Tips for Safe Internet Banking: इंटरनेट बँकिंगमुळे आपली बँकेची सर्व कामे सोपी झाली आहेत. तसेच वेळेचीदेखील मोठी बचत झाली आहे. आता जवळजवळ सर्वांनाच बँकेत जाण्यापेक्षा "इंटरनेट बँकिंग" ची सुविधा सोयीस्कर वाटत आहे. पण जिथे पैशांचा प्रश्न येतो, तिथे सुरक्षा असणे खूप महत्वाचे आहे. त्यामुळे इंटरनेट बॅंकिगचा वापर करताना खबरदारी घेणे आवश्यक आहे. ही खबरदारी कशी घ्यायची, याबाबत आम्ही खाली एकदम सोप्या भाषेत सांगितले आहे.
पब्लिक वाय-फाय वापरणे टाळा (Avoid using Public Wi-Fi)
शक्यतो, पब्लिक वाय-फायचा वापर करणे टाळा. कारण यामुळे हॅकर्स आपली माहिती सहजपणे घेऊ शकतात आणि त्याचा गैरवापरदेखील करू शकतात. बातम्यांमध्ये अशा कितीतरी बातम्या आपण वाचल्या असतील. त्यामुळे पब्लिक वाय-फाय वापरणे टाळाच. जर आपले इंटरनेट कनेक्शन सुरक्षित नसेल तर हॅकर्स सहजपणे आपल्या संगणक किंवा डिव्हाईसमध्ये मालवेअर (Malware) टाकू शकतात. Malware म्हणजे एक असे सॉफ्टवेअर आहे, जे आपल्या संगणकामधील माहिती ,नेटवर्कला हानी पोचवू शकतात आणि त्याचा दुरूपयोग देखील होऊ शकतो.
अँटी- व्हायरस सॉफ्टवेअर असणे आवश्यक (Must have Anti-Virus Software)
आपल्या malware, बग्ज संगणकात असतात त्यांना अँटी व्हायरस शोधतात आणि काढून टाकतात. त्यामुळे आपल्या संगणकातील माहिती चोरीला जाऊ शकत नाही आणि त्याचा गैरवापर देखील होऊ शकत नाही. त्यामुळे कंप्यूटर व मोबाईलमध्ये अँटी व्हायरस असणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच तुमचा डेटा ही सुरक्षित राहण्याची शक्यता आहे.
इंटरनेट बँकिंगचा पासवर्ड नेहमी बदलणे (Always Change Internet Banking Password)
तुमचे बँकेचे खाते सुरक्षित राहण्यासाठी तुम्ही इंटरनेट बँकिंगचा पासवर्ड वेळोवेळी बदलणे अत्यंत गरजेचे आहे. सोबतच हा पासवर्ड एकदम स्ट्राॅग ठेवणेदेखील तितकेच महत्वाचे आहे. इंटरनेट बँकिंगचा पासवर्ड हा कुणालाही सांगू नका. तुमची बँक ही कधीही तुमची वैयक्तिक माहिती मोबाईल किंवा ई-मेल वर विचारत नाही. त्यामुळे कधीही अशा कॉल किंवा ई-मेलला प्रतिसाद देऊ नका. तुमच्या इंटरनेट बँकेमध्ये लॉगिनसाठी आणि व्यवहारांसाठी (Transaction)नेहमी वेगळा पासवर्ड ठेवा.