उत्तम नगरमधल्या जनक सिनेमाजवळ आपल्या बुलेटच्या मागे चहाचा स्टॉल (Tea stall) लावणारे अभिषेक भारद्वाज सध्या सोशल मीडियावर (Social media) चांगलेच व्हायरल होत आहेत. विशेष म्हणजे त्यांनी दहा वर्षे कॉर्पोरेटमध्येही काम केलं आहे. एका नामांकित संस्थेत बँक मॅनेजर (Bank manager) पदावर त्यांनी काम केलं आहे. तर 75 हजारांचा पगारही त्यांना मिळत होता. मात्र हे सर्व सोडून तो आता लोकांना स्वादिष्ट चहा देत आहे. सीएनबीसीनं याचा आढावा घेतला आहे.
कॉर्पोरेट ऑफिसमध्ये 10 वर्षे काम
स्थानिक 18 टीमशी बोलताना बुलेट चाय वालाचे संचालक अभिषेक भारद्वाज यांनी सांगितलं, की त्यांनी कॉर्पोरेट ऑफिसमध्ये जवळपास 10 वर्षे काम केलं आहे. सुरुवातीला त्यांनी मॅक्समध्ये 2 वर्षे आणि नंतर कोटक महिंद्रामध्ये 8 वर्षे नोकरी केली. त्यानंतर मात्र काहीतरी वेगळं करायचं त्यांनी ठरवलं.
किंमत फक्त दहा रुपये
आधी दिल्ली-गुडगाव हायवेवर चहा विकण्यास सुरुवात केली. पहिले सहा महिने तर बुलेटवरच चहा विकला. हळूहळू पैसे मिळू लागल्यावर, भांडवल वाढल्यानंतर स्टॉल सुरू केला. आमच्या चहाची सर्वात खास गोष्ट म्हणजे त्याची किंमत फक्त दहा रुपये आहे, असं त्यांनी सांगितलं.
'वडिलांशी संवाद तुटला, पण...'
चहाची गुणवत्ता आणि प्रमाण हेच आपल्याला इतरांपेक्षा वेगळं बनवते. दररोज सुमारे 200 कप चहा सहज विकला जातो. भविष्यात प्रत्येक राज्यात आऊटलेट्स उघडण्याचं नियोजन आहे. अभिषेक भारद्वाज सांगतात, की जेव्हा मी बुलेट चायवालाचा विचार केला तेव्हा घरच्यांना खूप राग आला. नोकरी कायम ठेवण्याचा सल्ला वडिलांनी दिला. मात्र मला काहीतरी वेगळं करायचं होतं. म्हणून मी हा व्यवसाय सुरू केला. माझ्या या निर्णयामुळे वडिलांशी संवाद तुटला आहे. केवळ आईशी बोलणं होत असल्याचं त्यांनी सांगितलं.