By Sujit Patil28 Feb, 2023 17:313 mins read 110 views
Film Budget Vs Income: देशात वर्षाला हजारो चित्रपट बनत असले, तरीही बिग बजेट चित्रपट आणि त्यांनी केलेली कमाई हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. 2022-23 या वर्षात कोणते चित्रपट बिग बजेट म्हणून चर्चेत राहिले आणि त्यांनी किती कमाई केली हे जाणून घेऊयात.
भारतात वर्षाला हजारो चित्रपट बनतात. त्यातील काही सुपरहिट ठरतात, तर काही फ्लॉप. हल्ली चित्रपट चांगला बनवण्यासाठी अनेक वेगेवेगळ्या गोष्टींचे प्रयोग करून बघितले जातात. यासाठी बराच खर्च ही केला जातो. बॉलिवूडसह आता मराठी, गुजराती, भोजपुरी, तेलगू, तमिळ, मल्याळम या इंडस्ट्रीमध्ये देखील बिग बजेटचे चित्रपट बनायला सुरुवात झाली आहे.
कोणताही चित्रपट बनवताना त्याचं बजेट निश्चित करण्यात येतं. नावाजलेले कलाकार, बिग बजेट आणि अनोखं तंत्रज्ञान हे हल्ली यशस्वी चित्रपटाचं समीकरण मानलं जातं, मात्र तरीही बऱ्याच वेळा अनेक चित्रपट फ्लॉप होतात. भारतात 2022-23 या वर्षात कोणते चित्रपट बिग बजेट म्हणून चर्चेत राहिले? ते प्रदर्शित झाल्यानंतर त्यांनी किती कमाई केली हे जाणून घेऊयात.
तेलगू दाक्षिणात्य चित्रपट आरआरआर (RRR) मार्च 2022 मध्ये रिलीज झाला. प्रसिद्ध दिग्दर्शक एस. एस. राजामौली (S. S. Rajamouli) यांनी याचं दिग्दर्शन केलं. हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच याची चर्चा सगळीकडे ऐकायला मिळाली होती. या चित्रपटात एन.टी. रामाराव ज्युनियर, राम चरण, अजय देवगण, आलिया भट्ट यासारख्या दिग्गज कलाकारांनी स्वतःच्या अभिनयाची छाप पाडली.
अल्लुरी सीताराम राजू आणि कोमाराम भीम या दोन भारतीय क्रांतिकारकांची आणि ब्रिटिश राजवटीविरुद्धच्या त्यांच्या लढ्याची ही काल्पनिक कथा लोकांना चांगलीच भावली. 'हल्ली नाटु' या गाण्याने तर लोकांना नाचायला भाग पडलं. हा चित्रपट बनवण्यासाठी 550 करोड रुपये खर्च करण्यात आले. मात्र लोकांचा उदंड प्रतिसाद मिळाल्याने 700 करोडहून जास्त कमाई करण्यात या चित्रपटाला यश मिळालं.
पोन्नियिन सेल्वन
www.moviecrow.com
2022 मध्ये सर्वात चर्चेत राहिलेला तमिळ भाषेतील चित्रपट म्हणजे पोन्नियिन सेल्वन (Ponniyin Selvan). या चित्रपटाचे दिग्दर्शन मणिरत्नम (Mani Ratnam) यांनी केले आहे. हा चित्रपट दोन भागांमध्ये बनवण्यात आला आहे. याचा पहिला भाग 2022 मध्ये प्रदर्शित झाला, तर दुसरा भाग अजून रिलीज झालेला नाही. या चित्रपटात विक्रम, जयम रवी, ऐश्वर्या राय बच्चन, त्रिशा इ. कलाकारांचा समावेश आहे. ए.आर. रहमान यांनी या चित्रपटाला संगीत दिले आहे.
या चित्रपटाचे एकूण बजेट 500 कोटी इतके होते. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर लोकांनी सुरुवातीला हा चित्रपट पाहण्यासाठी गर्दीही केली, मात्र मध्यंतरापूर्वीचा भाग म्हणावा तसा प्रेक्षकांना आवडला नाही. मध्यंतरानंतरचे कथानक लोकांना प्रचंड आवडले. त्यामुळे चित्रपटाच्या दुसऱ्या भागात काय होईल, ही उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. या चित्रपटाने 498 करोड रुपयांची कमाई केली.
राधे श्याम
राधे श्याम (Radhe Shyam) हा राधा कृष्ण कुमार यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शित केलेला 2022 चा एक रोमँटिक चित्रपट आहे. हा चित्रपट एकाच वेळी तेलुगू आणि हिंदी भाषांमध्ये चित्रित करण्यात आला होता. यामध्ये प्रभास आणि पूजा हेगडे यांनी भूमिका साकारलेल्या पाहायला मिळाल्या.
30 जुलै 2021 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार होता, मात्र कोविड-19 साथीच्या आजारामुळे तारीख लांबणीवर गेली. 11 मार्च 2022 रोजी हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटाचे एकूण बजेट 300 करोडचे होते. मात्र प्रेक्षकांचा हवा तसा प्रतिसाद न मिळाल्याने या चित्रपटाने केवळ 156.8 करोड रुपये कमावले.
सम्राट पृथ्वीराज
www.bollymoviereviewz.com
2022 मधील बॉलिवूडचा ऐतिहासिक चित्रपट सम्राट पृथ्वीराज (Samrat Prithviraj) हा देखील बिग बजेट सिनेमा म्हणून ओळखला गेला. आदित्य चोप्रा यांच्या यशराज फिल्म हाऊसमध्ये याचे चित्रीकरण करण्यात आले. दिग्दर्शक चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला. या चित्रपटात अक्षय कुमारने सम्राट पृथ्वीराज यांची मुख्य भूमिका साकारली, तर मानुषी छिल्लर हिने पृथ्वीराज यांची पत्नी संयुक्ताची भूमिका साकारली आहे.
या चित्रपटाच्या फोटो पोस्टरने लोकांमध्ये चांगलीच चर्चा निर्माण केली होती. 3 जून 2022 रोजी हा चित्रपट भारतातील चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. याचे एकूण बजेट 300 करोड होते. मात्र हा चित्रपट लोकांच्या पसंतीस न उतरल्याने केवळ 70 करोड कमावण्यात त्याला यश मिळाले.
ब्रह्मास्त्र: भाग एक – शिवा
ब्रह्मास्त्र: भाग एक – शिवा (Brahmastra: Part One – Shiva) हा 2022 चा बॉलीवूडमधील काल्पनिक ऍक्शन-अॅडव्हेंचर चित्रपट आहे. आघाडीचे नवीन तंत्रज्ञान या चित्रपटात दिग्दर्शक अयान मुखर्जी यांनी वापरले आहे. अनेक दिग्गज कलाकार जसे की, अमिताभ बच्चन, रणबीर कपूर, आलिया भट्ट, मौनी रॉय आणि नागार्जुन यांनी मुख्य भूमिकेत यामध्ये काम केले आहे.
9 सप्टेंबर 2022 रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला. यातील अनेक गाणी हिट झाल्याने लोकांनी हा चित्रपट, चित्रपटगृहात पाहायला पसंती दिली. 300 करोड रुपयांचे बजेट असणाऱ्या या चित्रपटाने 425 करोड रुपयांची कमाई केली.
लाल सिंह चड्ढा
बॉलिवूडमधील लाल सिंह चड्ढा (Lal Singh Chadha) हा सुद्धा एक बिग बजेट हिंदी सिनेमा आहे, ज्याचे दिग्दर्शन अद्वैत चंदन यांनी एरिक रॉथ आणि अतुल कुलकर्णी यांच्या पटकथेवरून केले आहे. आमिर खानचे प्रॉडक्शन हाऊस आणि व्हायकॉम 18 स्टुडिओ यांनी मिळून या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
1994 मधील अमेरिकन चित्रपट फॉरेस्ट गंपचा हा रिमेक असून, जो विन्स्टन ग्रूमच्या 1986 मधील कादंबरीवर आधारित होता. या चित्रपटात आमिर खान, करीना कपूर, नागा चैतन्य आणि मोना सिंग यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटाचे एकूण बजेट 180 करोड होते. मात्र या चित्रपटाला बायकॉट ठरवल्याने हा चित्रपट फ्लॉप गेला. त्याची एकूण कमाई केवळ 50 करोड रुपये इतकीच झाली.
शमशेरा
यशराज फिल्म निर्मित आणि करण मल्होत्रा दिग्दर्शित शमशेरा (Shamshera) हा चित्रपट देखील बिग बजेट म्हणून चर्चेत होता. 22 जुलै 2022 रोजी भारतातील आयमॅक्स थिएटरमध्ये हा प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटात वाणी कपूर, रोनित रॉय आणि सौरभ शुक्ला यांच्यासोबत रणबीर कपूर दुहेरी भूमिकेत पाहायला मिळाला.
हा चित्रपट बनवण्यासाठी 150 करोड रुपये खर्च करण्यात आले. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर समीक्षकांकडून आणि प्रेक्षकांकडून मिश्रित नकारात्मक प्रतिक्रिया पाहायला आणि ऐकायला मिळाल्या. त्यामुळे केवळ 50 करोड रुपयांची कमाई करून हा चित्रपट फ्लॉप ठरला.
आचार्य
कोनिडेला प्रॉडक्शन कंपनी आणि मॅटिनी एंटरटेन्मेंट निर्मित, आचार्य (Acharya) चित्रपटात राम चरण, पूजा हेगडे आणि सोनू सूद यांच्यासोबत चिरंजीवी मुख्य भूमिकेत पाहायला मिळाले. दाक्षिणात्य तेलगू चित्रपट आचार्य हा देखील 2022 मधील बिग बजेट चित्रपट म्हणून चर्चेत होता. हा चित्रपट बनवण्यासाठी 140 करोड रुपये खर्च करण्यात आले. मात्र प्रेक्षकांच्या मनात हा चित्रपट स्थान मिळवू शकला नाही. कशीबशी 65 करोड रुपयांची कमाई केल्यानंतर हा चित्रपट गुंडाळावा लागला.
हवीहवीशी वाटणारी वर्क फ्रॉम होम (Work from home) ही संकल्पना हळूहळू मागे पडत चालली आहे. आम्हाल वर्क फ्रॉम होमच हवं, असा आग्रह करणारे आणि अक्षरश: भांडणारे आता ऑफीस वर्कच्या प्रेमात पडले आहेत. वर्क फ्रॉम होमची संकल्पना खऱ्या अर्थानं सुरू झाली ती कोरोना महामारीनंतर (Corona pandamic). मात्र आता कर्मचाऱ्यांना ऑफीस खुणावू लागलं आहे. पाहूया, काय सांगतोय अहवाल!
Government Schemes : सरकारकडून अशा अनेक योजना राबवल्या जात आहेत, ज्यांची बहुतांश लोकांना माहिती नाही. समानतेचा अधिकार देण्यासाठी आणि देशातील भेदभाव दूर करण्यासाठी सरकार अशीच योजना राबवत आहे, जी लोकांना सामाजिक सुरक्षा देण्याबरोबरच आर्थिक मदतही करते. 'आंतरजातीय विवाह योजना' योजना एक आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देणारी योजना आहे, जी विवाहित लोकांना लाखो रुपयांपर्यंत रक्कम देते.
New Tax Regime 2023 : नवीन कर प्रणालीमध्ये (New Tax Regime) सरकारने काही प्रमाणात दिलासा दिला (Government Provided Some Relief) आहे. या अंतर्गत 7 लाख रुपयांच्या करमुक्त उत्पन्नापेक्षा थोडे अधिक कमाई करणाऱ्या व्यक्तींना अतिरिक्त उत्पन्नावरच कर भरावा लागेल. नेमके काय आहे प्रकरण वाचा सविस्तर