AI technology And Jobs : आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाच्या (Artificial Intelligence) वापरामुळे अमेरिकेत गेल्या 1 महिन्यात 4000 हून अधिक कर्मचाऱ्यांना त्यांच्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. जगभरात आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंगचा वापर वाढत चालला आहे. याचा थेट परिणाम लोकांच्या नोकऱ्यांवर दिसू लागला आहे.
Table of contents [Show]
आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांवर प्रभाव
चॅलेंज ग्रे अँड ख्रिसमस नावाच्या अमेरिकन कंपनीच्या अहवालात ही माहिती पुढे आलेली आहे. आर्थिक वर्ष 2022 च्या मे महिन्याच्या तुलनेत 2023 च्या मे महिन्यात नोकरी कपातीची आकडेवारी 80,000 च्या पुढे गेली आहे. आतापर्यंत मार्केट मधील अर्थव्यवस्था आणि जागतिक धोरणांचा आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांवर प्रभाव दिसुन येत होता. मात्र आता, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा प्रभाव देखील आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांवर प्रकर्षाने जाणवू लागला आहे.
लोकांनी नोकऱ्या गमावल्या
मे महिन्यात आर्टिफिशियल इंटेलिजेंसमुळे अमेरिकेत ३९०० हून अधिक लोकांनी नोकऱ्या गमावल्याचं चॅलेंज ग्रे अँड ख्रिसमस नावाच्या अमेरिकन कंपनीच्या अहवालात म्हटलं आहे. असा प्रकार प्रथमच घडला असला तरी, महत्वाची बाब म्हणजे मे महिन्याच्या नोकऱ्या कपातीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वाटा जवळपास 5 टक्के राहिला आहे.
नोकर भरतीवर परिणाम
वर्ष 2016 नंतर, जानेवारी ते मे महिन्यादरम्यान युएस मध्ये कर्मचारी भरती करण्याची संख्या प्रचंड घसरली आहे. चॅलेंज ग्रे अँड ख्रिसमस नावाच्या कंपनीने दिलेल्या अहवालात सांगण्यात आले आहे की, अमेरिकेत 4.17 लाख लोकांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या आहेत. कोरोना काळात देखील कर्मचाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात नोकऱ्या गमावण्याची पाळी आली होती. मात्र, आताची परिस्थिती ही त्यावेळच्या परिस्थितीपेक्षाही वाईट असल्याचे चित्र आहे.
तज्ञांनी व्यक्त केली होती चिंता
काही दिवसांपूर्वी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा (कृत्रिम बुद्धिमत्तेचा) मानवी नोकऱ्यांना कसा धोका होवू शकतो, यावर प्रचंड चर्चा झाली. अनेक तज्ञांनी यावर आपले मत मांडले होते. वैज्ञानिक आणि तंत्रज्ञान क्षेत्रासह उद्योगातील तज्ञांनी सुध्दा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मानवी नोकऱ्यांना कसा धोका वाढत आहे आणि भविष्यात कर्मचाऱ्यांना कामावरुन कसे काढून टाकले जावू शकते, ही बाब निदर्शनास आणून दिली होती.
भारतामध्ये जागतिक अर्थव्यवस्थेतील मंदी मुळे आतापर्यंत हजारो कर्मचाऱ्यांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या आहे. तर यूएसमध्ये मे महिन्यात नोकऱ्यांमध्ये काही प्रमाणात वाढ झाली असली तरी, बेरोजगारीचा दर 7 महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला आहे.