Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Tech Layoff: 2022 मधील नोकर कपातीच्या ट्रेण्डने 2023 वर गंभीर सावट!

Tech Layoff 2022

Massive Tech Layoff in 2022: जगभरातील टेकबेस असलेल्या मोठमोठ्या कंपन्यांनी 2022 मध्ये कर्मचारी कमी करण्याचा निर्णय घेतल्याने येणाऱ्या नवीन वर्षात 2023 मध्ये नोकऱ्यांची स्थिती कशी असेल? यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Massive Tech Layoff: दोन वर्षांच्या कोरोनातील लॉकडाऊनमुळे संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली होती. ती आता कुठे नुकतीच सुरळित होण्याच्या मार्गावर होती. पण पुन्हा एकदा जगभरात आर्थिक मंदीचे वारे वाहू लागले आणि मोठ्या प्रमाणात नोकऱ्यांची कपात सुरू झाली. कोरोनाच्या काळात जगभरातील अनेक टेक कंपन्यांनी वर्क फ्रॉम कल्चर डेव्हलप केले. त्यामुळे तितक्याच प्रमाणात या कंपन्यांमध्ये नोकरभरतीसुद्धा झाली. पण आता याच टेक कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यास सुरूवात केली. 2022 मध्ये अनेक मोठमोठ्या कंपन्यांनी कर्मचाऱ्यांची कपात केली.

मेटा (Meta)

मेटा म्हणजे फेसबुकची कंपनी. मेटाचे सीईओ मार्क झुकेरबर्ग याने 9 नोव्हेंबरला कंपनीतून 13 टक्के कर्मचारी कपात करण्याचा निर्णय जाहीर केला. यात सुमारे 11 हजार कर्मचाऱ्यांना जगभरातून कमी केले. 2022 मधील नोकरकपातीतील हा सर्वांत मोठा निर्णय मानला जातो. तसेच कंपनीने मार्चे 2023 पर्यंत मेटामधील भरती थांबवली आहे.

ट्विटर (Twitter)

इलॉन मस्कने ट्विटरचा कारभार हातात घेतल्यानंतर, 27 ऑक्टोबरला ट्विटरचे तत्कालीन सीईओ पराग अग्रवाल यांच्यासह टॉप अधिकाऱ्यांना कामावरून कमी केले. त्यानंतर मस्कने कंपनीच्या महसुलात घसरण झाल्याचे कारण सांगून कंपनीतील 50 टक्के कर्मचारी असे एकूण 3700 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले. 

अमेझॉन (Amazon)

मेटा आणि ट्विटरच्या नोकर कपातीनंतर जणू काही कर्मचाऱ्यांना कमी करण्याचा ट्रेण्डच सुरू झाला. अमेझॉनने संपूर्ण जगभरातून 10 हजार नोकऱ्या कपात करण्याचा निर्णय घेतल्याची बातमी 14 नोव्हेंबरला न्यू यॉर्क टाईम्समध्ये प्रसिद्ध झाली होती. कंपनी टप्प्याटप्प्याने जानेवारी, 2023 पासून कर्मचारी कमी करेल, असे त्या बातमीत म्हटले होते. याचा परिणाम भारतातील कर्मचाऱ्यांवर होण्याची शक्यता आहे. यानंतर गुगल, मायक्रोसॉफ्ट या कंपन्यांनी सुद्धा कर्मचारी कमी करण्याची घोषणा केली. गुगलच्या अल्फाबेट कंपनीने सुमार परफॉर्मन्स देणाऱ्या 6 टक्के कर्मचाऱ्यांना कमी करणार असल्याचे 23 नोव्हेंबर, 2022 मध्ये म्हटले होते. तर मायक्रोसॉफ्ट कंपनीने ऑक्टोबरमध्ये सुमारे 1 हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरून कमी केले.

जगभरातील या नामांकित कंपन्यांच्या मागोमाग भारतातील स्टार्टअप कंपन्यांनीही कर्मचारी कमी करण्याचा निर्णय घेतला. या वर्षभरात एकूण 52 स्टार्टअपमधून सुमारे 18 हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरून कमी करण्यात आले. एकूणच टेकबेस असलेल्या मोठमोठ्या कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना कमी करण्याचा निर्णय घेतल्याने येणाऱ्या नवीन वर्षात म्हणजेच 2023 मध्ये नोकऱ्यांची स्थिती कशी असेल? यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 2022मधील या नोकरकपातीचा परिणाम आणि दबाव नक्कीच 2023 मध्येही असेल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.