सध्याच्या धकाधकीच्या जीवनशैलीत वावरत असतांना घरात कुत्रा पाळणे हे मानसिक आधारासाठी आणि घरासोबतच स्वत:च्या सुरक्षेसाठी आवश्यक मानले जाते. कुटुंबात एखादा कुत्रा असेल तर घरातील तणाव कमी होतो असे अनेक मानसशास्त्रीय तज्ज्ञांचे मत आहे. अनेकांना पाळीव प्राण्यांची आवड असते. त्यांची योग्य काळजी घेऊन त्यांना छोट्या-छोट्या पण महत्त्वाच्या गोष्टी शिकवायला अनेकांना आवडते. हीच गोष्ट लक्षात घेऊन स्वतःच्या मालकीच्या प्राण्यांप्रमाणे इतरांना ही शिकवता आलं तर? बाकीच्या पाळीव प्राण्यांना शिकवण्यासाठी स्वतःला काय शिकावं लागेल? याचा काही आर्थिक फायदा होईल का? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात, डॉग ट्रेनर मीरा ठोसर (Meera Thosar, Dog Trainer) यांच्याकडून.
जर कुटुंबात राहण्यासाठी किंवा सुरक्षिततेच्या दृष्टीने कुत्रा पाळायचा असेल तर त्या दृष्टीने कुत्र्यांना प्रशिक्षण द्यावे लागते. एखाद्या कुटुंबात राहण्यासाठी कुत्र्याला सवयी लावण्यासाठी खास प्रशिक्षक असतात.पेशाने कुत्र्यांची प्रशिक्षक अर्थात डॉग ट्रेनर म्हणून मीरा ठोसर या तरुण उद्योजिका देशभरात प्रसिद्ध आहेत.
Table of contents [Show]
- वेगळ्या क्षेत्रातील उद्योजिकेचा प्रवास...
- प्राण्यांची देखभाल कशी करायची हे कसे कळले?
- डॉग ट्रेनिंगचं प्रशिक्षण कुठून घेतले?
- कुत्र्यांचं बोर्डिंग ‘हॅपी टेल्स’ ची सुरुवात कशी झाली?
- ज्यांना या क्षेत्राची आवड आहे, त्यांना काय सल्ला द्याल?
- या क्षेत्रातील अनुभव घेणाऱ्यांसाठी तुमचा उपक्रम काय आहे?
- डॉग ट्रेनिंग कोर्सेस कुठून करता येतात?
- बोर्डिंग सेंटरला मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल काय सांगाल?
- ट्रेनिंग सेंटरची आर्थिक गणिते कशी सांभाळता?
- या क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल तर काय मेहनत घ्यावी लागेल?
- हॅशटॅग एम पॉवर बद्दल काय सांगाल?
वेगळ्या क्षेत्रातील उद्योजिकेचा प्रवास...
मीरा ठोसर या तरुण उद्योजिका देशभरात डॉग ट्रेनर म्हणून प्रसिद्ध आहेत. शाळेत शिकत असताना जखमी पिल्लांची, पक्ष्यांची सुश्रुता करण्याची आवड मीरा यांना होती.
प्राण्यांची देखभाल कशी करायची हे कसे कळले?
प्राण्यांवर प्रथमोपचार कसे करायचे, कोणत्या प्राण्याला, पक्ष्याला कशा पद्धतीने हाताळायचे तसेच या क्षेत्रात काम करताना प्राण्यांची किती मोठ्या प्रमाणात जबाबदारी घ्यावी लागते याबद्दल पुण्यातील कात्रज सर्पोद्यान येथे स्वयंसेवक म्हणून कार्य करतांना मी प्रशिक्षण घेतले. दहावीच्या परीक्षेनंतर खऱ्या अर्थाने सर्पोद्यानातील शिक्षणात माझी जडणघडण झाली.
डॉग ट्रेनिंगचं प्रशिक्षण कुठून घेतले?
मी २००६ मध्ये मुंबईच्या शिरीन मर्चंट यांच्याकडून डॉग ट्रेनिंगचं प्रशिक्षण घेतले. तेव्हापासून मी पुण्यात तिसऱ्या प्रशिक्षित महिला डॉग ट्रेनर म्हणून कामाला सुरुवात केली. त्या वेळी डॉ. मिलिंद हाटेकरांकडेही माझे काम सुरु होते. या काळात कुत्र्यांची प्रसूती करणे, वेगवेगळ्या प्राण्यांच्या ऑपरेशन्समध्ये मदत करणे अशी सर्व कामे करत असतांना माझे ग्राहकही वाढत होते. वेगवेगळ्या लोकांच्या ओळखी होत होत्या. म्हणून मी कुत्र्यांच्या बिहेव्हियरल संदर्भात ॲडव्हान्स कोर्स पूर्ण केला.
महाराष्ट्र राज्याचे डॉग ट्रेनिंग कोर्सेस बद्दल काय सांगाल?
२००८-०९ मध्ये मध्ये महाराष्ट्र पोलिसांकडून मला कोर्ससाठी विचारण्यात आले. पुण्यात महाराष्ट्र राज्याचे डॉग ट्रेनिंगचे मुख्यालय आहे. संपूर्ण राज्यात जे काही डॉग स्क्वॉड आहेत त्यांच्या सर्व ट्रेनर्सना पुण्यातून प्रशिक्षण दिले जाते. एका प्रशिक्षणाचा साधारण ८ ते ९ महिन्यांचा कालावधी असतो. या दोन वर्षात मी महाराष्ट्र पोलिसांसाठी तीन ट्रेनिंग कोर्सेस घेतले. तसेच एक कोर्स राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (एनडीआरएफ) यांच्या डॉग स्क्वॉडच्या ट्रेनर्ससाठी घेतला.
कुत्र्यांचं बोर्डिंग ‘हॅपी टेल्स’ ची सुरुवात कशी झाली?
मला आधीपासूनच आवड असल्यामुळे प्राण्यांसाठी काहीतरी करायचं हे माझं ध्येय होतं. ते २०११ साली ‘हॅपी टेल्स’ च्या रूपाने पूर्ण झालं. पुण्यातील मुळशी तालुक्यात असणाऱ्या भूगाव येथे मी कुत्र्यांसाठी बोर्डिंग व ट्रेनिंग सेंटर सुरु केले. ज्या लोकांचे कुत्रे आक्रमक असतात, ज्यांना घरात ठेऊन प्रशिक्षण देणे शक्य नाही अशा लोकांसाठी मी ट्रेनिंग प्रोग्रॅम सुरु केला. यामध्ये ठराविक काळासाठी कुत्रे सेंटरमध्ये आणले जातात. तेथे त्यांना प्रशिक्षण मिळते. ते पूर्ण झाल्यावर त्यांचे पालक त्यांना घेऊन जातात.
ज्यांना या क्षेत्राची आवड आहे, त्यांना काय सल्ला द्याल?
मी सध्या ॲग्रेसिव्ह डॉग स्पेशालिस्ट म्हणून काम पाहते.९ वर्षात साधारण पाच ते सहा हजार कुत्र्यांना मी प्रशिक्षण दिले आहे. “ज्यांना बोलता येत नाही, त्यांच्याशी संवाद साधून त्यांची काळजी घेणे हे काम करण्यासाठी आवडीसोबतच प्रशिक्षण सुद्धा तेवढच महत्त्वाच असल्याचे मीरा यांनी सांगितले.”
या क्षेत्रातील अनुभव घेणाऱ्यांसाठी तुमचा उपक्रम काय आहे?
ज्या लोकांनी या क्षेत्रात शिक्षण घेतले आहे परंतु, काही कारणाने त्यांना कामाचा अनुभव मिळाला नाही, अशा लोकांसाठी २०१५ पासून मी स्वत:च्या सेंटरवर इंटर्नशिप प्रोग्रॅम घ्यायला सुरुवात केली. या क्षेत्रात आवड असणाऱ्यांसाठी येथे ट्रेनिंग कोर्सेस आयोजित केले जातात.
डॉग ट्रेनिंग कोर्सेस कुठून करता येतात?
भारतात विद्यापीठ मान्यताप्राप्त अभ्यासक्रम उपलब्ध नसले तरी व्यावसायिक ट्रेनर्सकडून घेतले जाणारे कोर्सेस उपलब्ध आहेत. भारताबाहेर कुत्र्यांच्या मानसशास्त्र यासंबंधी अनेक कोर्सेस उपलब्ध आहेत. त्याचबरोबर कुत्र्याचे बिहेव्हियरल कोर्सेसही उपलब्ध आहेत.
बोर्डिंग सेंटरला मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल काय सांगाल?
कोरोनाच्या साथीमुळे अनेक घरात लोकांना विलगीकरणात ठेवले गेले. काही लोक हॉस्पिटलमध्ये होते. अशा वेळी कुत्र्यांची गैरसोय होऊ नये म्हणून लोकांनी कुत्र्यांना बोर्डिंग सेंटरवर राहायला सोडले होते. त्यामुळे पुणे शहर बंद असतानाही आम्ही काम करतच होतो. जी गोष्ट मी मनापासून स्वीकारली ती पूर्ण करण्याचे बाळकडू मला लहानपणीच मिळाले असल्याने मला या व्यवसायात काम करताना नेहमी मजा आली.’
ट्रेनिंग सेंटरची आर्थिक गणिते कशी सांभाळता?
हे क्षेत्र निराळे असल्यामुळे सर्व गोष्टी लक्षात घेऊन मुक्या प्राण्यांची काळजी घेऊन पैशांचे व्यवहार काटेकोरपणे करावे लागतात. स्वत:चे कलागुण ओळखून त्यानुसार वाटचाल केली तर या क्षेत्रात आर्थिक फायदा आहे. आपल्याकडे असणारा कुत्रा खुश असेल तर मालक खुश होतो. त्यामुळे काहीवेळा ग्राहकांच्या तक्रारी असल्या तरीही कुत्रा समाधानी असेल तर त्यांना फक्त कुत्र्यांसाठी काही गोष्टी करणे भाग असते. त्यामुळे अशावेळी आर्थिक व्यवहारांवर काही परिणाम होत नाही. त्यामुळे सर्व कर्मचाऱ्याचा पगार वेळेवर देऊन स्वत:च्या ट्रेनिंग सेंटरचे आर्थिक गणित सांभाळणे सोपे जाते.
या क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल तर काय मेहनत घ्यावी लागेल?
प्राण्यांच्या वागण्याची पद्धत जाणून घेऊन त्यामागचे कारण, त्यांच्या गरजा, त्याचं जेवण, त्यांच्या हालचाली या सर्व गोष्टींचे प्रशिक्षण घेऊन काम करण्याची आवड असलेल्या व्यक्ती नक्कीच या क्षेत्रात यशस्वी होऊ शकतात. मला ट्रेनिंग घेऊन १६ वर्ष झाली असली तरीही मी रोज नवीन गोष्टी शिकत असते.
हॅशटॅग एम पॉवर बद्दल काय सांगाल?
माझे स्वत:चे चार कुत्रे आहेत. मिली, माया, मायरा आणि माही अशी त्यांची नावे आहेत. माझ्या मांजराचे नाव मिस्टर फिस आहे. त्यात माझ्या बहिणीचे नाव मधुरा आहे. म्हणूनच, आमच्या ग्रुपला एम पॉवर, एम गँग किंवा टीम एम म्हणून ओळखले जाते.
स्त्रोत:यशस्वी उद्योजक