Highest Average Salary : भारतात नोकरदारांना मिळणाऱ्या सरासरी वार्षिक पगाराच्या आकेडवारीचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यानुसार भारताचा सरासरी वार्षिक सर्वाधिक पगार 18,91,085 इतका आहे. ज्यात सर्वात सामान्य कमाई 5,76,851 आहे. जुलै 2023 पर्यंतच्या सरासरी वेतन सर्वेक्षणाच्या आकडेवारीनुसार भारतात सरासरी सर्वाधिक वार्षिक पगार (Highest Average Salary ) देणाऱ्या शहरांचीही आकडेवारी पुढे आली आहे. त्यामध्ये मुंबई दिल्ली, पुणे बंगळुरू या शहरांना मागे टाकत महाराष्ट्रातील एका शहराने सरासरी सर्वाधिक वार्षिक पगार देणारे शहर म्हणून पहिला नंबर पटकावला आहे. आज आपण कोणत्या शहरात सर्वाधिक पगार दिला जातो. तुलनात्मक दृष्ट्या कोणाला जास्त पगार मिळतो याबाबतची माहिती घेऊयात.
महाराष्ट्रातील 'या' शहरात सर्वाधिक वार्षिक पगार
देशातील शहरांच्या सरासरी वार्षिक वेतनाचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यामध्ये जुलै 2023 पर्यंतच्या आकडेवारीनुसार, देशातील सर्वाधिक वार्षिक सरासरी पगाराच्या बाबतीत महाराष्ट्रातील सोलापूर (Solapur) या शहराने पुणे, मुंबई, हैदराबाद, चेन्नई, बंगळुरू, दिल्ली या सारख्या मेट्रो शहरांना मागे टाकले आहे. सोलापुरातील वार्षिक सरासरी पगार हा 28 लाख 10 हजार 92 रुपये असल्याची माहिती या सर्वेक्षणातून स्पष्ट झाली आहे. त्यामुळे सोलापूर हे देशात सरासरी सर्वाधिक वार्षिक पगार देणारे शहर ठरले आहे.
सोलापूर नंतर या शहरांचा क्रमांक-
सोलापूर या शहरानंतर देशात सरासरी वार्षिक सर्वाधिक पगार देणाऱ्या शहरामध्ये दुसरा क्रमांक हा मुंबईचा लागतो. मुंबईचा वार्षिक सरासरी पगार हा 21,17, 870 रुपये आहे. तसेच बंगळुरूमधील सरासरी वार्षिक पगार हा 21,01,388 रुपये आहे. तर देशाची राजधानी दिल्लीमध्ये सरासरी वार्षिक वेतन हे 20,43,703 रुपये दिले जाते. त्यानंतर पुणे आणि श्रीनगर येथे सरासरी वार्षिक पगार 18,95,370 इतका दिला जातो. याशिवाय मेट्रो शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हैदराबादमध्ये सरासरी वार्षिक वेतन 18,62,407 रुपये दिले जाते असल्याचे या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे.
पगारातील क्षेत्रानुसार तफावत-
भारतात मॅनेजमेंट आणि उद्योग व्यवसायाचे क्षेत्र हे सर्वाधिक पगार देणारे व्यवसाय म्हणून उदयास आले आहेत. ज्याचे सरासरी उत्पन्न 29,50,185 रुपये आहे. तर सर्वात कमी पगाराचे क्षेत्र म्हणून न्यायालयीन क्षेत्र असल्याचे समोर आले आहे. या क्षेत्रातील नोकरदारांना सरासरी वार्षिक 27,02,962 रुपये पगार मिळतो. तसेच भारतात स्त्री पुरुषांना मिळणाऱ्या सरासरी वार्षिक पगाराची तुलना केली असता, पुरुष आणि स्त्रियांच्या पगारात लक्षणीय फरक दिसून येतो. पुरुषांना मिळणारे सरासरी वार्षिक वेतन हे 19,53,055 आहे; तर महिलांना सरासरी 15,16,296 इतका पगार मिळतो.
सरासरी सर्वाधिक पगार देणारं राज्य?
भारतातील विविध राज्यांमधील सरासरी मासिक पगाराचा विचार केल्यास. उत्तर प्रदेश महिन्याला 20,730 रुपये पगाराच्या आकडेवारीसह प्रथम क्रमांकावर आहे. त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये महिन्याला सरासरी पगार 20,210 आहे. देशातील सर्वात औद्योगिक राज्यांपैकी एक असलेल्या आपल्या महाराष्ट्रात महिन्याला सरासरी 20,110 पगार दिला जातो.
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            