कोणत्याही देशाचे चलनविषयक धोरण हे नेहमीच आव्हानात्मक असते; त्यामुळे यामध्ये आत्मसंतुष्ट असण्याचे कारण नाही. सध्या असलेला व्याजदर हा वाढीवच आहे आणि तो अजून किती दिवस वाढीव असेल. हे येणारा काळच ठरवेल. सध्याची जगभरातील परिस्थिती पाहता अनेक देशांनी आपल्या अर्थव्यवस्थेचा गाडा योग्य पद्धतीने सुरू राहवा, यासाठी रेपो दर चढेच ठेवले आहेत.
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास हे शुक्रवारी (दि. 20 ऑक्टोबर) कौटिल्य इकॉनॉमिक कॉन्क्लेव्ह 2023 (Kautilya Economic Conclave, 2023) या कार्यक्रमात बोलत होते. त्यांनी सांगितले की, महागाई आटोक्यात आणण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी फेब्रुवारीपासून रेपो दरामध्ये वाढही केलेली नाही आणि तो कमीही केलेला नाही. सध्याचा रेपो दर हा जास्त असला तरी तो तसाच राहणार आणि तो अजून किती दिवस राहणार, हे येणारा काळच ठरवेल, असे ते म्हणाले. सध्या आरबीआयचा रेपो दर (Repo Rate) 6.5 टक्के आहे. 2022 च्या मे महिन्यापासून फेब्रुवारी, 2023 या कालावधीत पतधोरण समितीने रेपो दरात 2.50 टक्क्यांनी वाढ केली आहे.
चलनविषयक धोरण आव्हानात्मक
चलनविषयक धोरणामध्ये परिस्थितीनुसार बदल करावा लागतो. त्यामुळे ते नेहमीच आव्हानात्मक असते. फेब्रुवारीपासून रेपो दरामध्ये वाढ किंवा घट केलेली नाही. त्यामुळे जुलैमध्ये 7.44 टक्के असलेला महागाई दर आता हळुहळू कमी होऊ लागला आहे.