गेल्या काही दिवसांपासून बाजारपेठेतील आवक घटल्याने टोमॅटोच्या किमती आवाक्याच्या बाहेर गेल्या आहेत. देशात सरासरी टोमॅटोचा दर 100 ते 120 रुपये प्रतिकिलो झाला आहे. ग्राहकांना सध्या टोमॅटो परवडत नसला तरी शेतकऱ्यांसाठी मात्र टोमॅटो (Tomato) पिकाने सुगीचे दिवस आणले आहेत. मात्र, टोमॅटोला मिळत असलेल्या उच्चांकी दरामुळे कर्नाटकातील एका शेतकऱ्याच्या टोमॅटो पिकाची चोरी झाल्याची घटना घडली आहे.
2.5 लाख रुपयांचा टोमॅटो चोरला
कर्नाटकातील हसन जिल्ह्यातील गोनी सोमनहल्ली गावातील एका शेतकरी महिलेने टोमॅटोचे पीक घेतले आहे. सध्या टोमॅटोला जास्त भाव मिळत असल्याने मंगळवारी रात्री चोरट्यांनी या महिलेच्या शेतातून सुमारे अडीच लाख रुपये किमतीची 50 ते 60 पोती टोमॅटो चोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पीडित शेतकरी महिलेने पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. धरणी असे तक्रारदार शेतकरी महिलेचे नाव आहे.
चोरीसह उरलेल्या पिकाचेही नुकसान
शेतकरी महिला म्हणाली की, आम्ही बीटचे उत्पादन घेतले होते. मात्र त्यामध्ये आम्हाला नुकसान सहन करावे लागले. त्यामुळे आम्ही कर्ज काढून टोमॅटो पिकाची लागवड केली होती. सध्या बंगळुरू येथे टोमॅटोला प्रतिकिलो 120 रुपये भाव आहे. त्यामुळे आम्ही पीक काढून मार्केटला पाठवण्याच्या तयारीत होतो. मात्र तत्पूर्वी चोरट्यांनी तोडणीला आलेल्या पिकाची चोरी केली. चोरट्यांनी टोमॅटोची चोरी करताना उरलेल्या पिकाचीही मोठ्या प्रमाणात नासधूस केली असल्याचेही धरणी यांनी सांगितले.
सरकारकडे मदतीची मागणी
दरम्यान, या चोरी प्रकरणानंतर धरणी यांच्या मुलाने चोरट्यांनी टोमॅटोची चोरी केल्याने आमचे जवळपास 2.5 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. याची दखल घेत सरकारने आर्थिक मदत करण्याची मागणी केली आहे. तसेच तातडीने या टोमॅटो चोरीचा तपास करण्याची विनंतीही त्यांनी केली आहे. या चोरी प्रकरणी माहिती देताना हाळेबेडू पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी म्हणाले की, टोमॅटो चोरीचा हा पहिलाच गुन्हा पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे.
इतर राज्यांप्रमाणे कर्नाटकातही अलीकडच्या काळात टोमॅटोच्या किमती झपाट्याने वाढत आहेत. बेंगळुरूमध्ये टोमॅटोचा भाव 101 ते 121 रुपये प्रति किलोग्रॅम आहे. मार्च आणि एप्रिलमध्ये तापमानात अचानक वाढ झाल्याने टोमॅटो पिकांवर कीटकांचा प्रादुर्भाव झाला, त्यामुळे उत्पादनात घट झाली. त्यातच आता पाऊस सुरू झाल्याने उत्पादनात घट झाल्याने बाजारभावात वाढ झाली आहे.