भारतात आर्थिक विषमता मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. याचाच परिणाम वैद्यकीय उपचारांवर देखील होताना दिसून येतो. प्रत्येकालाच चांगल्या आरोग्य सुविधा मिळतात असे नाही. अनेकदा आर्थिक स्थिती चांगली नसल्या कारणाने चांगल्या आरोग्य सुविधांचा लाभ घेत नाही. याचा सर्वाधिक परिणाम लहान मुलांवर होतो.
अनेकदा गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या लहान मुलांना वेळेवर उपचार मिळत नाही. सरकारद्वारे अनेक वेगवेगळ्या आरोग्य व विमा योजना राबवल्या जात असल्या तरीही सर्वांपर्यंत याचा लाभ पोहोचलेला नाही. मात्र, अनेक अशा ना नफा तत्वावर चालणाऱ्या समाजसेवी संस्था आहेत, ज्या लहान मुलांना उपचार मिळावा यासाठी मदत करतात, अशाच काही संस्थांविषयी सविस्तर जाणून घेऊया.
एनजीओ दर्पण (NGO DARPAN)
सर्व स्वंयसेवी, धर्मदाय संस्थांसाठी एकच व्यासपीठ असावे यासाठी एनजीओ दर्पण ही वेबसाइट सुरू करण्यात आली आहे. नीती आयोगाद्वारे ही वेबसाइट चालवली जाते. या वेबसाइटवर देशभरातील अनेक संस्थांची नोंदणी करण्यात आलेली आहे. जवळपास 2 लाखांपेक्षा अधिक स्वंयसेवी संस्थांची माहिती या वेबसाइटवर उपलब्ध आहे. नागरिकांना एकाच ठिकाणी सर्व समाजसेवी संस्थांची माहिती उपलब्ध व्हावी हा एनजीओ दर्पणचा उद्देश आहे.
या समाजसेवी संस्थांद्वारे मिळेल उपचारासाठी आर्थिक मदत
Table of contents [Show]
टाटा ट्रस्ट
आर्थिक स्थिती बिकट असल्याने अनेकांना उपचार घेणे शक्य होत नाही. हॉस्पिटलचा खर्च हा प्रचंड असतो. डॉक्टरांचे शुल्क, महागडी शस्त्रक्रिया, औषधे अशा गोष्टींचा खर्च प्रत्येकाला परवडेलच असे नाही. अशा गरजू लोकांना टाटा ट्रस्टद्वारे आर्थिक मदत केली जाते. या समाजसेवी संस्थेद्वारे वर्ष 2022 मध्ये जवळपास 1900 जणांना आर्थिक मदत करण्यात आली. तुम्ही देखील उपचारासाठी आर्थिक मदत हवी असल्यास https://www.tatatrusts.org/ या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकता. तसेच, igpmed@tatatrusts.org. यावर ईमेल करू शकता.
नित्याशा फाउंडेशन (Nityaasha Foundation)
या समाजसेवी संस्थेद्वारे देखील लहान मुलांना आरोग्य सुविधा पुरवल्या जातात. पुणे येथील ही संस्था प्रामुख्याने मधुमेह झालेल्या लहान मुलांसाठी कार्य करते. 2013 मध्ये या संस्थेची स्थापना झाली. संस्थेद्वारे नियमितपणे मुलांची आरोग्य तपासणी, मधुमेह तपासणी केली जाते. तसेच, आवश्यक इन्सुलिन, इंजेक्शन, ग्लुकोमीटर देखील मोफत दिले जातात
SOFOSH (Society of Friends of The Sassoon Hospitals)
SOFOSH च्या माध्यमातून देखील वेगवेगळ्या वैद्यकीय सुविधा मोफत दिल्या जातात. या समाजसेवी संस्थेद्वारे आर्थिकदृष्ट्या वंचित असलेल्या रुग्णांना वैद्यकीय सुविधा पुरविल्या जातात. त्यांना उपचार, शस्त्रक्रिया, औषधे यासाठी मदत केली जाते.
स्माईल फाउंडेशन
कोणतीही व्यक्ती पैशांभावी उपचारापासून वंचित राहू नये यासाठी वेगवेगळ्या संस्था कार्य करत असतात. त्यापैकीच एक संस्था म्हणजे स्माईल फाउंडेशन. या संस्थेद्वारे ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत वैद्यकीय सुविधा पुरवल्या जातात.
श्री साईबाबा संस्थान ट्रस्टद्वारे कॅन्सर उपचार, शस्त्रक्रिया, रक्ताशी संबंधित आजार अशा विविध आजारांवरील उपचारांसाठी आर्थिक मदत केली जाते. संस्थेद्वारे वर्ष 2021-22 मध्ये 1 कोटी रुपयांपेक्षा अधिकची आर्थिक मदत रुग्णांना करण्यात आली आहे. गरीब व्यक्ती वैद्यकीय उपचाराच्या मदतीसाठी या संस्थेशी संपर्क साधू शकतात.