रेल्वेच्या ऑनलाईन तिकिट बुकिंगचे आघाडीचे अॅप आणि IRCTC चे अधिकृत एजंट असलेल्या ट्रेनमन अॅपची पालक कंपनी स्टार्क एंटरप्राईसेसमधील 30% हिस्सा अदानी ग्रुपने 3.5 कोटी रुपयांना खरेदी केला आहे. शनिवारी 8 जुलै 2023 रोजी अदानी एंटरप्राईसेसने या व्यवहाराबाबत शेअर बाजारांना माहिती दिली.
गेल्याच महिन्यात अदानी डिजिटल लॅब्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने स्टार्क एंटरप्राईसेस प्रायव्हेट लिमिटेड (Stark Enterprises) या कंपनीतील 100% हिस्सा खरेदी करण्याची घोषणा केली होती. स्टार्क एंटरप्राईसेसचे ट्रेनमन अॅप आहे. ट्रेनमन अॅपवरुन रेल्वे आरक्षण आणि तिकिट विक्री केली जाते. अदानी ग्रुपने रेल्वे तिकिट विक्री सेवेत प्रवेश केल्याने एकच खळबळ उडाली होती. विरोधी पक्षांनी या व्यवहारावर आक्षेप घेतला होता.
अदानी एंटरप्राईसेसने शनिवारी शेअर बाजारांना या व्यवहाराबाबत अपडेट दिले आहेत. त्यानुसार अदानी एंटरप्राईसेसची संपूर्ण मालकी असलेल्या अदानी डिजिटल लॅब्स या कंपनीने स्टार्क एंटरप्राईसेसमधील 29.81% हिस्सा 3.56 कोटी रुपयांना खरेदी केला आहे.
देशात दररोज 1.45 लाख तिकिटे ऑनलाईन बुक होतात. यात जवळपास 81% तिकिटांचे बुकिंग थेट IRCTC च्या वेबसाईट आणि अॅपवरुन होते. 'ट्रेनमन अॅप'चा दैनंदिन तिकिट बुकिंगमध्ये केवळ 0.13% इतका वाटा असल्याचे IRCTC ने म्हटले आहे.
ट्रॅव्हल बुकिंग सेवा क्षेत्रात अदानींची गुंतवणूक
कोळसा, वीज निर्मिती, हवाई सेवा, एफएमसीजी, टेलिकॉम, मिडीया या उद्योगांबरोबच आता अदानी समूहाने ट्रॅव्हल बुकिंग सेवा क्षेत्रात प्रवेश केला आहे. ट्रेनमन अॅपच्या माध्यमातून अदानी ग्रुप रेल्वेच्या ऑनलाईन तिकिट बुकिंग व्यवसायात उतरला आहे. यापूर्वी अदानी ग्रुपने ऑनलाईन ट्रॅव्हल अॅग्रीगेटर फ्लिपकार्ट क्लिअरट्रीप प्रायव्हेट लिमिटेडमध्ये या कंपनीत गुंतवणूक केली होती.
Trainman App बद्दल महत्वाचे मुद्दे
- IIT रुरकीचे ग्रॅज्युएट विनित चिरानिया आणि करन कुमार यांनी रेल्वे तिकिटांचे ऑनलाईन बुकिंग आणि रेल्वेची माहिती देणारे ट्रेनमन अॅप 2011 मध्ये विकसित केले होते.
- Trainman App वर रेल्वे प्रवासासंबधी माहिती, पीएनआर स्टेटस ट्रेनमन अॅपवर चेक करता येतो.
- ट्रेनमन अॅपची मुख्य कंपनी स्टार्क एंटरप्राईस (Stark Enterprises) ही स्टार्टअप आहे. याच स्टार्टअपवर आता अदानी ग्रुपमधील अदानी डिजिटल लॅब या कंपनीने ताबा मिळवला आहे.
- ट्रेनमन अॅप ही IRCTC च्या 32 बिझनेस पार्टनर्सपैकी एक कंपनी आहे. अदानींनी ट्रेनमन अॅपच्या कंपनीवर ताबा मिळवून थेट IRCTC सोबत स्पर्धा करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप विरोधी पक्षाने केला होता.