तरुण वयामध्ये आजारी पडणाऱ्याचे किंवा गंभीर आजार जडण्याचे प्रमाण कमी असते. मात्र, उतरत्या वयात विविध व्याधी जडतात. रुग्णालयाच्या फेऱ्या वाढायला लागतात. आयुष्यभर कष्ट केल्यानंतर उतार वयात सहाजिकच शरिराची झीज झालेली असते. 60 वर्षांपुढील व्यक्तीसाठी जी विमा पॉलिसी घेतली जाते त्यास सिनियर सिटिझन पॉलिसी असे म्हणतात. या पॉलिसीसाठी सहसा कंपन्यांचे नियम थोडे वेगळे असतात. तसेच जोखीम जास्त असल्याने प्रिमियमही जास्त असतो. मात्र, असे असले तरीही तुम्ही तुमच्या वयोवृद्ध आईवडिलांसाठी विमा पॉलिसी खरेदी करताना पॉलीसीबाबत नीट माहिती घ्या.
आधीपासून असलेले आजारांपासून संरक्षण
हृदयरोग, मधुमेह यांसारखे आजार तर वयोवृद्ध व्यक्तींना विमा पॉलिसी खरेदी करण्यापूर्वीच असतील तर त्यांना विम्याचे संरक्षण मिळत नाही. त्यामुळे तुम्ही अशी पॉलिसी घेतली पाहिजे ज्यामध्ये वेटिंग पिरियड कमीत कमी आहे. वेटिंग पिरियडमध्ये रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली तर विम्याचा दावा करता येणार नाही. त्यामुळे ज्या पॉलिसीमध्ये कमी वेटिंग पिरियड आहे, ती पॉलिसी तुम्ही घ्यावी.
को-पेमेंटची अट आहे का ते तपासा?
सिनियर सिटिझन पॉलिसीमध्ये को-पेमेंटची अट असल्याची शक्यता जास्त असते. म्हणजे विम्याच्या दाव्यातील काही ठराविक टक्के रक्कम तुम्हाला खिशातून भरावी लागू शकते. जर तुम्ही रुग्णालयात भरती झालात आणि 3 लाख रुपये बील आहे तर तुम्हाला यापैकी काही टक्के रक्कम भरावी लागू शकते. जर 20 टक्के को-पेमेंटची अट असेल तर एकूण दाव्याच्या 20 टक्के रक्कम तुम्हाला भरावी लागेल.
फ्री मेडिकल हेल्थ चेकअप -
वाढत्या वयानुसार आरोग्य चाचणी अत्यंत गरजेची बनते. त्यामुळे एखाद्या आजाराचे पूर्वनिदान होऊन पहिल्या टप्प्यातच उपचार घेता येतात. जर पॉलिसी पिरियडमध्ये तुम्ही कोणताही क्लेम केला नाही तर काही विमा कंपन्या वर्षातून एकदा फ्री हेल्थ चेकअपचे बेनिफिट देतात. या पॉलिसीला तुम्ही प्राधान्य द्यायला हवे.
सिनियर सिटिझन पॉलिसीत कव्हर न होणाऱ्या गोष्टी -
आधीपासून असलेले आजार आणि दुखापती. स्वत:ला केलेली इजा, दारु किंवा इतर व्यसनामुळे निर्माण झालेल्या आरोग्याच्या समस्या विम्यात कव्हर होत नाहीत.
सबलिमिट -
जर पाच लाखांची विमा पॉलिसी घेतली असेल तर पूर्ण पाच लाख रुपये काहीवेळा एकाच आजाराच्या खर्चासाठी वापरता येत नाहीत. यामध्ये कंपनीने कॅपिंग लावलेली असते. म्हणजे, हृदयरोगासाठी एकूण पाच लाखांच्या विम्यापैकी फक्त 2 लाखांची रक्कम मंजूर असू शकते. विविध आजारांसाठी असलेले सबलिमिट नीट पाहून घ्या.