तृतीयपंथीयांना भेडसावणाऱ्या समस्यांची यादी काही छोटी नाही. कौटुंबिक, सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक क्षेत्रात त्यांना कमालीचा संघर्ष करावा लागतो. जगण्यासाठी आपल्या सगळ्यांना पैसा हा लागतोच. पैशाअभावी तृतीयपंथीयांना हलाखीचे जीवन जगावे लागते.
सोनी मराठीवर (Sony Marathi) सध्या ‘प्रतिशोध-झुंज अस्तित्वाची’ ही मालिका गाजते आहे. तृतीयपंथी असलेल्या एका आईची कहाणी या मालिकेत उलगडून सांगितलेली आहे. मालिकेतील मुख्य पात्र असलेली ‘ममता’ ही ट्रान्सवूमन असून जेवणाचे डबे पुरविण्याचे काम ती करते. स्वाभिमानाचं आयुष्य जगून आपल्या मुलीला, ‘दिशा’ला उत्तमोत्तम शिक्षण, सुविधा देण्याचा ती प्रयत्न करते. या तिच्या प्रवासात तिची मैत्रीण ‘शन्नो बी’ ही देखील तिला मोलाची मदत करते आहे. तृतीयपंथी समाजाच्या व्यथा, अडचणी आणि जिद्द आणि संघर्षाची कहाणी प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे.
प्रतिशोधच्या संपूर्ण टीमने मातृदिनाच्या निमित्ताने मुंबईतील वर्सोवा परिसरातील ‘द ट्रान्स कॅफे’ला भेट दिली. हा कॅफे पूर्णतः ट्रान्सवूमनद्वारे चालवला जातो. म्हणजेच कॅफेच्या मालकांपासून, शेफ आणि वेटरपर्यंत सर्व कमर्चारी हे ट्रान्सवूमन आहेत. झैनब पटेल या ‘द ट्रान्स कॅफे’च्या मालकीण आहेत. गेल्या 20 वर्षांहून अधिक काळ त्या तृतीयपंथियांच्या न्याय हक्कासाठी संघर्ष करत आहेत. संघर्षासोबतच रचनात्मक कामावर देखील त्यांचा विश्वास आहे. त्यामुळे त्यांनी तृतीयपंथी नागरिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, त्यांना स्वाभिमानाने चार पैसे कमवता येतील यासाठी कौशल्य विकास कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेतला. त्या सध्या मुंबईतील प्रभादेवी येथे ‘ट्रान्सफॉर्मेशन सलोन’ आणि वर्सोवा येथे ‘द ट्रान्स कॅफे’ चालवतात. या दोन्ही ठिकाणी प्रशिक्षित तृतीयपंथी काम करताना आपल्याला दिसतात.
याच कार्यक्रमात निष्ठा निशांत ही ट्रान्सवूमन देखील आली होती. निष्ठा देखील ट्रान्सजेंडर वेलफेअर इक्विटी अँड एम्पॉवरमेंट ट्रस्ट (TWEET) नावाच्या एका संस्थेसोबत काम करते. ही संस्था ट्रान्सजेंडर व्यक्तींना रोजगारक्षम बनविण्यासाठी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करत असते. निष्ठाने आजवर अनेक तृतीयपंथीयांना प्रशिक्षण दिले असून विविध क्षेत्रात हे लोक कार्यरत आहेत.
शेफ माही!
‘द ट्रान्स कॅफे’मध्ये शेफ म्हणून काम करणाऱ्या माही मालिनी पुजारी यांच्याशी आम्ही संवाद साधला. माही यांनी आजवर तीन वेगवेगळ्या हॉटेल/कॅफेमध्ये काम केलं आहे. आज माही या एक पगारदार कर्मचारी म्हणून काम करत असल्या तरी काही वर्षांपूर्वी त्यांना फार मोठ्या संघर्षातून जावं लागलं होतं.
एकदा शाळेमध्ये ‘कल्चरल डे’च्या दिवशी माही साडी घालून कॉलेजमध्ये गेली. तिथे एका शिक्षकाने माहिला खूप सुनावलं. माहीचं साडी घालून येणं त्या शिक्षकांना पटलं नव्हतं. त्यांनतर माहीने शाळेत जाणं सोडून दिलं.
कॉलेजमध्ये असताना माही यांनी त्यांच्या लैंगिकतेबद्दल घरच्यांना सांगितलं. घरच्यांना हे पटलं नाही. घरच्यांचा वाढता विरोध बघून माही यांनी घरातून पळ काढला आणि थेट तुळजापूर गाठलं. तुळजापूरात, आई भवानीच्या छत्रछायेत आधार मिळेल असं माहीला वाटत होतं. परंतु तिथे देखील तिला लोकांचे वाईट अनुभव आले.
माहीने नंतर पुण्यात येऊन बाजार मागायला सुरुवात केली. तिथे तिला वाटलं की आपण हॉटेलिंग क्षेत्रात नशीब आजमावून पाहिलं पाहिजे. लहानपणापासून तिला स्वयंपाकाची आवड होतीच. मध्यंतरी तीने एलआयसी एजंट म्हणून देखील काम केलं. तिथे देखील तिला लोकांचा वाईट अनुभव आला. तीने पुन्हा तिच्या आवडत्या क्षेत्रात काम करायचं ठरवलं. ‘आरजू’, ‘हमसफर’ या संस्थांशी माहीचा संपर्क आला. ‘येस आय कॅन’ या संस्थेने तिला संवाद कौशल्य, व्यक्तिमत्व विकास यांचे प्रशिक्षण दिले. या प्रशिक्षणातून माहीचा आत्मविश्वास वाढत गेला.
त्यांनतर तीने मुंबईतील ‘बंबई नजरिया’ या कॅफेत काम सुरु केलं. तिथे तिला आणखी शिकायला मिळालं. माहीने कुठलंही औपचारिक शिक्षण घेतलेलं नाही. अनुभवातून ती स्वयंपाक कसा बनवायचा हे शिकत गेली.
सुरुवातीला काही लोकांनी “हिजडे स्वयंपाक बनवणार असतील तर आम्हांला खायचं नाही” असं देखील म्हटलं.
आज माहीला अनेक लोक ओळखतात. तिच्या हातचे बनलेले पराठे खाण्यासाठी लोक आवर्जून येतात.
आर्थिकदृष्ट्या सक्षम बनायचंय
बाजार मागून मला जास्त पैसे मिळायचे, कॅफेत काम करून तुलनेने कमी पैसे मिळतात. मात्र बाजार मागून कमवलेले पैसे समाधान देत नव्हते, सन्मान देत नव्हते. कष्टाने कमवलेले पैसे मात्र मान-सन्मान मिळवून देतात असं माही म्हणते. एलआयसी एजंट म्हणून काम केलं असलं तरी पैशाची गुंतवणूक कशी आणि कुठे करावी याचं ज्ञान मला आणि माझ्यासारख्या अनेकांना नाही असं माही सांगते.
सध्याच्या कमाईतून फारसे पैसे शिल्लक राहत नाही, परंतु आता त्याचे देखील नियोजन करावे लागणार आहे असे माही सांगते. माहीची ही कहाणी एका प्रतिशोधाची कहाणी आहे.
कलर्स मराठीच्या टीमने माही आणि तिच्या सहकाऱ्यांचं विशेष कौतुक केलं. ‘प्रतिशोध’ मालिकेत खाणावळ चालवणाऱ्या ममताला देखील असेच काहीसे अनुभव आले आहेत. या सगळ्या संघर्षाची कहाणी येत्या काही दिवसांत मालिकेत बघायला मिळणार आहे.
'प्रतिशोध - झुंज अस्तित्वाची', ही मालिका तृतीयपंथी व्यक्ती आणि त्यांचे कुटुंबीय यांना भेडसावणाऱ्या समस्या आणि त्यांच्या जीवनाचे प्रतिबिंब आहे.मालिकेतील ममता आणि दिशा यांचा समाजातील बदलाचा प्रेरणादायी प्रवास पाहायला तुम्ही सुद्धा विसरू नका! 'प्रतिशोध - झुंज अस्तित्वाची' ही मालिका सोमवार ते शनिवार रोज रात्री 10 वाजता सोनी मराठी वाहिनीवर प्रसारित होत असते.