House Construction Budget: कुठेही बांधकाम करण्याचा विषय निघाल्यास सिमेंट हा घटक महत्वाचा ठरतो. परंतु, मधल्या काळात सिमेंटच्या किमतींमध्ये आतोनात वाढ झाली. त्यामुळे सर्वसामान्यांचे बजेट विस्कटले. परंतु आता तुम्ही तुमच्या स्वप्नातील घर बांधण्याचा विचार लवकरच करु शकता. कारण येणाऱ्या दिवसांमध्ये सिमेंटच्या किमती 1 ते 3 टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता या सेक्टरमधील तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.
Table of contents [Show]
चार वर्षांत चार टक्क्यांनी वाढ
चालू आर्थिक वर्षात सिमेंटच्या किमती १-३ टक्क्यांनी कमी होऊ शकतात. याआधी गेल्या चार वर्षांत सिमेंटच्या दरात वार्षिक ४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे सिमेंटचे भाव उच्चांकावर आहेत. गेल्या आर्थिक वर्षात सिमेंटच्या दराने नवा विक्रम रचला होता आणि 50 किलोच्या पिशवीची किंमत 391 रुपयांवर पोहोचली होती. त्यामुळे नागरिकांनी आपल्या घर बांधकामाचे एक विशिष्ट बजेट नियोजित केले होते. ते सिमेंटचे दर गगनाला भिडल्याने नियोजित किमतीच्या प्रचंड पुढे गेले.
सिमेंट उद्योगातील वाढती स्पर्धा
सिमेंट उद्योगातील स्पर्धा तीव्र झाल्याचे मत रेटिंग एजन्सी क्रिसिलने व्यक्त केले. त्यामुळेच सिमेंटच्या किमतीत काहीशी नरमाई दिसून येत असून येत्या काही दिवसांत त्यातही कपात अपेक्षित आहे. तसेच चौथ्या तिमाहीत, सिमेंट कंपन्यांनी अधिकाधिक बाजारपेठेतील हिस्सा काबीज करण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे 2023 च्या सुरुवातीस किमती काही प्रमाणात कमी झाल्या.
1 टक्क्यांनी घसरण
क्रिसिलच्या म्हणण्यानुसार, जानेवारी-मार्च 2023 या तिमाहीत, सरासरी सिमेंटच्या किमती 1 टक्क्यांनी घसरून प्रति बॅग 388 रुपये झाल्या. मात्र, त्यानंतरही भाव उच्च पातळीच्या जवळ आहेत. एप्रिल आणि मे महिन्यात कंपन्यांनी पावसाळ्यापूर्वी सिमेंटच्या किमती वाढवल्या नसल्याची अनेक वर्षांतील ही पहिलीच वेळ आहे.
किंमती कमी होण्याचे कारण
येत्या काही दिवसांत, ऑस्ट्रेलियन कोळशाच्या किमती नरमल्याने, आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत पेट कोकच्या किमती कमी झाल्यामुळे सिमेंटच्या किमती खाली येऊ शकतात, अशी आशा क्रिसिलने व्यक्त केली आहे. डिझेलचे दर कमी होण्याच्या अपेक्षेने सिमेंट उद्योगालाही पाठिंबा मिळत असल्याचे मत व्यक्त केल्या जात आहे.
बांधकामाचा खर्च कमी होणार
रेटिंग एजन्सी क्रिसिलने सिमेंटच्या दरा बाबत व्यक्त केलेला अंदाज खरा ठरल्यास, अनेकांचे बजेटमध्ये घर बांधण्याचे स्वप्न पूर्ण होईल. घर बांधताना सगळ्यात जास्त खर्च हा बांधकाम साहित्याचा असतो. त्यात रेती आणि सिमेंटचा खर्च सर्वाधिक असतो. तसेच, प्रत्येक वर्षी पावसाळ्यात लोखंडी सळ्यांच्या किमती कमी होत असल्याचे दिसून येते. आता यंदा जर सिमेंटच्या किंमती पण कमी झाल्यात, तर सर्वसामान्य नागरिकांना घर बांधणे सोपे जाईल.