सामाजिक प्रकल्पांना वित्तपुरवठा करण्यासाठी सरकारला उत्पन्न मिळविण्यासाठी, व्यक्ती आणि कॉर्पोरेशनकडून प्रत्यक्ष कर (Direct Tax) आणि अप्रत्यक्ष कराद्वारे (Indirect Tax) कर वसूल केला जातो. या दोन कर संकलनातून सरकारचा महसूल तयार होतो. चालू आर्थिक वर्षात देशाचा ग्रॉस डायरेक्ट टॅक्स (Gross Direct Tax) म्हणजेच सकल प्रत्यक्ष कर संकलन 10 जानेवारीपर्यंत 24.58 टक्क्यांनी वाढून 14.71 लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे. तर परताव्यानंतर नेट डायरेक्ट टॅक्स (Net Direct Tax) कलेक्शन 19.55 टक्क्यांनी वाढले आहे. आतापर्यंत ते 2022-23 या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकाच्या 86.68 टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे.
मागील आर्थिक वर्षापेक्षा अधिक टॅक्स
अर्थ मंत्रालयाने नुकत्याच जारी केलेल्या आकडेवारीत ही माहिती देण्यात आली आहे. 2022-23 या आर्थिक वर्षात निव्वळ कर संकलन 12.31 लाख कोटी रुपये झाले आहे. जे गेल्या आर्थिक वर्षातील याच कालावधीपेक्षा 19.55 टक्के अधिक आहे. मात्र, अर्थसंकल्पात, चालू आर्थिक वर्षासाठी थेट कर संकलन 14.20 लाख कोटी रुपये असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.
वैयक्तिक आयकरामुळे वाढ
यंदाच्या कर संकलनात वैयक्तिक आयकराचा (Personal Income Tax) मोठा वाटा होता. 2022-23 या आर्थिक वर्षात एकूण आधारावर वैयक्तिक आयकरात 30.46 टक्के वाढ झाली आहे. त्याचवेळी कॉर्पोरेट आयकर संकलनातही 19.72 टक्क्यांनी वाढ झाली आहे. दुसरीकडे, जर आपण त्याच्या वाढीबद्दल बोललो तर, परतावा समायोजित केल्यानंतर, वैयक्तिक आयकरामध्ये निव्वळ वाढ 20.97 टक्के आहे. कॉर्पोरेट आयकर संकलनात निव्वळ वाढ 18.33 टक्के आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत 58.74 टक्के जास्त परतावा
चालू आर्थिक वर्षात गेल्या वर्षीच्या तुलनेत जास्त परतावा प्रस्तुत करण्यात आला आहे. यावर्षी 1 एप्रिल 2022 ते 10 जानेवारी 2023 दरम्यान 2.40 लाख कोटी रुपयांचा परतावा जारी करण्यात आला. गेल्या वर्षी याच कालावधीत जारी केलेल्या परताव्याच्या तुलनेत हे प्रमाण 58.74 टक्के अधिक आहे.