प्रत्येकाची रिफ्रेश होण्याची संकल्पना वेगवेगळी असते. काहींना ‘फॉर अ चेंज’ म्हणून चकचकीत रिसॉर्टमध्ये जाणे आवडते. तर काहींना निसर्गात रमायला आवडते. अर्थात, हा प्रत्येकाचा चॉईस कम्फर्टचा विषय आहे. त्यामुळे आज 21 व्या शतकातही काही जण निसर्गावर भरभरून प्रेम करणारे आहेत. या निसर्गाच्या काळजी आणि प्रेमापोटी चांगली सुरक्षित नोकरी सोडून निसर्गाच्या सान्निध्यात राहून व्यवसाय करणाऱ्या एका तरूणाच्या यशस्वी व्यवसायाबद्दल आपण जाणून घेणार आहोत.
रवि ढोले यांनी आयटी इंजिनिअरिंगचे शिक्षण घेऊन नोकरीस सुरूवात केली होती. ते साधारण 4-5 वर्षात नोकरीमध्ये बऱ्यापैकी सेट झाले होते. पण एका निर्णायक क्षणी त्यांनी नोकरी सोडून व्यवसाय करायचे ठरवले. तुम्हाला आश्चर्य वाटेल रविने झाडांची आवड म्हणून व्यवसायाला सुरूवात केली आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे ज्या कारणामुळे त्याने नोकरी सोडली ते ऐकून तुम्ही ही अवाक व्हाल. रवी एक दिवस ऑफिसमध्ये महत्त्वाच्या प्रोजेक्टवर काम करत होता. त्यावेळी जोराचा पाऊस सुरू झाला. पण ऑफिसमधील सगळे जण महत्त्वाच्या प्रोजेक्टवर काम करत असल्याने त्यांचे पावसाकडे लक्ष नव्हते. एकही जण उठून पाऊस पाहण्यासाठी खिडकीजवळ आला नाही. या अनुभवाने रविचे मन विषण्ण झाले. त्याला माणसाच्या कृत्रिम जगण्याची कीव वाटू लागली आणि त्याने त्याच क्षणी व्यवसाय करण्याचे मनातून ठरवले.
निसर्गाच्या आवडीतून मनासारख्या व्यवसायाची निवड
रविचे वडील रघुनाथ ढोले हे स्वत: झाडांविषयी सामाजिक कार्यात काम करत होते. त्यामुळे रविला लहानपणापासून झाडे आणि निसर्गाबाबतचे बाळकडू मिळत होते. त्यामुळे नोकरी सोडल्यानंतर सर्वप्रथम बॉटनी आणि इकोलॉजिकल मधील कोर्सेस पूर्ण केले आणि वडिलांच्या ‘देवराई फाऊंडेशन’ या ‘नेटिव्ह’ नर्सरीच्या माध्यमातून कामास सुरूवात केली. हे करत असताना रविने याच नर्सरीच्या ठिकाण ‘देवराई अॅग्रो टुरिजम’ सुरू केले. त्याने झाडे आणि निसर्गाशी संबंधित वेगवेगळे कोर्सेस केल्यामुळे लोकांना त्याच्याकडून ‘ऑथेंटिक’ माहिती मिळू लागली. लोकांना ती आवडू लागली. त्यानंतर हळुहळू रवि नर्सरी आणि अॅग्रो टुरिजम अशा दोन्ही गोष्टी एकटाच सांभाळू लागला. त्याच्या या कामात त्याची पत्नी दीपा ढोले सुद्धा मदत करते.
काय आहे ॲग्रो टुरिजम
रविला नेहमी वाटते लोकांनी रिसॉर्ट’ आणि ॲग्रो टुरिजममधील ‘फाईन लाईन’ ओळखायला हवी. प्रत्येकाची रिफ्रेश होण्यासाठी संकल्पना वेगवेगळी असते. काही जणांना चकचकीत ‘रिसॉर्ट’मध्ये जायला आवडते; तर काहीजणांना निसर्गरम्य वातावरणात रमायला आवडते. हाच धागा पकडत रविने ‘ॲग्रो टुरिजम’ ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवली आहे. सिमेंटच्या जंगलात राहणाऱ्या लोकांसाठी रविने ॲग्रो टुरिझमच्या माध्यमातून एका दिवसाचे ‘शेडयुल्ड’ तयार केले आहे.
रविच्या ॲग्रो टुरिझममध्ये ब्रेकफास्ट, लंच आणि हाय-टी चा समावेश केला आहे. तसेच नाश्ता आणि जेवणाचा ‘स्टँडर्ड व्हेज मेन्यू’ ठेवला. जो कोणालाही आवडू शकेल. यामध्ये पोहे, उपीट, शिरा, मिसळ असे अस्सल मराठी नाष्ट्याचे पदार्थ आणि जेवणामध्ये वांग्याचे भरीत, जिलेबी व तत्सम गोड पदार्थ, वेगवेगळ्या चटण्या ठेवल्या आहेत. त्याचबरोबर इथे मुलांना खेळायला जागा तर आहेच. त्याचबरोबर मोठ्यांना निवांतपणे गप्पा मारायला ही जागा आहे. तसेच इथे हुर्डा पार्टीची मज्जा सुद्धा घेता येते. त्याचबरोबर इथल्या नर्सरीत नेचर वॉक घेऊन झाडांबद्दल माहिती दिली जाते आणि भेट म्हणून झाडांची रोपे सुद्धा दिली जातात.
व्यवसायासोबत सामाजिक कार्यात हातभार
ढोले कुटुंबाच्या ‘देवराई फाऊंडेशन’ला तीस वर्षे झाली आहेत. आतापर्यंत त्यांनी 20 ते 25 लाख झाडे डोनेट केली आहेत. त्यांच्याकडे 100 हून अधिक नेटिव्ह झाडे आहेत. त्यात वड, पिंपळ, रिठा अशा अनेक झांडांचा समावेश आहे. याचबरोबर ‘हायड्रोपोनिक शेती’बद्दल सांगितले जाते. मातीतील शेती जास्त महत्त्वाची का आहे, हे सोदाहरण पटवून दिले जाते.
नर्सरीचे जतन करून त्याचे लोकांना महत्त्व पटवून देऊन ‘ॲग्रो टुरिजम’चा मेंटेनन्स साधला जातो. यासाठी रविने काही माणसे कामाला ठेवली आहेत. कामाचा उद्देश स्वच्छ आणि शुद्ध असल्यामुळे रविला कोणत्याही कामात अडथळा येत नाही. उलट निसर्गाचे देणं अधिकाधिक कसे संपन्न होईल, यावर रवि आणि त्यांचे कुटुंब प्रयत्न करत आहे.
स्त्रोत: यशस्वी उद्योजक