TATA Cars Price Hike: टाटा मोटर्सने विविध श्रेणीतील गाड्यांच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. कच्च्या मालाचे दर वाढल्याने एसयूव्ही आणि कारचे दर वाढवत असल्याचे कंपनीने म्हटले आहे. नवे दर 17 जुलैपासून लागू होतील. टाटाच्या नेक्सॉन, हॅरीयर, पंच आणि सफारी या गाड्यांची मागील वर्षभरात सर्वाधिक विक्री वाढली आहे. तसेच चालू वर्षात नवीन मॉडेलही बाजारात येणार आहेत.
इलेक्ट्रिक आणि पेट्रोल- डिझेल श्रेणीतील सर्व गाड्यांच्या किंमती 0.6 टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. दरम्यान, जे ग्राहक 16 जुलैपर्यंत गाडी बुक करतील त्यांना जुने दर लागू होतील. मात्र, 17 जुलै पासून नव्या दरानुसार कार खरेदी करावी लागेल.
टाटा कारच्या किंमती
टाटा नेक्सॉनची एक्स शोरुम किंमत 7.80 लाखांच्या पुढे आहे. तर पंच ची किंमत 6 लाखांच्या पुढे आहे. टाटा टियागो ही बजेट कारची किंमत 5.60 लाखांपासून पुढे सुरू होते. (TATA Cars Price Hike) हॅरियर आणि सफारी या प्रिमियम गाड्यांच्या किंमती 15 लाखांपेक्षा जास्त आहेत. Tata Curvv गाडी लवकरच लाँच होणार आहे. सोबतच टाटा पंच सीएनजी, टाटा नेक्सॉन सीएनजी नव्या अवतारात ग्राहकांपुढे येईल.
दरवाढीमागील कारण
कच्च्या मालाच्या किंमती वाढल्याने सर्व मॉडेल आणि व्हेरियंटच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतल्याचे टाटा मोटर्सने म्हटले आहे. कोविडनंतर कच्च्या मालाच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. (TATA Cars Price Hike) त्यामुळे सर्वच कंपन्यांनी वेळोवेळी दरवाढ केली आहे. कोरोनामुळे पुरवठा साखळीत अडथळा निर्माण झाल्यानेही किंमतीवर परिणाम झाला होता. नवीन वर्षाच्या सुरुवातीला जवळजवळ सर्वच कंपन्यांनी दरवाढ केली होती. त्यानंतर टाटा कंपनीने वर्षातील ही दुसरी दरवाढ जाहीर केली आहे.
चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत टाटा मोटर्सने 2 लाख 26 हजार गाड्यांची विक्री केली. जर नुकत्याच संपलेल्या जून महिन्यात 80 हजारांपेक्षा जास्त गाड्या विकल्या. 2022 पेक्षा चालू वर्षी टाटाची कामगिरी चांगली आहे. विक्रीच्या चांगल्या आकडेवारीमुळे टाटा कंपनीच्या शेअर्सच्या दरातही वाढ झाली आहे.