Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Employability of Transgenders: तृतीयपंथीयांना रोजगारक्षम बनवण्यासाठी धडपडणारी निष्ठा निशांत!

Nishtha Nishant

Nishtha Nishant: अजूनही तृतीयपंथी व्यक्तींना समाज मान्यता मिळत नाही. रोजगाराची संधीच जर उपलब्ध नसेल तर तृतीयपंथीयांना बाजार मागण्याशिवाय आणि देहविक्री करण्याशिवाय पर्याय उरत नाही. परंतु हे दोन्ही पर्याय पैसा जरी देत असले तरी आत्मसन्मान मात्र मिळवून देऊ शकत नाही हे निष्ठाला माहित होतं. जाणून घेऊयात तृतीयपंथीयांना रोजगारक्षम बनवण्यासाठी धडपडणाऱ्या निष्ठाचा प्रवास...

‘निशांत’ ते ‘निष्ठा निशांत’ हा निष्ठाचा प्रवास सोपा नव्हता. पुरुषसत्ताक समाजाच्या जोखाडातून मुक्त होणं, एक स्त्री म्हणून स्वतःची ओळख सांगणं यासाठी निष्ठाला खूप संघर्ष करावा लागला. वयाच्या 23 व्या वर्षी निष्ठाला जाणवलं की आपलं शरीर जरी पुरुषी असलं तरी आतून आपण एक स्त्री आहोत. मोठ्या धैर्याने निष्ठाने आई आणि भावाला तिच्या लैंगिकतेबद्दल सांगितलं. सुरुवातीला घरातून विरोध झाला. निष्ठाची आई एकल महिला होती. निष्ठाचे वडील ती लहान असतानाच वारले होते. आईला हे सगळं स्वीकारणं सुरुवातीला जरा अवघड गेलं. कालांतराने मात्र निष्ठाच्या घरच्यांनी तिला, तिच्या नव्या लैंगिक ओळखीला स्वीकारलं, मान्यता दिली. आता खरी लढाई पुढे सुरु होणार होती.

निष्ठा स्वतःची ओळख आता एक ट्रान्सवूमन (Transwomen) म्हणून सांगू लागली होती. निष्ठाला शिकायचं होतं, चांगल्या पगाराची नोकरी करायची होती, सुखवस्तू जीवन जगायचं होतं. मध्यमवर्गीय घरातून आलेली माणसं जशी स्वप्नं बघतात, तशीच स्वप्नं निष्ठा बघत होती. एम.एसी. (M.Sc.) पूर्ण केल्यानंतर जेव्हा तीने वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये नोकरीसाठी अर्ज केला तेव्हा तिला नाकारलं गेलं. कारण एकच, तिचं ट्रान्सवूमन असणं. एके ठिकाणी जेव्हा निष्ठा मुलाखतीला गेली तेव्हा तिथल्या मॅनेजरने सांगितलं की, “तुझ्यासाठी इथे काहीही काम नाही, तुला आम्ही एखाद्या सरकारी कार्यालयात शिपाईपदाची नोकरी मिळवून देऊ.” निष्ठाला हे सगळं पचवणं अवघड गेलं. आपली शैक्षणिक पात्रता असतानाही, आवश्यक ते कौशल्य असतानाही आपल्याला नोकरी का मिळत नाही, यामुळे निष्ठा निराश होऊ लागली होती.

संधीची समानता नव्हती 

निष्ठा सांगते की, जेव्हा तीने रोजगार मिळावा म्हणून प्रयत्न सुरु केले तेव्हा आलेले अनुभव भयंकर होते. अजूनही तृतीयपंथी व्यक्तींना समाजमान्यता मिळत नाही. रोजगाराची संधीच जर उपलब्ध नसेल तर तृतीयपंथीयांना बाजार मागण्याशिवाय आणि देहविक्री करण्याशिवाय पर्याय उरत नाही. परंतु हे दोन्ही पर्याय पैसा जरी मिळवून देत असले तरी आत्मसन्मान मात्र मिळवून देऊ शकत नाही हे निष्ठाला माहित होतं. निष्ठाने तृतीयपंथियांच्या कुठल्याही समुहात प्रवेश घेतला नव्हता. स्वतंत्रपणे आपलं जीवन जगणं आणि नाव कमावणं यासाठी निष्ठा धडपडत होती.

​​​​ट्वीट फाउंडेशनने दिला आत्मविश्वास 

ट्रान्सजेंडर वेलफेअर इक्विटी अँड एम्पॉवरमेंट ट्रस्ट (TWEET) नावाने एक संस्था तृतीयपंथी व्यक्तींना रोजगारक्षम बनविण्यासाठी, त्यांना रोजगार कौशल्य देण्यासाठी काम करते. या संस्थेशी निष्ठाचा संपर्क आला. या संस्थेच्या माध्यमातून तिला नवनव्या रोजगाराच्या संधी समजू लागल्या. कालांतराने निष्ठा देखील तृतीयपंथीयांचा कौशल्य विकास व्हावा यासाठी प्रशिक्षण घेऊ लागली. ​​​​ट्वीट फाउंडेशनतर्फे मुंबईतील गोरेगावात शेल्टर होम (Shelter Home) चालवले जाते. या शेल्टर होममध्ये आलेल्या व्यक्तींना बाजार मागायची, देहविक्री करण्याची परवानगी नाही.

समाजाने नाकारल्यामुळे, कुटुंबाने नाकारल्यामुळे कौशल्य, शिक्षण असूनसुद्धा अनेक लोक बाजार मागत होते. परंतु जेव्हा त्यांना कोणत्या क्षेत्रात काम करायला आवडेल असं विचारलं तेव्हा अनेकांनी आपापली आवडती क्षेत्रे सांगितली. कुणाला मेक अप आर्टिस्ट बनायचं होतं, कुणाला हॉटेल मॅनेजमेंट करायचं होतं, कुणाला फोटोग्राफी करायची होती तर कुणाला स्टेशनरीचं दुकान टाकायचं होतं. 

आपापल्या आवडीनुसार लोकांना हव्या त्या क्षेत्राचं प्रशिक्षण दिलं गेलं. अनेक लोक या माध्यमातून चार पैसे कमवू लागले आहेत आणि सन्मानाने जीवन जगत आहेत, ही माझ्यासाठी समाधानकारक बाब असल्याचं निष्ठा सांगते. मुंबई, पुण्यात अनेक ठिकाणी कॉर्पोरेट कार्यालयात, हॉटेलमध्ये तृतीयपंथी व्यक्तींना रोजगार दिला जातो आहे, चांगला पगार देखील दिला जातो आहे असं देखील मोठ्या अभिमानाने निष्ठा सांगते.

निष्ठा सध्या एका खासगी कंपनीत सायंटिफिक रिसर्चर म्हणून काम करते. याआधी तीने मुंबईतील खालसा कॉलेजमध्ये प्रध्यापिकेची नोकरी केली आहे. वेगवेगळ्या सामाजिक संस्थासोबत सध्या निष्ठा काम करते आहे. तिच्या कामात आता तिला तिच्या आईची आणि भावाची देखील तिला आता मदत मिळते आहे. 

पैसा आला पण अर्थसाक्षरता नाही 

कौशल्य विकास कार्यक्रमांमधून प्रशिक्षण घेऊन तृतीयपंथी लोक आता नोकरी करू लागले आहेत. नोकरीतून ते आता चार पैसे देखील कमवू लागले आहेत. इतर कर्मचाऱ्यांच्या तुलनेत अजूनही त्यांना कमी पगार दिला जातो. परंतु जोवर संधीच दिली जाणार नाही तोवर आपली कार्यक्षमता दाखवता येणार नाही असंही निष्ठा म्हणते.

तृतीयपंथी व्यक्तींच्या गरजा तुलनेने कमी असल्या तरी त्यांना मिळणारा रोजगार फारच तुटपुंजा आहे अशी खंत निष्ठा व्यक्त करते. अनेकांना हार्मोनल ट्रीटमेंट घ्यावी लागते, त्याचा खर्च मोठा असतो. काही लोकांना मानसोपचारतज्ञांकडे उपचार घ्यावे लागतात. 

जे लोक कम्युनिटीमध्ये राहतात, त्यांना त्यांच्या गुरूला काही ठराविक रक्कम द्यावी लागते. काही तृतीयपंथी घरापासून वेगळे राहत असले तरी ते त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करत असतात. या सगळ्यातून तृतीयपंथीयांना पैशाची बचत करणे कठीण होऊन बसते.

खूप कमी तृतीयपंथी लोक आहेत ज्यांना पैशाच्या गुंतवणुकीचे महत्व माहिती आहे. मुदत ठेव (Fix Deposit), म्युच्युअल फंड (Mutual Fund), एलआयसी (LIC) याबद्दल अजूनही तृतीयपंथी नागरिकांना माहिती नाही असेही निष्ठा सांगते. येणाऱ्या काळात तृतीयपंथी समाजासोबत आर्थिक साक्षरतेवर काम करावं लागेल अशी अपेक्षा निष्ठा व्यक्त करते.

तृतीयपंथी व्यक्तीसुद्धा या देशाचे नागरिक आहेत, त्यांना देखील रोजगाराच्या, शिक्षणाच्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजेत अशी निष्ठाची भूमिका आहे. आमच्यासाठी विविध सरकारी योजनांची घोषणा होत असते, त्याची अंमलबजावणी मात्र होताना दिसत नाही अशी खंत निष्ठा व्यक्त करते. तृतीयपंथी समूहाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अजून खूप काम करायची गरज असल्याचं निष्ठा सांगते. तृतीयपंथीयांना रोजगारक्षम बनवण्यासाठी धडपडणारी करणाऱ्या निष्ठाचं काम नक्कीच कौतुकास्पद आहे.