Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

TikTok : गोपनीयता कायद्याचा भंग, यूकेमध्ये टिकटॉकला 12.7 दशलक्ष पौंडांचा दंड

TikTok : गोपनीयता कायद्याचा भंग, यूकेमध्ये टिकटॉकला 12.7 दशलक्ष पौंडांचा दंड

TikTok : लहान मुलांच्या डेटाचा गैरवापर केल्याचा ठपका टिकटॉकवर ठेवण्यात आला असून इंग्लंडमध्ये दंडही ठोठावण्यात आलाय. टिकटॉक हे शॉर्ट व्हिडिओ प्लॅटफॉर्म आहे. मात्र येथे मुलांच्या डेटाचा गैरवापर होत असल्याचा आरोप इंग्लंडच्या प्रायव्हसी वॉचडॉगनं केलाय. त्या आधारावर कोट्यवधी डॉलरचा दंडही ठोठावण्यात आलाय.

टिकटॉक (Tiktok) ही चीनमधील कंपनी असून मूळ बाइटडान्सची (Bytedance) उपकंपनी आहे. बाइटडान्स ही तंत्रज्ञाननिषयक काम करते. तर टिकटॉक हे शॉर्ट व्हिडिओ अॅपस्वरुपात काम करणारं प्लॅटफॉर्म आहे. लहान मुलं आणि तरुणांमध्ये याचं विशेष आकर्षण आहे. गोपनीयता कायद्यांतर्गत भारतात टिकटॉकवर दोन वर्षांपूर्वी बंदी घालण्यात आली. अमेरिका आणि युरोपीयन देशांमध्येही अधूनमधून टिकटॉकविषयी अनेक बाबी समोर येत असतात. आता असाच एक वादग्रस्त मुद्दा समोर आलाय. यूकेमधलं (UK) हे प्रकरण असून टिकटॉकला कोट्यवधीचा दंडही ठोठावण्यात आलाय.    

12.7 दशलक्ष पौंड दंड

टिकटॉकच्या माध्यमातून मुलांच्या डेटाचा गैरवापर होत आहे. त्याचबरोबर तरुण यूझर्सची व्यक्तीगत माहिती आणि इतर गोपनीयता नियमांचं उल्लंघन होत असल्याबद्दल ब्रिटनच्या प्रायव्हसी वॉचडॉगनं टिकटॉकला कोट्यवधी डॉलर्सचा दंड ठोठावलाय. या शॉर्ट व्हिडिओ शेअरिंग अॅपला 12.7 दशलक्ष पौंड (15.9 दशलक्ष अमेरिकन डॉलर) इतका दंड ठोठावला आहे. माहिती आयुक्त कार्यालयानं याविषयीची माहिती दिली. तरुणांममध्ये हे अत्यंत लोकप्रिय अॅप आहे. अॅप गोपनीयचा नियमांचा भंग करत असून सायबर सुरक्षिततेसंबंधी सरकार अधिक चिंतेच असल्याचं दिसून येतंय.

ब्रिटनच्या डेटा संरक्षण कायद्याचा भंग

मे 2018 ते जुलै 2020 या कालावधीदरम्यान डेटाचा गैरवापर आणि गोपनीयता भंगाची चौकशी करणार्‍या ब्रिटीश वॉचडॉगनं दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलांना आपलं अकाऊंट काढण्यास परवानगी नाही. अशाप्रकारचा नियमही अॅपनं स्वत:च केलाय. तरीदेखील टिकटॉकनं 2020मध्ये यूकेमधल्या 13 वर्षांखालच्या तब्बल 1.4 दशलक्ष मुलांना अॅप वापरण्याची परवानगी दिली. अकाऊंट सुरू करणाऱ्यांविषयी अॅपनं कुठलीही माहिती तपासून पाहिली नाही आणि अल्पवयीन मुलांची खाती बंद न करता तशीच सुरू ठेवली, असं वॉचडॉगनं म्हटलं आहे. लहान मुलं अॅप वापरत आहेत हे माहीत असूनही, संबंधित अल्पवयीन मुलांच्या पालकांकडून तशी परवानगी मिळवण्यातही टिकटॉक अपयशी ठरलं. विशेष म्हणजे ब्रिटनच्या डेटा संरक्षण कायद्यानुसार या आवश्यक बाबी आहेत. मात्र तरीदेखील अशा अकाऊंट आणि डेटावर कोणतीही प्रक्रिया करण्यात आली नसल्याचा आरोप करण्यात आलाय.

मुलांना अयोग्य अॅक्सेस

भौतिक जगात आमची मुलं जितकी सुरक्षित आहेत तितकी डिजिटल जगात सुरक्षित असायला हवीत. ही खात्री करण्यासाठीच काही कायदे करण्यात आले आहेत. या कायद्यांचं टिकटॉकनं पालन केलं नाही, असं माहिती आयुक्त जॉन एडवर्ड्स यांनी एका प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. टिकटॉकनं मुलांचा वैयक्तिक डेटा गोळा केला आणि वापरला आहे. जिथं मुलांना अयोग्य प्रकारे अॅक्सेस देण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं. या डेटाचा, प्रोफाइल्सचा वापर अयोग्य माहिती पुरवण्यासाठीही केला जाऊ शकतो, असा अरोप एडवर्ड्स यांनी केला.

वॉचडॉगशी असहमत

वॉचडॉगच्या एकूण निर्णयाशी आणि विचारांशी असहमत असल्याचं टिकटॉक कंपनीनं म्हटले आहे. आम्ही 13 वर्षांखालील मुलांना प्लॅटफॉर्मपासून दूर ठेवतो. यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूकदेखील करत असतो. आमची 40,000 जणांची मजबूत सुरक्षा टीम हा प्लॅटफॉर्म सुरक्षित, गोपनीय ठेवण्यासाठी 24 तास काम करत असते, असं टिकटॉकनं निवेदन जारी करत स्पष्टीकरणात दिलंल. संबंधित निर्णयाचा आम्ही विचार करू आणि पुढील प्रक्रियांवर विचार करू असं म्हटलंय. आम्ही आमची साइन-अप प्रक्रिया सुधारली आहे. 13 वर्षांखालील कोणी अॅप वापरत असेल तर त्यावरही काम सुरू असल्याचं स्पष्टीकरण कंपनीनं दिलंय.

अॅपवर बंदीचा विचार

यूझर्सना त्यांचा डेटा कसा संकलित केला जातो, वापरला जातो त्याचप्रमाणे कसा शेअर केला जातो, याबद्दल समाधानकारक उत्तरं टिकटॉकला देता आली नाहीत, असं वॉचडॉगनं म्हटलंय. टिकटॉकला सुरुवातीला सुरुवातीला 27 दशलक्ष-पौंड दंडाचा सामना करावा लागला. मात्र कंपनीनं नियामकांना इतर शुल्क वगळण्यासाठी राजी केल्यानंतर तो कमी करण्यात आला. टिकटॉकला आधीही दंड झाला होता 2019मध्ये टिकटॉक म्यूझिकली (Musical.ly) म्हणून ओळखलं जात होतं. त्यावेळीही मुलांची व्यक्तीगत माहिती बेकायदेशीरपणे संकलन केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. तर 5.7 दशलक्ष डॉलरचा दंड ठोठावण्यात आला होता. दरम्यान, ऑस्ट्रेलियानं सरकारी उपकरणांवरून टिकटॉक हटवलं आहे. तर युरोपियन युनियन ते युनायटेड स्टेस्टपर्यंत काही देश या अॅपवर बंदी घालण्याच्याही विचारात आहेत.