Dhoop Stick Business: नागपूर शहरातील टेकडी गणेश मंदिरात दररोज हजारो-लाखोंच्या संख्येने भाविक येतात. हे भाविक मोठ्या श्रद्धेने गणरायाला हार-फुले अर्पण करतात. परंतु, काही तासानंतर हे निर्माल्य कचऱ्यात किंवा इतरत्र फेकली जाते. भाविकांनी श्रद्धेने अर्पण केलेले हे हार-फूले अनेकदा पायदळी देखील तुडवले जातात. याच सर्व गोष्टींवर उपाय म्हणून 'वेस्ट मधून बेस्ट' या संकल्पनेतून काही करण्याचा विचार टेकडी गणेश मंदिर संस्थेच्या विश्वस्तांनी केला आणि यामधूनच सुरु झाला धूपबत्ती तयार करण्याचा प्रवास.
वेस्टमधून ‘बेस्ट’
'वेस्टमधून बेस्ट' हा उपक्रम सुरु करुन चार महिने झाले आहेत. जमा झालेले निर्माल्य वाळवले जाते. मग मशीनच्या माध्यमातून त्याचे पावडर तयार केले जाते. त्यामध्ये गाईच्या शेणापासून तयार केलेले पावडर, सुगंधित द्रव्य, इत्यादी काही गोष्टी मिक्स करुन मशीनद्वारे धूपबत्ती तयार केली जाते. त्या धूपबत्ती उन्हामध्ये वाळवून त्याची पॅकिंग केली जाते. दररोज गोळा होणाऱ्या निर्माल्यापासून जवळपास 10 ते 15 किलो धूपबत्ती तयार केली जाते. या धूपबत्तीच्या पाकिटांची विक्री मंदिर परीसरातच केली जाते.
महिलांना मिळाला रोजगार
दररोज या धूपबत्तीच्या 400 ते 500 पाकिटांची विक्री होत असते. सेवाभावी वृत्तीने अतीशय कमी दरात म्हणजे 10 रुपयाला एक पॅकेट अशी ही धूपबत्ती विकली जाते. यामाध्यमातून मिळालेले पैसे धूपबत्तीचे कार्य करणाऱ्या महिलांना महिन्याला पगार स्वरुपात दिले जाते. 'वेस्ट मधून बेस्ट' या उपक्रमाच्या माध्यमातून एकूण 5 महिलांना रोजगार देण्यात आला आहे. या महिलांना 10 हजार रुपये मासिक वेतन दिले जाते. शिवाय 10 रुपयाला एक पॅकेट मिळत असल्याने या धूपबत्तीची प्रचंड मागणी होत आहे.
व्यवसाय करण्यास देणार निशुल्क निर्माल्य
धूपबत्ती तयार करण्याचे मशीन, शेड तयार करणे तसेच इतर सर्व खर्च मिळून अडीच ते तीन लाख रुपयांची गुंतवणूक मंदिर संस्थेने यामध्ये केलेली आहे. यामुळे मंदिरात दररोज हजारो टन गोळा होणाऱ्या निर्माल्याचा प्रश्न तर मार्गी लागलाच. शिवाय बेरोजगारांच्या हाताला कामही मिळाले. तसेच, प्रचंड भक्ती भावाने मंदिरात हार-फुले वाहणाऱ्या भाविकांच्या भावना देखील यामाध्यमातून जपल्या जात आहे. तसेच, ज्या तरुणांना अशा प्रकारे वाळलेल्या फुलांपासून धूपबत्ती तयार करण्याचा व्यवसाय सुरु करायचा असेल, त्यांना टेकडी मंदिर संस्थानाने निशुल्क निर्माल्य देण्याचे आवाहन केले आहे.