Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

जाणून घ्या शेअर बाजारातील ‘सर्किट’चा अर्थ

जाणून घ्या शेअर बाजारातील ‘सर्किट’चा अर्थ

काय असते शेअर मार्केटमध्ये अप्पर आणि लोवर सर्किट Upper and Lower Circuit

शेअर बाजाराशी संबंधित बातम्यांमध्ये अप्पर सर्किट (Upper Circuit) आणि लोअर सर्किट (Lower Circuit) असे शब्द कानावर पडतात. अनेकदा गुंतवणूकदारांनाही याबाबत नेमकेपणाने कल्पना नसते. सोप्या भाषेत याचा अर्थ सांगायचा झाल्यास एखाद्या शेअरचे अथवा निर्देशांकाचे भाव अमर्याद वाढू नयेत यासाठी अप्पर सर्किटची मर्यादा घातली जाते; तर शेअर्समध्ये वा निर्देशांकामध्ये अतिघसरण होऊ नये यासाठी लोअर सर्किटची मर्यादा ठेवली जाते.

लोअर सर्किट : एखाद्या शेअरचा भाव काही कारणांमुळे कमी होत असेल तर बहुतांश गुंतवणूदकार तो शेअर विकून आपला नफा काढून मोकळे होण्याचा विचार करतात. यातून विक्रीचा सपाटाच सुरू होतो. परिणामी त्या शेअरचा भाव मोठ्या प्रमाणात घसरत घसरत खाली येऊ शकतो. म्हणून लोअर सर्किट लावले जाते. शेअर्सची घसरण एका मर्यादेपर्यंतच व्हावी यासाठी एनएसई (NSE) आणि बीएसई (BSE)ने सर्किटचे नियम केले आहेत. यामुळे शेअर बाजारत आणखी पडझड होत नाही.

अप्पर सर्किट : एखाद्या शेअरचा भाव खूप वाढत असेल किंवा अन्य काही कारणांमुळे संबंधित कंपनीत गुंतवणूक करण्याचा ओढा वाढू लागला तर अशा वेळी त्या शेअरचे भाव कमालीचे वाढू लागतात. बरेचदा बाजारातील मोठे गुंतवणूकदार अशा स्थितीमध्ये लाखांच्या अथवा कोटींच्या संख्येने त्या शेअरची खरेदी करतात. त्यामुळे भावांत विलक्षण वाढ होऊ लागते. अर्थातच ही कृत्रिम किंवा अनैसर्गिक तेजी मानली जाते. अशा तेजीचा फुगा फुटल्यानंतर छोट्या किंवा किरकोळ गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळेच त्याला लगाम लावण्यासाठी अप्पर सर्किट लावले जाते.

आपण बाजारातील साधारण 20 रुपयांपेक्षा कमी किमतीचे शेअर्स पाहिले तर त्यात ही संकल्पना अधिक स्पष्ट होते. गतवर्षी कोविडच्या काळात ऑक्सिजनची निर्मिती करणार्या एका कंपनीबाबत असे घडले होते. देशभरात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्याने या कंपनीकडे मागणीचा प्रचंड ओघ सुरू झाला. ही बातमी समोर येताच गुंतवणूकदारांच्या त्यावर उड्या पडू लागल्या. त्यामुळे या कंपनीच्या समभागात मोठी तेजीही येऊ लागली. तात्काळ त्यावर सर्किट लावण्यात आले. अलीकडेच व्होडाफोन आयडियाबाबतही असाच प्रकार घडला होता. 11-12 रुपयांवर असणारा हा समभाग 4 ते 5 रुपयांपर्यंत खाली घसरला होता.

निर्देशांकांना सर्किट
शेअरप्रमाणेच सेन्सेक्स किंवा निफ्टी सारख्या निर्देशांकांना देखील सर्किट लिमिट असते. निर्देशांकात दुपारी 1 च्या आत 15 टक्के घसरण होत असेल तर बाजार दोन तासासाठी थांबवला जातो. यात सुरवातीला 1 तास 45 मिनिटे बाजार संपूर्णपणे रोखण्यात येतो. त्यातील 15 मिनिटांचे प्री-ओपन सेशन असते. जर 15 टक्के सर्किट दुपारी 1 नंतर लागले तर एक तासासाठी कारभार थांबवला जातो. यात सुरवातीची 45 मिनिटे कामकाज संपूर्णपणे थांबवले जाते आणि 15 मिनिटे प्री-ओपन सेशन असते. दुपारी 2.30 वाजल्यानंतर 15 टक्क्यांचे लोअर सर्किट लागले तर बाजार बंद होईपर्यंत ते कायम ठेवण्यात येते.

बाजार कधी सुरू होतो?
निर्देशांकाला सर्किट लागल्यास बाजाराचे व्यवहार थांबवले जातात. बाजार पुन्हा सुरू करताना 15 मिनिटाचे प्री-ओपन सत्र आखण्यात येते. शेवटी सामान्य स्तरावर बाजार सुरू होतो आणि हा बाजार पुढील सर्किट लागेपर्यंत किंवा सत्राच्या शेवटपर्यंत लागू राहतो. भारतीय शेअर बाजारात अप्पर आणि लोअर सर्किटचे नियोजन 28 जून 2001 नंतर सुरू झाले आहे.