सेल्स आणि मार्केटिंगपासून, भाषांतर ते मजकूर विकसित करण्यापर्यंत तसेच सॉफ्टवेअर डेव्हलप करण्यापासून मशीन टूल्समध्ये स्थानिक भाषांचा वापर करण्यामध्ये हिंदी, मराठी, तेलुगु, तमिळ, मल्याळम, कन्नड, गुजराती, ओडिया, बांगला आणि अशाप्रकारच्या स्थानिक भाषेतील लोकांची मार्केटमध्ये मोठी मागणी आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील कंपन्याही भारतातील स्थानिक भाषांमध्ये रुचि दाखवत आहेत. एकूणच वेगवेगळ्या प्रकारच्या कामांसाठी भारतातील स्थानिक भाषांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. ही मागणी अचानक का वाढू लागली आहे. स्थानिक भाषांना मल्टी नॅशनल कंपन्या का प्रोमोट करत आहेत. स्थानिक भाषेला खरंच काही मार्केट व्हॅल्यू आहे का? अशा अनेक गोष्टी आज आपण 'आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिना'निमित्त जाणून घेणार आहोत.
भारतातील सध्याच्या नामांकित आणि लोकप्रिय असलेल्या नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणाऱ्या वेबसाईट्स पाहिल्या तर स्थानिक भाषेतील तज्ज्ञांना मागणी असल्याचे दिसून येते. जसे की, बऱ्याच मोठमोठ्या कंपन्यांना रिजनल लॅग्वेज मॅनेजर (India Regional Language Manager), भाषा तज्ज्ञ/वरिष्ठ भाषा तज्ज्ञ (Language Expert/Sr. Language Expert), भाषांतरकार, स्थानिक भाषा बोलणारे, समजणारे, त्या भाषांमध्ये मजकूर लिहणारे अशा उमेदवारांची गरज आहे.
Table of contents [Show]
भाषेबाबतची आकडेवारी काय सांगते?
- भारतात 22 मान्यता प्राप्त भाषा आहेत; तर 11 भाषांची स्वत:ची लिपी आहे.
- किमान 10 हजार भाषिक असलेल्या 120 पेक्षा जास्त भाषा भारतात आहेत.
- बीबीसीच्या अहवालानुसार एकूण 130 कोटी भारतीयांपेकी फक्त 125 दशलक्ष भारतीयांना इंग्रजी येते.
- प्रादेशिक किंवा स्थानिक भाषेचे ज्ञान हा सध्याच्या नोकरीच्या बाजारपेठेतील सर्वाधिक मागणी असलेला निकष आहे.
- स्थानिक भाषेमध्ये मजकूर तयार करणे किंवा सॉफ्टवेअर तयार करणाऱ्यांना मागणी आहे.
इंग्रजी भाषेव्यतिरिक्त इतर भाषांना मार्केटमध्ये मागणी
बीबीसीने काही वर्षांपूर्वी केलेल्या सर्वेक्षणानुसार, भारताची अंदाजित लोकसंख्या 130 कोटीहून अधिक आहे. त्यापैकी फक्त 125 दशलक्ष भारतीयांना ती भाषा येते. त्यामुळे उर्वरित लोकसंख्या असलेले भारतीय नागरिक हे त्यांच्या स्थानिक भाषांना प्राधान्य देतात. त्यात त्यांचा हातखंडा आहे. त्यामुळे इतक्या मोठ्या संख्येने असलेल्या भारतीयांसाठी स्थानिक भाषेतील रोजगार ही मोठी संधी आहे. सध्या भारतातील महानगरांमध्ये किंवा प्रमुख शहरांमध्ये इंग्रजी ही रोजगाराची आणि संवादाची भाषा म्हणून स्वीकारली गेली आहे. तिथे स्थानिक किंवा मातृभाषेतील रोजगाराची संधी तुलनेने कमी आहे. पण दुसऱ्या किंवा तिसऱ्या टप्प्यातील शहरांमध्ये अजूनही स्थानिक भाषेचाच वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यामुळे अशा शहरांमधील पर्यटन, अॅग्रीटेक, फूड प्रोसेसिंग, हॉस्पिटॅलिटी, मायक्रो-फायनान्स, हेल्थकेअर, रिटेल आणि ई-कॉमर्स या क्षेत्रांना त्यांचा व्यवसाय तळागाळापर्यंत नेण्यासाठी स्थानिक भाषेतील तज्ज्ञांची गरज लागणार आहे.
कोणताही व्यवसाय किंवा प्रोडक्ट हे स्थानिक पातळीपर्यंत नेण्यासाठी त्याचे मार्केटिंग, त्याची माहिती, जाहिराती या स्थानिक भाषेतूनच कराव्या लागतात. कारण कोणत्याही प्रोडक्टची माहिती जोपर्यंत स्थानिक भाषेत दिली जात नाही. तोपर्यंत ते प्रोडक्ट त्या माणसांपर्यंत पोहोचत नाही. बिझनेसची हीच गरज लक्षात घेऊन अनेक मल्टीनॅशनल कंपन्यांनी स्थानिक भाषेमध्ये आपल्या प्रोडक्टची माहिती देण्यास सुरूवात केली. अर्थात यासाठी स्थानिक भाषेची नस ओळखणारा माहितगार (Language Expert) लागत आहे.
सोशल मिडियावर स्थानिक मजकुराला अधिक मागणी
सोशल मिडियावर जसे फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअप, शेअरचॅट, वेबसाईट्स अशी अनेक माध्यमे आहेत. ज्यांचा वापर भारतीय करत आहेत. अर्थात पूर्वी या सर्व माध्यमांसाठी इंग्रजी ही भाषा प्रमाण मानली जात होती. पण आता यात मोठ्या प्रमाणात बदल होऊ लागला आहे. मोठमोठ्या कंपन्या देखील स्थानिक भाषेमध्ये आपल्या वेबसाईट सुरू करत आहेत. थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांची भाषा अवगत असली पाहिजे. हाच धाग पकडून अनेक कंपन्या, ई-कॉमर्स वेबसाईट्स, सोशल मिडिया प्लॅटफॉर्म स्थानिक भाषांना प्राधान्य देत आहेत.
सरकारकडूनही स्थानिक भाषांना प्रोत्साहन
काही वर्षांपूर्वी झालेल्या स्थानिक ग्रामीण बॅंकेतील क्लास वन ऑफिर्स आणि सहाय्यकांची परीक्षा सरकारने इंग्रजी आणि हिंदी भाषा वगळता स्थानिक 13 भाषांमध्ये घेतली होती. अर्थमंत्र्यांनीही याबाबत घोषणा केली होती की, स्थानिक ग्रामीण बॅंकेतील नोकरभरतीसाठी स्थानिक भाषेला प्राधान्य देणार आहे.
अशाप्रकारे सरकारच्या मदतीने पब्लिक आणि प्रायव्हेट सेक्टरमध्ये स्थानिक भाषा हा भारतात नोकरीतील महत्त्वाचा निकष मानला जाऊ लागला आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताकडे ग्राहक म्हणून पाहिले जाते. त्यामुळे मल्टीनॅशनल कंपन्याही स्थानिक भाषांना प्राधान्य देत त्या त्या भाषेतील तज्ज्ञांना नोकरीची संधी देत आहे.