टाटा एआयए लाईफ इन्शुरन्स कंपनीने आपल्या पॉलिसीधारकांसाठी (policyholders) एक सुखद घोषणा केली आहे. टाटा एआयए या इन्शुरन्स कंपनीने आर्थिक वर्ष 2022-23 साठी आपल्या पॉलिसीधारकांना तब्बल 1183 कोटी रुपयांचा लाभांश (Dividend) देण्याचे जाहीर केले आहे. टाटा समूहाच्या (TATA Group) या विमा कंपनीकडून आत्तापर्यंत देण्यात आलेल्या लाभांशापैकी ही सर्वात मोठी रक्कम आहे. हा लाभांश गेल्या वर्षीच्या तुलनेत 37 टक्क्यांनी जास्त आहे. मागील आर्थिक वर्ष म्हणजेच 2021-22 मध्ये कंपनीने 861 करोड रुपयांच्या लाभांशाचे वाटप केले होते.
किती पॉलिसीधारक आहेत पात्र? eligible policyholders
टाटा एआयए विमा (Tata AIA Life Insurance) कंपनीकडून हा 1183 कोटीचा लाभांश पॉलिसीधारकांना देण्याचे जाहीर करण्यात आले. त्यानुसार एकूण 7,49,229 पॉलिसीधारक (policyholders) आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये घोषित केलेल्या लाभांश मिळण्यासाठी पात्र आहेत. टाटा एआयए लाईफ इन्शुरन्सचे अध्यक्ष आणि मुख्य वित्त अधिकारी समित उपाध्याय यांनी याबाबतची माहिती दिली.
कंपनीचा निव्वळ नफा 506 कोटी : Net Profit
आर्थिक वर्षाच्या शेवटी म्हणजे 31 मार्च 2023 पर्यंत कंपनीच्या उत्पन्नात कित्येक पटीने वाढ झाली असून कंपनीचा निव्वळ नफा हा 506 झाला आहे. गेल्या आर्थिक वर्षात कंपनीला केवळ 71 कोटी नफा झाला होता, अशीही माहिती उपाध्याय यांनी दिली.
टाटा एआयएची बंपर कमाई-
टाटा एआयएच्या कमाईमध्ये आर्थिक वर्ष 2021-22च्या तुलनेत 2022-23 मध्ये वैयक्तिक नवीन व्यवसाय प्रिमियममध्ये 59 टक्क्यांनी म्हणजेच 7,093 कोटी रुपयांनी वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष 2022-23 साठी एकूण प्रीमियम उत्पन्न 14,445 कोटी रुपयांवरून 42 टक्क्यांनी वाढून 20,503 कोटी रुपये झाले. तसेच टाटा एआयएच्या किरकोळ विम्याची रक्कम 3,07,804 कोटी रुपयांवरून 4,43,479 कोटी रुपयांपर्यंत वाढली आहे. जी वार्षिक आधारावर 44 टक्क्यांनी वाढली आहे.
टाटा एआयए लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (टाटा एआयए लाइफ)ही टाटा सन्स प्रा.लिमिटेड आणि एआयए ग्रुप लि.(एआयए) भागीदारी कंपनी आहे. मार्च 2023 च्या तिमाही अखेर या विमा कंपनीची व्यवस्थापनाखालील एकूण मालमत्ता (AUM)71,006 कोटी रुपये इतकी होती.