• 05 Jun, 2023 18:01

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Tourist Online Scam: बनावट टूर कंपनीकडून पर्यटकांची फसवणूक, ऑनलाईन व्यवहार करताना अशी घ्या काळजी

Tourist Online Scam

स्वस्तात विमान प्रवासाने पर्यटन स्थळांना भेटी देण्याची जाहिरात फेसबुकवर बघून महिलांनी जमा केले तब्बल 1 लाख 20 हजार रुपये! परंतु ठरलेल्या दिवशी मुंबई विमानतळावर पोहोचताच टूर ऑपरेटरचा फोन स्विच ऑफ येऊ लागल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. जाणून घ्या सविस्तर प्रकरण...

सध्या देशभरात ऑनलाईन स्कॅमचा सुळसुळाट आहे. नागरिकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जाते आहे. फसवणूक होणाऱ्यांमध्ये ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाण सर्वाधिक आहे.

कल्याण येथील काही महिलांची अशाच प्रकारे फसवणूक केल्याची घटना मागच्या आठवड्यात घडली. फेसबुकवर सक्रीय असलेल्या एका महिलेला फेसबुकवर एक पोस्ट दिसली. या महिलेने तिच्या अन्य दोन मैत्रिणींना सदर फेसबुक पोस्ट शेयर करत, पिकनिकला जाण्याची इच्छा व्यक्त केली.

या पोस्टमध्ये अत्यंत माफक दरात आसाम,गुवाहाटी, इंफाळ,त्रिपुरा सोबत ईशान्य भारतातील अन्य पर्यटन स्थळांना भेटी देण्यासाठी टूर आयोजित केली जाणार असल्याचे समजले. या टूरसाठी प्रत्येकी 40 हजार रुपये खर्च येणार असल्याचे त्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिले होते. तसेच मुंबईहून येण्या-जाण्याचा प्रवास हा विमानाने असेल असे देखील त्यात म्हटले होते. तिन्ही मैत्रिणींनी  पिकनिकला जाण्याचा निर्णय घेतला.

कमी पैशात आणि तेही विमानाने ईशान्य भारताची सैर करता येणार म्हणून या महिला खुश होत्या. फेसबुक पोस्टवर दिलेल्या हरीश सिंग नामक व्यक्तीच्या नंबरवर त्यांनी कॉल केला. या व्यक्तीने तो टूर कंपनीचा डायरेक्टर असल्याचे सांगितले आणि पिकनिकसाठी खूप कमी जागा शिल्लक असल्याची माहिती देखील दिली. बुकिंग फुल होऊ नये म्हणून या महिलांनी टूर बुकिंगसाठी तत्परता दाखवली.

आगाऊ पैसे केले जमा 

स्वस्तात मिळणारे टूर पॅकेज हातातून जायला नको म्हणून या महिलांनी सदर व्यक्तीला पूर्ण पैसे दिले. हरीश सिंग याच्या बँक खात्यात ऑनलाईन पद्धतीने 1 लाख 20 हजार रुपये महिलांनी जमा केले. विमानाचे तिकीट बुक केले असून ठराविक दिवशी तुम्ही मुंबई एयरपोर्टवर पोहोचा,तिथेच तुम्हांला तुमचे तिकीट दिले जाईल आणि इतर सहप्रवासी भेटतील असा निरोप या तीन महिलांना देण्यात आला.

महिलांनी देखील ईशान्य भारताची सफर करण्यासाठी मोठी तयारी केली आणि ठरलेल्या दिवशी त्या मुंबई विमानतळावर पोहोचल्या. महिलांनी हरीश सिंगशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचा मोबाईल स्विच ऑफ असल्याचे त्यांच्या लक्षात आले.

विमानतळावर इतर सहप्रवासी देखील त्यांना आढळले नाहीत. आता मात्र आपली फसवणूक झाल्याचे या महिलांच्या लक्षात आले आणि त्यांनी टिळकनगर पोलीस ठाण्यात जाऊन सदर व्यक्तीच्या नावे फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. या संपूर्ण प्रकरणाचा तपास सध्या पोलीस करत आहेत.

अशी घ्या काळजी!

एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की, जेव्हा केव्हा तुम्ही सोशल मिडीयावर पाहिलेल्या जाहिरातीतून काही आर्थिक व्यवहार करत असाल तर सर्वप्रथम ती सदर कंपनी खरी आहे की बनावट याची खात्री करून घ्या.

सोशल मिडीयावर अनेक बनावट खाती असून सामान्य नागरिकांकडून पैसे उकळण्यासाठी ते वेगवगेळ्या योजना बनवत असतात. बनावट टूर कंपनीचे फेसबुक पेज काढणे सहजशक्य आहे, त्यामुळे कुठलेही आर्थिक व्यवहार करताना त्या कंपनीची संपूर्ण माहिती घ्या.

आगाऊ पैसे कुणालाही पाठवू नका. तसेच पैसे पाठवतच असाल तर कुणाही व्यक्तीच्या वैयक्तिक खात्यावर न पाठवता कंपनीचे अधिकृत बँक खात्याचे तपशील मागून घ्या. अधिकृत बँकेचे तपशील जर आपल्याकडे असतील तर संभाव्य कुठल्याही आर्थिक प्रकरणात आपण थेट बँकेकी देखील मदत घेऊ शकतो. 

आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे, स्वस्तात मिळणाऱ्या कुठल्याही गोष्टीचे आमिष टाळायला हवे. या आमिषापोटी आपले लाखोंचे नुकसान होऊ शकते हे लक्षात ठेवा.