बचत खाते उघडायचे म्हटल्यावर, प्रत्येक बॅंकेचे व्याजदर चेक करुन ते उघडणे कधीही फायद्याचे ठरते. म्हणजे जिथे व्याजदर चांगला असेल, तिथेच खाते उघडायचे. यामुळे बचतीसह त्यावर चांगला व्याजदरही मिळू शकतो. तुम्ही अशाच जास्त व्याजदर मिळणाऱ्या बॅंकांच्या शोधात असाल तर आम्ही काही निवडक बॅंका घेऊन आलो आहोत, ज्या 6 टक्के ते 7 टक्क्यांपेक्षा जास्त व्याजदर देत आहेत. विशेष म्हणजे या बॅंकानी त्यांच्या व्याजदरात ऑगस्ट महिन्यातच बदल केला आहे. त्यामुळे तुम्ही नवीन बचत खाते उघडायच्या तयारीत असाल तर ही तुमच्यासाठी योग्य वेळ आहे.
Table of contents [Show]
डीसीबी बँक (DCB Bank)
DCB (डेव्हलपमेंट क्रेडिट बॅंक) बॅंकेने 17 ऑगस्टला त्यांच्या बॅंक खात्यात बदल केले आहेत. या नवीन बदलानुसार आता ग्राहकांना 7.75 टक्के व्याजदर मिळणार आहे. यासाठी तुम्हाला तुमच्या खात्यात 10 कोटींपेक्षा जास्त आणि 200 कोटी रुपयांपेक्षा कमी रक्कम असणे गरजेचे आहे. एवढी रक्कम तुमच्या खात्यात असेल तर तुम्हाला या व्याजदराचा लाभ घेता येणार आहे.
आरबीएल बँक (RBL Bank)
RBL (रत्नाकर बॅंक लिमिटेड) बॅंकने त्यांच्या व्याजदरात 21 ऑगस्टला बदल केले आहेत. त्या बदलानुसार तुमच्या खात्यात 25 लाखांपेक्षा जास्त आणि 2 कोटींपर्यंत रक्कम असेल तर तुम्हाला 7.50 टक्के व्याजदराचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे तुम्ही नवीन खाते उघडण्याच्या तयारीत असाल तर या बॅंकेत बचत खाते उघडल्यास तुम्हाला फायदा होऊ शकतो.
येस बँक (Yes Bank)
Yes बॅंकेने ही बचत खात्याच्या व्याजदरात बदल केले असून या नवीन बदलानुसार ग्राहकांना 7 टक्के व्याजदर मिळणार आहे. यासाठी ग्राहकांच्या खात्यात 10 लाखांपेक्षा जास्त ते 5 कोटींपेक्षा कमी रक्कम खात्यावर असणे बंधनकारक आहे. तेव्हाच ग्राहकांना या व्याजदराचा लाभ घेता येणार आहे. 21 ऑगस्टपासून बॅंकेने हे व्याजदर लागू केले आहेत.
इंड्सइंड बँक (IndusInd Bank)
IndusInd बॅंकेने त्यांच्या बचत खात्यावर 5 ऑगस्टपासून नवीन दर लागू केले आहेत. या नवीन दरानुसार बॅंक 6.75 टक्के व्याज देणार आहे. यासाठी ग्राहकांना त्यांच्या खात्यावर 25 लाखांपेक्षा जास्त आणि 5 कोटींपेक्षा कमी रक्कम असणे गरजेचे आहे. तेव्हाच ग्राहक या व्याजदराचा लाभ घेऊ शकणार आहेत.