वित्तीय मार्केटमध्ये गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यापैकी चांगला परतावा मिळणाऱ्या योजनांमध्ये गुंतणुकीला प्राध्यान दिले पाहिजे. शेअर मार्केट, म्युच्युअल फंड, सुवर्ण गुंतवणूक, रिअल इस्टेट, पीपीएफ सह विविध बँका अथवा वित्तीय संस्थाच्या मुदत ठेव योजनांमध्ये आपण गुंतवणूक करतो. वित्तीय संस्थाकडून ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी काही वेळेला विशेष योजना उपलब्ध करून दिल्या जातात. त्याप्रमाणेच ज्येष्ठ नागरिकांसाठी काही वित्तीय संस्थाकडून मुदत ठेवींवर 9% हून अधिक व्याजदर दिला जात आहे. त्याबाबतची माहिती आज आपण जाणून घेऊ..
युनिटी स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड
युनिटी स्मॉल फायनान्स बँक लिमटे (SFB) या बँकेकडून ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष व्याजदर ठेव योजना सुरू करण्यात आली आहे. या बँकेकडून ज्येष्ठ नागरिकांना मुदत ठेवीवर जास्तीत जास्त 9.50 % इतका व्याजदर दिला जात आहे. यासाठी मुदत ठेवीचा कालावधी हा 1001 दिवसांचा आहे. तसेच 6 महिने आणि 501 दिवसांच्या मुदत ठेवीवर ज्येष्ठांना 9.25 % इतका व्याजदर दिला जातो. अधिक माहितीसाठी तुम्ही बँकेच्या संकेतस्थळावर भेट देऊ शकता.
फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक
फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक (fincare bank) या बँकेकडून ही आपल्या ग्राहकांसाठी वेगवेगळ्या योजना राबविल्या जात आहेत. बँकेकडून ज्येष्ठासांठी मुदत ठेवीवर सुमारे 9.11 % पर्यंत व्याज दिले जात आहे. यासाठी मुदत ठेवीचा कालवधी 1000 दिवसांचा ठेवण्यात आला आहे. जेष्ठ नागरिकांना बँकेकडून विविध मुदतीच्या ठेवींवर 3.60 % ते जास्तीत जास्त 9.11 टक्क्यांपर्यंत व्याज दर दिला जातो. सर्वसामान्य खातेदारांना बँकेकडून 3 टक्क्यांपासून ते जास्तीत जास्त 8.51 व्याज दर दिला जातो.याबाबतची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तु्म्ही बँकेच्या संकेतस्थळावर भेट देऊ शकता.
जन स्मॉल फायनान्स बँक
ज्येष्ठ नागरिकांना मुदत ठेवीवर जास्त व्याजदर देणाऱ्या बँकेमध्ये बंगळुरू येथे मुख्यालय असलेली जन स्मॉल फायनान्स बँक या आणखी एका बँकेचा उल्लेख करावा लागेल. ही बँक ज्येष्ठ नागरिकांना विविध मुदतीच्या ठेवीवर 4.25 टक्के ते 9% व्याजदर प्रदान करते. 366 दिवस ते 499 दिवसांच्या कालावधीसाठी, किंवा 501 ते 2 वर्षापर्यतच्या मुदत ठेवीसाठी बँकेकडून 9% व्याजदर दिला जातो. या योजनेच्या अधिक माहिती साठी बँकेच्या संकेतस्थळावर भेट देऊ शकता.
सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक
जेष्ठ नागरिकांना आणखी एका बँकेत मुदत ठेवीवर जास्त व्याजदर मिळवता येऊ शकतो. ती बँक म्हणजे सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक . या बँकेकडून जास्तीत जास्त 9.10 टक्क्यांपर्यंत मुदत ठेवींवर व्याज देते. यासाठी मुदतठेवीचे वेगवेगळे कालावधी आहेत. 2 वर्ष ते 3 वर्षांपर्यंतच्या दीर्घ मुदतीच्या ठेवींवर बँकेकडून ज्येष्ठ व्यक्तींसाठी 9.10 टक्क्यांपर्यंत व्याजदर दिला जात आहे. इतर मुदत ठेवीच्या व्याजदराच्या माहितीसाठी बँकेच्या संकेतस्थळावर भेट द्या.