सेलच्या दरम्यान खरेदी करा. तुम्हाला एमआरपीपेक्षा खूपच कमी किमतीत या काळात वस्तू मिळू शकतात.             

वस्तू कार्टमध्ये ठेवा             

तुम्हाला एखादी वस्तू खरेदी करायचीच आहे असे तुम्हाला वाटत असेल तर ती वस्तू काही दिवस कार्टमध्ये ठेवा आणि त्याकडे दुर्लक्ष करा. पण काही दिवसानंतरही ती वस्तू घ्यावी असे तुम्हाला वाटत असेल तरच ती वस्तू घ्या.             

डेबिट कार्डचा वापर करा        

 अनेकजण ऑनलाईन शॉपिंगमध्ये क्रेडिट कार्डचा वापर करत असल्याने ते मनसोक्त शॉपिंग करतात. क्रेडिट कार्डने पैसे भरल्यानंतर आपल्याला पैसे परत करण्यासाठी काही दिवसांचा अवधी मिळतो. त्यामुळे आपले अधिकचे पैसे खर्च होतात हे लक्षात देखील येत नाही. त्यामुळे क्रेडिट कार्डपेक्षा डेबिट कार्डचा वापर करण्याचा प्रयत्न करा.             

बदलत्या परिस्थितीचा विचार करा             

आजकालच्या कोरोनाच्या परिस्थितीमुळे अनेकजण घरून काम करत आहेत. तसेच लग्न समारंभ, पिकनिक, पार्ट्यांमध्ये खूपच कमी प्रमाणात जात आहेत. त्यामुळे खरंच आपल्याला इतक्या जास्त कपड्यांची गरज आहे का याचा विचार करणे गरजेचे आहे.