कर्ज कोणतेही असो ते असणे हे कोणालाही आर्थिकदृष्ट्या परवडणारे नसतेच. अपवाद गृहकर्जाचा. कारण या कर्जामुळे आपले काही वर्षांनी का होईना हक्काचे घर होतेच; तसेच या कर्जामुळे प्राप्तीकरातही सवलत मिळते. दुसरीकडे वैयक्तिक कर्जाच्या माध्यमातून आपल्याला तातडीने रक्कम मिळत असली तरी त्याचा व्याजदर तुलनेने अधिक असतो. त्याचबरोबर या कर्जामुळे प्राप्तीकरात कोणतीही सवलत मिळत नाही. जमीन जुमला, शेअर्स, मुदत ठेवी या गोष्टी तारण ठेवण्याची गरज भासत नाही. आपल्या उत्पन्नाच्या प्रमाणात वैयक्तिक कर्ज बँका उपलब्ध करून देत असतात. त्यामुळे वैयक्तिक कर्ज घेण्यापेक्षा अन्य कर्ज पर्याय पाहता येतील का? याचा विचार करायला हवा. जेणेकरून आपल्याला आर्थिक फटका अधिक बसणार नाही.
सोने तारण कर्ज
सोने तारण कर्ज हा एक चांगला पर्याय समजला जातो. वैयक्तिक कर्जाच्या तुलनेत सोने तारण कर्जाचे व्याजदर कमी असते. बहुतांशी बँका आणि वित्तीय संस्था आजकाल सोने तारण कर्जाची सोय उपलब्ध करून देत आहेत. याशिवाय कर्ज तारण मंजुरीसाठी प्रक्रिया शुल्क देखील आकारले जात नाही. केवळ सोने मूल्य शुल्क आकारले जाते आणि ते ही खूप माफक असते. रहिवाशी पत्ता, पॅन कार्ड, ओळखपत्र एवढ्याच कागदपत्रांवर आपल्याला सोने कर्ज मिळू शकते. वैयक्तिक कर्ज हे तुमच्या क्रेडिट स्कोरवर अवलंबून असते. ते जर खराब असेल तर वैयक्तिक कर्जाला अडचणी येतात. गोल्ड लोनसाठी त्याची गरज भासत नाही. सोन्याच्या गुणवत्तेच्या, वजनाच्या आणि चालू दरांच्या प्रमाणात कर्ज दिले जाते.
ओव्हरड्राफ्ट सुविधा
जर वैयक्तिक पातळीवर मुदत ठेव बँकेत असेल तर त्यावर आपल्याला ओव्हरड्राफ्ट घेता येते. त्यावर आपल्याला कर्जाऊ स्वरुपात बँक कर्ज देते. उदा. मुदत ठेवीवर आपल्याला आठ टक्के व्याजदर आकारलेला असेल तर त्यावर काढण्यात येणार्या कर्जाचा व्याजदर हा दोन टक्के अधिक असतो. त्या बदलत्यात आपल्याकडील मुदत ठेव तारण म्हणून बँकेकडे ठेवता येतात. परतफेड करण्यास अडचण आली तर ती रक्कम मुदत ठेवीतून वसुल करतात. अन्यथा आपण नियोजित वेळेत परतफेड केली तर मुदत ठेवची पावती परत देतात. मुदत ठेवीच्या एकूण रक्कमेपैकी साधारणतः 80 टक्के कर्ज मिळते.
विमा पॉलिसीवर कर्ज
आपल्याकडे असणार्या एलआयसी पॉलिसीवर देखील कर्ज मिळू शकते. हे कर्ज मिळण्यासाठी पॉलिसी घेऊन किमान तीन वर्ष झालेली असणे गरजेचे आहे. मुदतीनंतर मिळणार्या रकमेच्या 90 टक्के रक्कम कजावू म्हणून आपल्याला मिळते. पॉलिसीची रक्कम जेवढी मोठी असेल, तेवढे कर्ज आपल्याला मिळते. त्याबाबत कागदपत्रांची पुर्तता केल्यानंतर आपल्याला तातडीने कर्ज मिळू शकते.
शेअर्स, म्युच्युअल फंडवर कर्ज
गुंतवणूक म्हणून अनेक मंडळी शेअर्स आणि म्युच्युअल फंडची खरेदी करतात. अचानक आर्थिक अडचण आल्यास काही जण शेअर्स किंवा म्युच्युअल फंड विकतात. परंतु या फंडाची विक्री करण्याऐवजी त्याच्यावर कर्ज सहज मिळू शकते. संबंधित ब्रोकरकडून यासंबंधीची पूर्तता केल्यानंतर बँक आपल्याला शेअर्स आणि म्युच्युअल फंडवर कर्ज देते.
भविष्य निर्वाह निधीवर कर्ज
सरकारी नोकरदार असाल तर नियमित वेतनातून कपात होणार्या भविष्य निर्वाह निधीवर कर्ज मिळू शकते. लग्न, शिक्षण किंवा बांधकाम या कारणासाठी अशा प्रकारचे तातडीने कर्ज काढता येते. याशिवाय वैयक्तिक पातळीवर पीपीएफचे खाते असेल तर या खात्यातील प्रमाणावर कर्ज आपल्याला मिळू शकते. किमान त्यासाठी तीन वर्ष पूर्ण झालेले असणे बंधनकारक आहे. यासाठी संबंधित खात्याकडे चौकशी करून कर्जाची उपलब्ध करून घ्यावी. बहुतांशी नोकरदार मंडळी पाल्याच्या लग्नासाठी किंवा बांधकामासाठी पीएफवर कर्ज घेण्यास प्राधान्य देताना दिसून येतात.
स्थावर मालमत्तेवर कर्ज
जमीन किंवा घर तारण ठेवून आपल्याला गरजेसाठी कर्ज घेता येते. जोपर्यंत कर्जाची परतफेड होत नाही, तोपर्यंत आपल्याला मालमत्तेचा व्यवहार करता येत नाही. जमीनीची कागदपत्रे बँकेत सादर केल्यानंतर त्याचे मुल्यांकन करून बँक आपल्याला कर्ज देते. प्रत्येक बँकांचे व्याजदर वेगवेगळे असू शकतात. सहकारी बँकेत त्याचा व्याजदर अधिक असतो तर सरकारी बँकेत तुलनेने कमी असतो. त्याची पडताळणी करून कर्जासाठी अर्ज करावा.