मोबाईल वापरणाऱ्या ग्राहकांना दररोज होम लोन, कार लोन, क्रेडिट कार्ड, शॉपिंग ऑफर, इन्शुरन्स यासारखे अनेक कॉल्स येत असतात. मात्र, यातील अनेक फोन कॉल्स हे बनावट देखील असतात. ग्राहकांची फसवणूक करण्यासाठी येणाऱ्या अशा कॉल्सची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे आता टेलिकॉम कंपन्यांनी या प्रकारास आळा घालण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत घेण्याचा विचार सुरू केला आहे. ग्राहकांना येणारे कॉल्स AI द्वारे रोखण्याचा टेलिकॉम कंपन्या विचार करत आहेत.
फेक कॉल रोखण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (fraud Mobile call)
सध्या ग्राहकांना येणारे फ्रॉड कॉल रोखण्यासाठी कोणतेही तंत्रज्ञान वापरले जात नाही. काही कॉलर आयडेन्टिफिकेशन अॅपद्वारे फक्त कॉलरची माहिती कळते. मात्र, प्रत्येक वेळी या अॅपद्वारे दिलेली माहिती खरी असेलच असे नाही. शिवाय, भारतात असे अनेक लोक आहेत, जे ट्रु कॉलरसारखे कॉल आयडेन्टिफिकेशन अॅप्स वापरत नाहीत. ज्या ग्राहकांना तांत्रिक गोष्टी जास्त समजत नाहीत, त्यांची फसवणूक करणे फेक कॉल करणाऱ्यांना सोपे असते. भीती दाखवून किंवा धमकावून पैसे उकळण्याचे प्रकार आपल्या आजूबाजूला सर्सार घडत आहेत. त्याला रोखण्यासाठी आता AI मदतीला येणार आहे.
66% ग्राहकांना प्रतिदिन सरासरी तीन फेक कॉल
सध्या AI आणि मशिन लर्निंग तंत्रज्ञानात मोठी प्रगती होत आहे. मात्र, फेक कॉल रोखण्यासाठीचे तंत्रज्ञान बाल्यावस्थेत आहे. भविष्यात यामध्ये सुधारणा होतील. फेक कॉलचे पॅटर्न ओळखण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता फायद्याची ठरू शकते. 66% मोबाईल धारकांना दरदिवशी सरासरी 3 फसवणुकीचे कॉल येतात, असे लोकलसर्कल या कंपनीने केलेल्या अभ्यासातून समोर आले आहे. AI मुळे स्पॅम कॉल कोणते आहेत हे टेलिकॉम कंपनीला समजेल, तसेच हे कॉल्स ग्राहकांच्या मोबाईलवर येण्यापासून रोखता येतील.
फेक कॉल रोखण्यासाठी समिती स्थापन
सध्या ग्राहकांना मोबाईलवर येणारे फेक मेसेज रोखण्यासाठी टेलिकॉम कंपन्या ब्लॉकचेन हे फिचर वापरतात. टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाने असे फिचर वापरणे कंपन्यांना अनिवार्य केले आहे. बनावट मेसेज असल्याचे या तंत्रज्ञानाद्वारे ग्राहकाला सूचित केले जाते. आता फेक कॉल्स रोखण्यासाठी भविष्यात AI आणि मशिन लर्निंग टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात येईल. केंद्र सरकारने बनावट कॉल रोखण्यासाठी नुकतेच एक समिती स्थापन केली आहे. या समितीमध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, सेबी, टेलिकॉम रेग्युरेटरी अथॉरिटी आणि ग्राहक मंत्रालयातील अधिकाऱ्यांचा समावेश आहे.