राज्यात वाढत्या विजेची मागणी लक्षात घेता राज्य सरकारकडून उर्जा निर्मितीवर जास्त भर दिला जात आहे. विशेष म्हणजे यापुढे अक्षय ऊर्जा निर्मितीसाठी राज्य सरकार आग्रही आहे. यासाठी विविध कंपन्यांसोबत सामंजस्य करार केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून राज्य सरकारने टाटा पॉवर कंपनीसोबत 2800 मेगावॅट वीज निर्मितीच्या प्रकल्पासाठी करार केला आहे. टाटा पॉवर कंपनी येत्या काळात महाराष्ट्रात उदंचन जलविद्युत प्रकल्पाच्या माध्यमातून वीज निर्मिती करणार आहे.
टाटा सोबत सामंजस्य करार-
जल विद्यूत निर्मिती प्रकल्पामध्ये उदंचन जलविद्युत (Pumped-storage hydroelectricity) या प्रकाराच्या माध्यातूनही विजेची मोठ्या प्रमाणात निर्मिती केली जाते. महाराष्ट्राच्या वैशिष्टपूर्ण भौगोलिक परिस्थितीमुळे उदंचन वीज निर्मिती प्रकल्प सुरू करण्यास भरपूर वाव आहे. त्याचदृष्टीने आणि भविष्यातील विजेची मागणी लक्षात घेत राज्य सरकारडून टाटा पॉवर लिमिटेड या कंपनी सोबत उर्जा निर्मिती संदर्भात सामंजस्य करार करण्यात आला आहे.
2800 मेगावॅट वीज निर्मिती-
राज्य सरकारने उर्जानिर्मितीसाठी केलेल्या या करारानुसार टाटा पॉवर कंपनी राज्यात उदंचन जलविद्युत प्रकल्पाच्या माध्यमातून तब्बल 2800 मेगावॅट वीज निर्मिती करणार आहे. यासाठी कंपनीकडून 12500 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात भिवपुरी येथे 1000 मेगावॅटचा आणि पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात शिरवटा येथे 1800 मेगावॅट येथे हे प्रकल्प सुरू केले जाणार आहेत. या प्रकल्पाच्या पुर्ततेनंतर राज्यात निर्माण होणाऱ्या विजेचा तुटवडा कमी होण्यास आणखी मदत होणार आहे.
राज्यात निर्माण होणार 6000 रोजगाराच्या संधी
राज्य शासनाने उर्जा निर्मिती प्रकल्पासाठी केलेल्या करारामुळे टाटा कंपनीकडून 12500 कोटींची गुतंवणूक केली जाणार आहे. त्याच बरोबर या प्रकल्पाच्या निर्मितीमुळे तब्बल 6000 नवीन रोजगाराच्या संधी देखील निर्माण होणार आहेत. त्यामुळे अनेकांच्या हाताला काम मिळण्यास मदत होणार आहे.
अशी होईल वीज निर्मिती-
उदंचन जलविद्युत प्रकल्प हे अक्षय उर्जेचाच एक भाग आहे. यामध्ये दोन जलाशयांचा वापर करून विद्युत उर्जेची निर्मिती केली जाते.यासाठी सौर उर्जा, पवन उर्जा निर्मितीचा वापर करून जी औष्णिक उर्जे पेक्षा स्वस्त दराने उपलब्ध होते, अशा उर्जेचा वापर करून खालच्या बाजूस असलेल्या जलाशयाचे पाणी उपसा करून ते जलाशयाच्या वरील बाजूस असलेल्या जलाशयामध्ये टाकले जाते. त्यानंतर त्या पाण्याचा वापर करून जलविद्यूत प्रकल्प कार्यान्वित केले जातात. विजेची मागणी वाढते त्यावेळी अशा प्रकारच्या उदंचन विजेच्या निर्मितीला प्राधान्य दिले जाते.