Chai Sutta Bar: भारतात शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मुलांना सहसा नोकरी करण्याचा सल्ला दिला जातो. जास्त धोका पत्करू नका, महिन्याकाठी चांगला पगार मिळेल, अशी नोकरी शोधा अशी मानसिकता दिसून येते. मात्र, इंदौरमधील दोन मित्रांनी व्यवसायात धोका पत्करला आणि यशस्वी होऊनही दाखवले. 2016 साली सुरू केलेल्या चहा व्यवसायाचा टर्नओव्हर अवघ्या 8 वर्षांत दीडशे कोटींवर नेऊन दाखवला.
अनुभव दुबे आणि आनंद नायक हे दोघे बालपणीचे मित्र. दोघांचा जन्म मध्यप्रदेशातील इंदौर शहरातील. अनुभवचे वडील व्यापारी होते. (Chai sutta bar success story) मात्र, कौटुंबिक व्यवसाय न करता आपल्या मुलाने त्याला जे आवडेल त्यामध्ये करीअर करावं, असं त्यांच मत होतं. अनुभव बी. कॉमचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर सीए म्हणजेच चार्टर अकाउंटंटची तयारी करत होता. मात्र, त्यात यश न आल्यानं त्याने IAS होण्यासाठी UPSC च्या परीक्षेची तयारी सुरू केली.
IAS बनण्याचं स्वप्न सोडून व्यवसायाला सुरुवात
UPSC च्या तयारीसाठी दिल्लीलाही गेला. मात्र, नोकरी न करता व्यवसाय सुरु करण्याचा विचार त्याच्या डोक्यात येऊ लागला. नक्की काय व्यवसाय करावा त्याला सुचत नव्हतं. (Chai sutta bar tea Shop) तसेच जवळ पुरेसे पैसेही नव्हते. अनुभवचा मित्र आनंद नायक हा सुद्धा बी. कॉम पास होता. दोघेही बालपणीचे मित्र असल्याने सोबत मिळून काहीतरी करू असा विचार केला. त्यासाठी विविध व्यवसायांची माहिती घेऊ लागले. त्यातून जन्म झाला 'चाय सुट्टा बार' या टी शॉपचा.
'चाय सुट्टा बार' चा पहिलं शॉप
चाय सुट्टा बार हे चहाचं शॉप सुरू करण्याचा निर्णय घेतला तेव्हा दोघांकडे पैसे नव्हते. कुटुंबीयांकडून आणि मित्रांकडून त्यांनी 3 लाख रुपये जमा करून चहाचे दुकान टाकले. हे पहिलं टी शॉप त्यांनी लेडिज होस्टेलच्या बाहेर टाकलं. सहाजिक तेथे मुलांची वर्दळ असायची. त्यांच्या टी शॉपचे हे मुलं सर्वप्रथम ग्राहक बनली. मात्र, प्रभावी मार्केटिंग करून लवकरच त्यांच्या चहाला प्रसिद्धी मिळाली. कुल्हड म्हणजे मातीच्या पेल्यात चहा देण्याची आयडीयाही यशस्वी ठरली.
मार्केटिंगच्या भन्नाट आयडिया
चाय सुट्टा बार हे नाव जरी ठेवलं असलं तरी त्यांच्या टी शॉपमध्ये सिगारेट मिळत नाही आणि स्मोकिंगही करण्यास मनाई आहे. सुरुवातील जेव्हा शॉपमध्ये कोणी फिरकत नसे तेव्हा ते जाणूनबुजून त्यांच्या मित्रांना बोलावून गर्दी करायचे. दुकानात गर्दी पाहून आणखी लोक यायचे. तसेच चाय सुट्टा बार टी शॉपबाबत जाणूबुजून लोकांमध्ये मोठ्याने चर्चा करायचे. त्यामुळे परिसरात काही दिवसांतच हे टी शॉप प्रसिद्ध झाले. त्यांनी पहिल्या दुकानाचा बोर्ड एका लाकडी फळीवर स्प्रे पेंटिंग करून चाय सुट्टा बार असे नाव दिले. हा बोर्डही ग्राहकांना आकर्षित करायचा.
सहा महिन्यातच त्यांचा व्यवसायात जम बसला. मग फ्रँचायजीसाठी विचारणा होऊ लागली. पुढील काही दिवसांत 4 नवीन टी शॉप सुरू झाली. मग दुसऱ्या राज्यातूनही फ्रँचायजीसाठी विचारणा होऊ लागली. आता भारतातील 195 शहरांत 400 पेक्षा जास्त चाय सुट्टा बारची टी शॉप आहेत. त्यांच्या एकूण व्यवसायाचा टर्नओव्हर दीडशे कोटींच्या घरात आहे. ज्या वयात मुलं शिक्षण पूर्ण करून नोकरीच्या शोधात असतात त्या वयात या दोघांनी व्यवसायाचं साम्राज्य स्वत:च्या हिंमतीवर उभं केलं.
परदेशातही 'चाय सुट्टा बार' चा डंका
अनुभव दुबे आणि आनंद नायक यांनी सुरू केलेल्या व्यवसायाची प्रसिद्धी परदेशातही पोहचली आहे. युके, दुबई, कॅनडा, ओमान आणि इतरही काही देशांमध्ये चाय सुट्टा बारच्या शाखा सुरू झाल्या आहेत. आज चाय सुट्टा बारचे जगभरात ग्राहक आहेत. एका छोट्याशा शहरातून येऊन अनुभव आणि आनंद यांनी देशातील तरुणांपुढे आदर्श उभा केला आहे. कोणतीही आयडिया छोटी नसते मात्र, त्यावर प्रयत्नपूर्वक काम केल्यानंतर यश मिळू शकते.