इंडोनेशियाने पामतेल निर्यातीवरील बंदी उठवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे महागाईने होरपळणाऱ्या देशातील सर्वसामान्यांसाठी दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या निर्णयामुळे आगामी काळात खाद्यतेलाच्या किमती कमी होऊ शकतात. इंडोनेशियाने 23 मे पासून पाम तेलावरील बंदी उठवण्याची घोषणा केली आहे. गुरुवारी देशातील व्यापारी नेत्यांनी राष्ट्रपतींकडे निर्यात निर्बंध हटवण्याची मागणी केली होती, त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
भारत इंडोनेशियामधून पाम तेल मोठ्या प्रमाणात आयात करतो, परंतु इंडोनेशियाने देशांतर्गत किमती नियंत्रित करण्यासाठी इतर देशांना पामतेल देण्यास नकार दिला होता. मात्र, आता परिस्थिती सुधारल्याने इंडोनेशिया 23 मे पासून पाम तेल निर्यात बंदी उठवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा फायदा भारतालाही होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. इंडोनेशिया पाम तेलाचा जगातील सर्वात मोठा उत्पादक असून, भारताच्या वार्षिक गरजांपैकी 50 टक्के गरजा फक्त इंडोनेशिया पूर्ण करतो. भारतीय घरांमध्ये पाम तेल थेट स्वयंपाकात वापरले जात नाही परंतु त्याची उपस्थिती सर्वत्र आहे. खाद्यतेल ते सौंदर्य प्रसाधने, साबण, डिटर्जंट यासारख्या FMCG उत्पादनांमध्येही पाम तेलाचा वापर केला जातो.
इतर तेलांच्या किमतीवर परिणाम होईल
गेल्या 28 एप्रिलला इंडोनेशियन देशातील वाढत्या किमती रोखण्यासाठी कच्चे पाम तेल आणि त्याच्या काही डेरिव्हेटीव्ह उत्पादनांच्या निर्यातीवर बंदी घातली होती. बंदी उठल्यानंतर 2-2.5 लाख टन पाम तेल लवकरच भारतात येईल आणि पुरवठा सुधारल्यामुळे दरावर परिणाम होईल. वास्तविक, भारत 60-70% तेल आयात करतो. यापैकी 50-60% पाम तेल आहे. या निर्णयामुळे केवळ पामतेलाच्या किमती कमी होणार नाहीत, तर इतर तेलांवरही त्याचा परिणाम होईल.
image source - https://bit.ly/3MAImPA