खर्च कमी अन् जास्त ताकद असलेली ही लुना लवकरच सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होणार असल्याची शक्यता आहे. इंधनाचे दर सातत्यानं वाढत (Fuel price hike) असताना ही लुना पुन्हा एकदा सर्वसामान्यांमध्ये आपली उपयोगिता सिद्ध करणार आहे. सुरुवातीला जेव्हा लोकांना महागड्या बाइक परवडत नव्हत्या तेव्हा लुना हीच त्यांचा आधार होती. त्यातही कायनेटिक लुना (Kinetic Luna) घेणं अनेकांचं स्वप्न असायचं. कारण लुना अतिशय स्वस्त श्रेणीत उपलब्ध होत होती.
Table of contents [Show]
प्रत्येक घराची पसंती
साधारणपणे 50 वर्षांपूर्वी म्हणजेच 1972मध्ये लुना लॉन्च करण्यात आली होती. तेव्हा प्रत्येक घराची ती पसंती होती. ती लोकप्रिय होऊ लागल्यानंतर कंपन्यांनी नवनवीन मॉडेल्स बाजारात आणण्यास सुरुवात केली. दरम्यान, साल 2000मध्ये लुनाचं उत्पादन बंद करण्यात आलं. आता पुन्हा लुना येतेय, यावेळी मात्र ती इंधनावर नसून ईव्ही स्वरुपात येणार आहे. खास वैशिष्ट्येदेखील असणार आहेत. पाहूया...
ट्विट करून माहिती
लुना कंपनीच्या सीईओ सुलज्जा मोटवानी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर ही माहिती दिलीय. आपल्या वडिलांचा फोटो ट्विट केला असून "चल मेरी लुना" अशी टॅगलाइन दिलीय. ए ब्लास्ट फ्रॉम द पास्ट. चल मेरी लुना आणि या प्रॉडक्टचे निर्माते माझे वडील पद्मश्री अरूण फिरोदिया, असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलंय. या ट्विटमध्ये कायनेटिक लुनासोबत वडिलांचा फोटो तसंच त्यावेळच्या जाहिरातीचा एक व्हिडिओ आपल्याला दिसतोय.
A blast from the past!! “Chal Meri Luna” and it’s creator.. my father, Padmashree Mr. Arun Firodia!
— Sulajja Firodia Motwani (@SulajjaFirodia) May 29, 2023
Watch this space for something revolutionary & exciting from Kinetic Green….u r right …it’s “e Luna!!! ❤️@KineticgreenEV @ArunFirodia @MHI_GoI @PMOIndia @ficci_india @IndianIfge pic.twitter.com/4Nh9IHZdm2
किफायतशीर किंमतीत सादर होणार?
लुनाचं हे नवं मॉडेल अत्यंत किफायतशीर किंमतीत तयार केलं जात असल्याचं कंपनीचं म्हणणं आहे. या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत या ई लुनाचं लॉन्चिंग होण्याची शक्यता आहे. साधारण 50 वर्षांपूर्वी ही कंपनी सुरू करण्यात आली होती. आपल्या याच जुन्या ब्रँडसोबत कंपनी पुढे जातेय.
फेमसाठी अर्ज
या संदर्भात उद्योग मंत्रालयाकडून आवश्यक त्या सर्व मंजुरी मिळाल्या आहेत. कंपनीनं फेम (Faster Adoption and Manufacturing of Hybrid & Electric Vehicles) सब्सिडीसाठीदेखील अर्ज केलाय. पुढच्या आठवड्यापर्यंत त्याला मंजुरी मिळणं अपेक्षित आहे. लुना ईव्हीचं उत्पादन पायलट म्हणून सुरू केलं जाऊ शकतं. यासाठी कंपनी मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्याच्या प्रयत्नात असणार आहे.
दररोज 2000 युनिट्सची विक्री
सुरुवातीला जेव्हा प्रथमच कायनेटिकनं आपली लुना सादर केली होती, त्यावेळी ती इंधनावर चालणारी होती. तिचं पेट्रोल इंजिन होतं. त्यावेळची ती एक लोकप्रिय दुचाकी होती. त्यावेळी त्यात 50 सीसीचं बसवलं जात होतं. कंपनी दररोज या लुनाचं जवळपास 2000 युनिट्स विक्री करत होती. याची किंमतही अत्यंत कमी ठेवण्यात आली होती. त्यामुळे त्यावेळी या लुनाची अधिकाधिक विक्री होत होती. आता ई लुनादेखील त्याचप्रमाणे विक्रम प्रस्थापित करेल, असा कंपनीला विश्वास आहे.
विविध ई बाइक्स
सध्या विविध कंपन्यांमार्फत ई दुचाकींची निर्मिती केली जाते. स्पोर्ट्स बाइक्स तसंच स्कूटरच्या डिझाइनमध्ये या ई बाइक्स बाजारपेठेत उपलब्ध आहेत. त्यांच्या किंमतीही सर्वसामान्यांसाठी काही प्रमाणात न परवडणाऱ्या आहेत. लुनाच्या डिझाइनमध्ये अजूनतरी एकही दुचाकी बाजारपेठेत उपलब्ध नाही. त्यामुळे कायनेटिकची येणारी लुना काय कमाल करते, हे आगामी काळात दिसून येणार आहे. विशेष म्हणजे किंमत किती असणार, याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.