भारतातील शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च नियामक संस्था विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) परदेशी विद्यापीठांना भारतामध्ये कॉलेज आणि संस्था सुरू करण्यास परवागनी दिली आहे. मात्र, ही जगप्रसिद्ध इंग्लड, अमेरिकेतील विद्यापीठे भारतामध्ये कॉलेज आणि संस्था सुरू करतील का? हा मोठा प्रश्न आहे. कारण, भारतीय विद्यार्थ्यांचा परदेशात शिक्षण घ्यायला जाण्यासाठी चढाओढ लागलेली असते. जर ही विद्यापीठेच भारतात आली तर भारतीय विद्यार्थ्यांना देशात राहून शिक्षण घेता येईल. मात्र, ही जगप्रसिद्ध विद्यापीठे भारतात कॉलेजेस सुरू करणार नाहीत, असे मत शिक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
"भारतामध्ये विद्यापीठाची शाखा सुरू करण्याचा आमचा कोणताही विचार नाही. हार्वर्ड विद्यापीठाच्या बोस्टन शहराबाहेर इतर कोठेही शाखा नाहीत, असे हार्वर्ड बिझनेस स्कूलच्या प्रवक्त्याने सांगितले. मॅसाच्युसेट इन्स्टीटयूट ऑफ टेक्नॉलॉजी (MIT) च्या प्रवक्त्यानेही सांगितले की, भारतात किंवा जगात कोठेही एमआयटीच्या शाखा सुरू करण्याचा आमचा विचार नाही. परदेशातील विद्यापीठांशी आम्ही पार्टनरशीप आणि करार याद्वारे संबंध ठेवतो. मात्र, इतर देशामध्ये कॅम्पस उभारत नाही.
सोबतच जगताली प्रसिद्ध विद्यापीठे जसे की, प्रिंन्सटन, शिकागो बुथ, येल विद्यापीठ, स्टन्डफोर्ड, कॅलटेक, मोनाश विद्यापीठ, ऑस्ट्रेलियन नॅशनल विद्यापीठ यांच्याही शाखा भारतामध्ये सुरु होण्याच्या शक्यता कमी आहेत. युजीसीच्या निर्णयानंतर अद्याप एकाही विद्यापीठाने याबाबत भविष्यातील भारतात येण्याबाबतच्या योजनेबाबत काहीही माहिती दिली नाही. काही आघाडीच्या माध्यमांनी विद्यापीठांशी संपर्क साधला असता कोणतेही उत्तर मिळाले नाही. यावरून भारतामध्ये विद्यापीठ सुरू करण्यास बड्या विद्यापीठांना रस नसल्याचे दिसून येते.
परदेशी विद्यापीठे भारतामध्ये पदीवपर्यंच्या शिक्षणासाठी शाखा सुरू करू शकतात. पदव्युत्तर शिक्षण देण्यासाठी विद्यापीठे येणार नाहीत. कॉमवेल्थ देशांतील विद्यापीठे जसे की, इंग्लंड, ऑस्ट्रेलियातील विद्यापीठे भारतात संस्था सुरू करण्याची शक्यता जास्त आहे. कारण, या विद्यापीठांची नियमावली लवचिक आहे. या तुलनेत अमेरिकेतील विद्यापीठांचे नियम अत्यंत कठोर असल्याने त्यांची भारतात शाळा कॉलेज सुरू करण्याची शक्यता कमी आहे.
भारतामधून दरवर्षी लाखो विद्यार्थी परदेशात शिकायला जाण्याची अर्ज करतात. उच्च शिक्षणासाठी अमेरिका, इंग्लड, ऑस्ट्रेलिया या देशांना भारतीय विद्यार्थी पसंती देतात. मागील दोन वर्षांपासून यात झपाट्याने वाढ होत आहे. मागील वर्षी भारतातून १ लाख २५ हजार विद्यार्थी शिक्षणासाठी परदेशात शिक्षणासाठी गेले. विविध देशांच्या परराष्ट्र व्हिसा कार्यालयात 1 वर्षापर्यंत प्रतिक्षा कालावधी आहे. मोठ्या प्रमाणात अर्ज येत असल्याने व्हिसा कार्यालयांवरील ताण वाढत असल्याचे वृत्त नुकतेच माध्यमांमध्ये आले होते.