All Village Uses Only One Phone: ज्या देशात सर्वांना मोबाईलचे वेड लागले आहे. जिथे लोक मोबाईलशिवाय राहू शकत नाही. मोबाईल म्हणजे प्रत्येकाचा जिव्हाळयाचा विषय असतो. लोक कपडे बदलल्याप्रमाणे मोबाईल चेंज करीत असतात. आजच्या जमान्यात पाहिले तर कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीकडे वैयक्तिक स्वत:चा मोबाईल असतो. विशेष म्हणजे, अशा परिस्थितीतदेखील भारतात एक असे गाव आहे की, जिथे फक्त एकच फोनच वापरला जातो. तसेच या गावातील घरेदेखील मातीची आहेत. येथे आधुनिक असे कोणतेही उपकरण नाही. विशेष म्हणजे, या गावाची ही परंपरा तीनशे वर्षांपासून चालत आली आहे. भारतातील अशा ‘या’ खास गावाबाबत अधिक माहिती जाणून घेऊयात.
भारतात कुठे आहे हे गाव?
भारतातील आंध्र प्रदेश राज्यातील श्रीकाकुलम जिल्ह्यातील श्रीमुखलिंगम गावापासून सहा किलोमीटरवर असलेले ‘कुर्मग्राम’ असे या गावाचे नाव आहे. साधारण साठ एकर परिसरात हे गाव वसलेले आहे. या गावात फक्त एकच फोन आहे. संपूर्ण गाव या फोनचा वापर करतात. तसेच गावातील सर्वांची घरे ही आकर्षक व सुंदर अशी मातीची आहेत. त्यांना बाहेरील जगाशी काही संबंध ठेवायचा नाही. हे गावातील लोक असेच राहणे पसंत करतात.
गावाची वैशिष्टये
कुर्मग्राम या गावात 56 घरे आहेत. ही घरे बांधताना यात सिमेंट आणि स्टीलचा वापर केला गेला नाही. या गावात कोणाकडेही कोणतेही आधुनिक उपकरण किंवा सोयीसुविधा नाहीत. विशेष म्हणजे संपूर्ण गावात संपर्कासाठी केवळ एकच लँडलाइन फोन उपलब्ध आहे. आंध्र प्रदेशाच्या या गावात मातीचे घर आणि शेणाने सारवलेल्या भिंती आहेत. या गावात वीज, मोबाइल, इंटरनेटसारख्या सोयी-सुविधा नाहीत. स्वयंपाकाचा गॅसदेखील नाही. हे ग्रामस्थ अजून ही चुलीवर स्वयंपाक करतात. सुमारे तीनशे वर्षांपूर्वीची ही परंपरा अजून ही हे ग्रामस्थ चालवितात. सगळ्यांना वाटते की, या गावात गरिबी आहे, पण असे नसून या ग्रामस्थांनी असे जीवन जगण्याचे तत्व स्वीकारले आहे. कमी गरजा आणि साधी राहणी व उच्च विचारसरणी असे सूत्र येथील लोकांनी आत्मसात केले आहे, असे म्हणण्यास हरकत नाही.
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            