जून महिना येताच पाऊस येतो, शाळा सुरु होतात आणि घरोघरी खरेदीची लगबग सुरु होते. मे महिना संपायच्या आधीच लोकांकडून पावसाळी खरेदीला सुरुवात केली जाते. यात सर्वात आधी छत्री आणि रेनकोट घेण्याचा विचार केला जातो. कोणत्याही बाजाराच्या ठिकाणी किंवा रेल्वे स्टेशनच्या बाहेरील मार्केटमध्ये रंगीबेरंगी छत्र्या (Umbrella) आणि रेनकोट (Raincoat) दुकानाच्या बाहेर झुलताना दिसतात. पण गेल्यावर्षीच्या तुलनेत छत्र्या आणि रेनकोटच्या किमती 50 ते 100 रुपयांनी वाढल्या (Umbrella price hike) आहेत. पण कितीही महाग झाल्यातरी पावसापासून वाचायचा तर छत्री घेणे गरजेचे आहे.
चीनच्या लॉकडाउनचा कसा परिणाम झाला
कोरोना संकटामुळे चीनच्या महत्त्वाच्या शहरांमध्ये कडक लॉकडाऊन (China's lockdown) आहे. तर निवडक शहरांतील निर्बंध नुकतेच शिथिल करण्यात आले. या घडामोडींचा परिणाम भारतातील छत्री व्यवसायावर झाला असून छत्र्या आता महागल्या आहेत. (Impact of China's lockdown) स्वस्तात मिळत असल्यामुळे भारतीय व्यावसायिक मागील काही वर्षांपासून चिनी छत्र्यांची आयात मोठ्या प्रमाणावर करीत होते तसेच काही भारतीय कारखानदार चीनमधून स्वस्तात कच्चा माल आणून भारतात छत्र्या तयार करून विकत होते. पण लॉकडाऊनमुळे छत्रीसाठी लागणार कच्चा मालही महाग झाल्याने भारतात छत्र्यांच्या किमती वाढल्या आहेत.
छत्र्यांच्या किमती किती वाढल्या
शहरातील छत्री विक्रेत्यांकडे 250 ते 1000 रुपयांपर्यंत मोठ्या आणि लहान आकाराच्या छत्र्या उपलब्ध आहेत. महिलावर्गाकडून दुमडून ठेवता येणाऱ्या छत्र्यांच्या खरेदीला अधिक पसंती मिळत असून त्यांच्या किमती 200 ते 800 रुपयांपर्यंत आहेत. तर लहान मुलांना आवडणाऱ्या कार्टूनची चित्रे असणाऱ्या छत्र्यादेखील उपलब्ध असून त्यांच्या किमती 80 ते 100 रुपयांपासून 500 रुपयांपर्यंत आहेत. यंदा छत्री तयार करण्यासाठी लागणारे कापड, तारेंचे सांगाडे इत्यादी महागल्याने तसेच त्यांची उपलब्धतादेखील कमी झाल्यामुळे छत्र्यांच्या किमतीतही यंदा 40 ते 50 रुपयांपर्यंतची वाढ झालेली आहे.
कोणत्या छत्र्यांना अधिक पसंत
पूर्वी पावसापासून वाचण्यासाठी काळ्या आणि लांब दांड्याच्या छत्र्यांची चालती होती. पण ती सांभाळणे अवघड जात असे. दिवसेंदिवस छत्र्यांचे उंची कमी होत आहे. आणि याच छत्र्यांना अधिक पसंती मिळत आहे. यात आता एक नवीन आणखी लहान अशी थ्री फोल्ड छत्री आली आहे. अगदी खिशात ठेवता येईल एवढी. या छत्रीची किंमत बाजारात 200 ते 300 रुपये आहे. तसेच लहान मुलांसाठी कार्टूनची प्रिंट असलेल्या छत्र्यांना पसंती मिळत आहे. या छत्र्या बाजारात 80 ते 150 पासून 500 पर्यंत मिळत आहेत.
पावसाळा म्हंटल कि छत्र्या रेनकोट हे घ्यावेच लागतात. मग ते कितीही महाग असले तरी त्याला पर्याय नसतो. ती छत्री किंवा रेनकोट मजबूत असणे गरजेचे आहे. छत्र्यांमध्ये सन (Sun) आणि रेनकोट मध्ये झील (Zeel raincoat) या दोन ब्रॅण्डच्या वस्तू अधिक काळ टिकतात त्यामुळे ग्राहकांची या ब्रॅण्डच्या खरेदीकडे कल असतो.